गुन्हा आणि आरोपीचा धर्म !

उत्तरप्रदेशमधील अलीगड येथे अवघ्या अडीच वर्षांच्या हिंदु बालिकेची दोघा धर्मांधांनी अत्यंत अमानवी, अमानुष आणि क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्याविरोधात विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महंमद जाहिद आणि महंमद असलम यांना अटक केली आहे. अलीगडमधील बुढा गाव येथे ३१ मे या दिवशी ही चिमुकