ध्येयप्राप्तीसाठी धर्मकार्य समर्पित भावाने करण्याचे महत्त्व

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’त केलेले मार्गदर्शन

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे

१. समर्पित भाव म्हणजे काय ?

भारताचा इतिहास हा समर्पणाच्या घटनांनी भारलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतीय नेत्यांनी जनतेला त्याग करायला शिकवला. त्यामुळे वेळ प्रसंगी आत्मसमर्पणाची भावना स्वातंत्र्यसैनिकांमध्ये निर्माण झाली. मोजमापन होऊ शकणार नाही, इतके क्रांतीकारक स्वातंत्र्याच्या बलीवेदिकेवर चढले. मात्र स्वातंत्र्यानंतरचा ७१ वर्षांचा इतिहास हा मात्र अगदी विरोधाभासी आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी जणू त्याग, समर्पण या संकल्पनाही हद्दपार केल्याप्रमाणे जनतेला स्वार्थाची शिकवण दिली. त्यामुळे आज ७१ वर्षांनी त्यागाच्या आधारावर उच्च कार्य उभे करता येते, यावर कोणाचा विश्‍वासच राहिलेला नाही. अर्थात याला कारणीभूत राजकीय पक्ष आणि स्वार्थांध नेते आहेत. त्यांनी त्यांच्या अनुयायांना आणि जनतेला प्रलोभने दाखवून स्वत:प्रमाणेच स्वार्थी बनवले. त्यामुळे आज कोणत्याही कार्यात सहभागी होतांना ‘यातून मला काय लाभ मिळणार ?’ हाच विचार सध्या समाज करत असतो.

या विचारसरणीला आपण हिंदु राष्ट्र-संघटक अपवाद आहोत; कारण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष पहाता, आपण केवळ समर्पणच नव्हे, तर सर्वस्वाचे समर्पण करणे अपेक्षित आहे, हे आपण जाणून आहोत. हे समर्पण म्हणजे आहे तरी काय ? व्यक्तीगत जीवनाचा विचार बाजूला सारून ध्येयप्राप्तीसाठी, म्हणजे हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी स्वत:ला झोकून देणे म्हणजे समर्पण ! या व्यक्तीगत जीवनात स्वत:चे व्यक्तीस्वातंत्र्य, कुटुंब, पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण असे सर्वच आले. हिंदु राष्ट्र-जागृतीचे कार्य करत असतांना आपल्याकडून काही ना काही समर्पण होतच असेल; मात्र ध्येयप्राप्तीसाठी हे समर्पण आणि त्याग उत्तरोत्तर वाढत जाणे, ही काळाची आवश्यकता आहे.

२. कार्यात समर्पित भावाचे महत्त्व काय ?

‘स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोक जेव्हा तुमच्यामध्ये निपजतील, तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल’, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलीदान पाहिले, तर हे विधान तंतोतंत खरे ठरते. या क्रांतीकारकांमधील समर्पणभाव जागृत झाला नसता, तर आपल्याला स्वातंत्र्य अनुभवता आले असते काय ? त्याग आणि सेवा हे भारतभूचे राष्ट्रीय आदर्श आहेत. राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी ती दृढ करण्याची आज आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात आपण स्वत:ला तन-मनपूर्वक झोकून दिले पाहिजे. आपण सर्वस्व समर्पणाला सिद्ध झालो नाही, तर हिंदु राष्ट्राचे दिव्य दर्शन आपल्याला कधीच होणार नाही.

आपण सर्वजण हिंदु राष्ट्र-स्थापनेची इच्छा मनामध्ये बाळगतो. हे कार्य करण्यासाठी आवश्यक असे बहुतांश गुण आपल्या अंगी असतात; पण त्यासोबत कुटुंबाची जबाबदारीही असते. या जबाबदारीमुळे हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वस्व झोकून धर्मकार्य करण्याची मनातील इच्छा पूर्ण करता येत नाही. सगळ्यांची ही प्रामाणिक इच्छा समजण्यासारखी आहे. कौटुंबिक जबाबदारीची अडचण ही खरीच असते. असे असले तरी, आज राष्ट्र आणि धर्म यांची जी बिकट परिस्थिती दिसते, तिच्यातून मुक्त होण्याचा निश्‍चय करून केवळ हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हेच जीवनकार्य मानणारे कार्यकर्ते आपल्याला आवश्यक आहेत. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे समष्टी ध्येय सतत मनुष्यबळाची म्हणजे कार्यकर्त्यांची मागणी करणारे आहे. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहस्रो, नव्हे लाखो धर्मप्रेमींनी सर्वस्व समर्पण करणे, हाच त्यावरील उपाय आहे.

स्वामी विवेकानंदांनीही ‘यश, कीर्ती, पत्नी-मुले इतकेच नव्हे, तर सर्वस्वाचे समर्पण करण्याची तुमची तयारी आहे का ?’ अशा शब्दांत त्या काळी देशभक्तांना साद घातली होती. राष्ट्ररचनेच्या अमोल कार्यासाठी या विचारांचे पुन्हा एकदा स्मरण करणे आवश्यक आहे.

३. समर्पित भावाने कार्य केल्यास होणार्‍या लाभाची इतिहासातील उदाहरणे

व्यापक राष्ट्रहिताच्या ध्येयप्राप्तीसाठी समर्पण हा शब्दही तोकडा ठरेल, असे अनेक नरश्रेष्ठ भारतात होऊन गेले.

३ अ. सुभेदार तानाजी मालुसरे : ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे…’ असे म्हणत स्वत:च्या मुलाचा विवाह बाजूला सारून या सिंहाने हिंदवी स्वराज्याच्या यज्ञात जिवाची आहुती दिली.

३ आ. बाजीप्रभू देशपांडे : स्वत:चा मृत्यू निश्‍चित आहे, हे माहित असूनही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा निश्‍चय केला आणि छत्रपती सुखरूप गडावर पोचल्याचा तोफांचा आवाज ऐकल्यावरच समाधानाने प्राण सोडले.

या योद्ध्यांच्या तुलनेत आपणाला द्यावे लागणारे समर्पण हे अगदीच सुईच्या टोकावरचे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. या महारथींनी हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यावर ‘मला काय लाभ होईल ?’ याचा विचार केला नाही. तद्वतच हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर ‘मी पंतप्रधान होईन, मी मंत्री होईन, मला अमूक पद-प्रतिष्ठा मिळेल’ अशी कोणतीही भावना आपल्या मनात येऊ नये, यासाठी आपण सतर्क असले पाहिजे. सतत नि:स्वार्थ आणि त्याग या भूमिकेत राहिलो, तरच राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळत राहील.

४. वर्तमान काळात समर्पित भावाने कार्य करणार्‍या धर्मप्रेमींची उदाहरणे

४ अ. पू. भिडे गुरुजी : श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी उच्च विद्याविभूषित असूनही ते नोकरी, व्यवसाय, कुटुंब यांच्या मागे गेले नाहीत. आज वयाच्या ८६ व्या वर्षापर्यंत त्यांनी संन्यस्त जीवन स्वीकारले आहे. सर्व सुखांचा उपभोग घेणे शक्य असतांनाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. साधी वेशभूषा, साधे रहाणीमान, सायकल-सरकारी बसने प्रवास, अनवाणी फिरणे, असे त्यांचे आचरण अन् जीवनपद्धती हे समर्पण भावाचे आदर्श उदाहरण आहे.

४ आ. अधिवक्ता संजीव पुनाळेकर : १९.८.२०१८ या दिवशी सायंकाळी अधिवक्ता पुनाळेकर यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या वडिलांना ‘मृत’ म्हणून घोषित केले आणि त्याच दिवशी पोलिसांनी नालासोपारा प्रकरणामध्ये आणखी एका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला अटक केली. दुसर्‍या दिवशी त्या कार्यकर्त्याला न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार होते. त्यांनी त्यांच्या आईला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आई, बाबा गेले आहेत. मी त्यांना घरी आणतो; मात्र पुढे अंतिम स्नानादी बरेच विधी-क्रियाकर्म आदी होतील आणि दहनाला पहाट होईल. बाबांची इच्छा होती की, त्यांच्या पार्थिवावर कोणतेही धार्मिक विधी करू नयेत. हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी पकडले आहे. ते अडचणीत आहेत आणि संस्थाही अडचणीत आहे. कोणत्याही परिस्थितीत मला उद्या अटकेतील सहकार्‍यांसाठी न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.’’ त्यांच्या आईने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, ‘‘बाळा, मला त्यांना शेवटचे पहायचे आहे, असा माझा मुळीच आग्रह नाही. तू त्यांना रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत घेऊन जा. हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संस्था अडचणीत असतांना तू उद्या न्यायालयात असणे अधिक महत्त्वाचे आहे.’’ अधिवक्ता पुनाळेकर यांनी रात्रीच वडिलांचा दहनविधी केला. दुसर्‍या दिवशी सकाळी ते घरातून लवकर बाहेर पडले. त्यांनी स्मशानात जाऊन वडिलांचा अस्थीकलश घेतला आणि कार्यालयात येता येताच समुद्रात अस्थीविसर्जनही केले. नंतर लगेचच स्वतःची सिद्धता करून ते सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहिले. राष्ट्र आणि धर्म यासाठी असा समर्पित भाव सतत आपल्यामध्ये असायला हवा.

४ इ. श्री. प्रमोद मुतालिक : यांची वृद्ध आई अत्यंत गंभीर स्थितीत अंथरुणाला खिळून होती; म्हणून ते शेवटचे काही दिवस सतत आईसोबत होते. शेवटच्या दिवशी आईची प्रकृती आणखी ढासळली; पण त्या दिवशीही एका पूर्वनियोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला वक्ता म्हणून श्री. मुतालिक गेले. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर आईची प्रकृती आणखी ढासळली; पण श्री. मुतालिक यांचा निर्धार ढळला नाही. ते त्याही स्थितीत सभेला गेले आणि सभा पूर्ण करूनच घरी परतले. घरी परतल्यानंतर अर्ध्या तासांनी त्यांच्या मातोश्रींनी देह ठेवला, म्हणजे ‘धर्मकार्यात समर्पण केल्यावर ईश्‍वरही आपल्याला साहाय्य करतो’, याची अनुभूती त्यांनी घेतली.

५. समर्पित भाव स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी विविध स्तरांवर करायचे प्रयत्न !

आजच्या स्थितीला राष्ट्र आणि धर्म यांसाठी पूर्णकालीन वेळ देणे, हे सर्वश्रेष्ठ समर्पण आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक यांच्यापैकी अनेक जण अशा पद्धतीचे समर्पित जीवन जगत आहेत; कारण हिंदु राष्ट्राची स्थापना किंवा ईश्‍वरप्राप्ती हा काही ‘पार्टटाईम जॉब’ (थोडा वेळ नोकरी) नव्हे ! उच्च ध्येय साध्य करण्यासाठी त्यागही तितकाच उच्च हवा. अशा प्रकारच्या त्यागामध्ये म्हणजे पूर्णवेळ हिंदु राष्ट्र-संघटक कार्यकर्ता होण्यामध्ये येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

५ अ. मानसिक : पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याची आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेता येत नाही.

१. ‘मी पूर्णवेळ झाल्यास कुटुंबाचे कसे होणार, आई-वडिलांना कोण सांभाळणार आदी विचार असतात. या विचारांमध्ये आपणाला अपराधीपणा वाटत असतो. अशा वेळी लक्षात घेतले पाहिजे की, पूर्णवेळ कार्यकर्ता होऊन मी कोणताच अपराध करत नाही. हा निर्णय कुटुंबियांना प्रेमाने; पण आत्मविश्‍वासाने सांगता आला पाहिजे.

२. ‘पूर्णवेळ सेवा करण्याचा विचार करण्याइतका आपल्याकडे वेळ नाही’, असे वाटणे हीच चुकीची धारणा असते; कारण कोणत्याही कार्यासाठी आपणाला वेळ काढावा लागतो.

३. काही अडचणींचे स्वरूपच असे असते की, त्यांमुळे पूर्णवेळ होणे अशक्य असते. उदा. मोठे कर्ज असणे, आई-वडील स्वत:चे काही करू शकत नाहीत इतके वृद्ध किंवा आजारी असणे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्वरित पूर्णवेळ होऊ शकत नसलो, तरी आपणाला हा टप्पा कधी ना कधी गाठायचा आहे, हे ध्येय ठेवून सतत त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक असते.

४. आपली प्रकृती आणि परिस्थिती यांच्याशी साम्य असलेल्या पूर्णवेळ साधकांनी ‘हा निर्णय घेण्यासाठी मनाचा निर्धार कसा केला ?’ याविषयी त्यांना विचारून घेता येईल.

५ आ. बौद्धिक :

१. पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याच्या अडथळ्यांमधून स्वत:हून बाहेर पडता येत नसेल, तर समविचारी व्यक्तींचे साहाय्य घ्यावे. (आपल्या क्षेत्रातील समिती समन्वयक / प्रसारसेवक यांच्यासोबत मोकळेपणाने तुमच्या अडचणी, अडथळे यांच्याविषयी सांगितल्यास तुम्हाला येणार्‍या अडथळ्यांतून कसा मार्ग काढावा, हे ते तुम्हाला सांगू शकतील.)

२. आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणे कठीण वाटत असल्यास काही कालावधीसाठी आश्रमात राहून आश्रमजीवनाचा अनुभव घ्यावा. काही साधकांनी हा प्रयत्न केल्यावर निर्णय घेण्यासाठी त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला.

३. मनाची द्विधा स्थिती नष्ट होऊन पूर्णवेळ कार्यकर्ता होण्यासाठी बुद्धीचा निश्‍चय होण्याकरिता पुढील स्वयंसूचना द्यावी, ‘आतापर्यंत मी घेतलेल्या / अनुभवलेल्या शैक्षणिक जीवनातील / कौटुंबिक जीवनातील / व्यावसायिक जीवनातील समाधानाला मर्यादा आहेत. गुरुकृपेमुळे साधनेचे प्रयत्न केल्याने मला सर्वाधिक आनंद मिळत आहे. ‘पूर्णवेळ कार्यकर्ता होण्यामध्ये येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी काय प्रयत्न करावेत ?’, याविषयी उत्तरदायींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्यावर अंती देवच मला त्यासाठी घडवील आणि पूर्णवेळ साधनेसाठी आत्मबलही पुरवील.’

५ इ. आध्यात्मिक : धर्मकार्यातील सहभाग वाढण्यात काही वेळा सूक्ष्मातील वाईट शक्तींचे अडथळे कारणीभूत असतात. आध्यात्मिक त्रासांमुळे ‘पूर्णवेळ साधनेचा निर्णय घेऊ नये’, असे वाटते. ते विचार नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक उपाय, प्रार्थना आणि कृतज्ञता हे उपाय नियमित करायला हवेत. तसेच या प्रक्रियेतील सर्व अडथळे नष्ट होण्यासाठी ईश्‍वराकडे प्रार्थना करायला हवी.

५ इ १. आध्यात्मिक स्तरावरचे समर्पण सर्वश्रेष्ठ ! : पूर्णवेळ कार्यकर्ता होणे, ही कृती शारीरिक स्तरावरील आहे. खर्‍या अर्थाने स्वत:चे सर्वस्व ईश्‍वराच्या चरणी अर्पण करणे, हे आध्यात्मिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ समर्पण आहे.

५ इ २. प्राण समर्पण करण्यासाठीही आध्यात्मिक सिद्धता हवी ! : अर्जुन चांगला शिष्य होता, म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।’ म्हणजे ‘सर्व कर्मांचा परित्याग करून तू मला शरण ये !’ अशा प्रकारचा शरणागत भाव निर्माण झाल्यानंतर धर्मासाठी प्रसंगी प्राण त्यागण्याची सिद्धता होते. त्या वेळी कर्तव्य, कर्म, दायित्व इत्यादींच्या स्मरणापेक्षा ‘धर्मासाठी प्राण समर्पण करणे’ हे महत्त्वाचे कर्तव्य वाटू लागते. अशा प्रकारची आध्यात्मिक सिद्धता होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली योग्य साधना करणे आवश्यक असते. ‘भावी काळात तुम्ही चांगली साधना करून या टप्प्यापर्यंत आपली सिद्धता कराल’, अशी आशा बाळगतो.

६. समर्पित भावाने कार्य करण्यासाठी आवाहन

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात आपण सहभागी आहात. त्याअर्थी ईश्‍वराची कृपा आपल्यावर निश्‍चित आहे; मात्र ही कृपा शीघ्रतेने व्हावी, यासाठी आपली तळमळ वाढायला हवी. त्यासाठी ‘धर्मकार्यातील प्रत्येक सेवा ही माझे समर्पण वाढवण्यासाठी ईश्‍वराने दिलेली संधी आहे’, हा भाव ठेवा ! आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महद्भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचा उद्धार होण्यासाठी वेळ न दवडता शीघ्रतेने पाऊल उचला ! ईश्‍वर त्या प्रयत्नांत तुम्हाला निश्‍चित साहाय्य करील ! त्यासाठी आवश्यक ते बळ, युक्ती, बुद्धी आपल्याला मिळो, ही

श्री गुरुचरणी प्रार्थना करतो !

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.


Multi Language |Offline reading | PDF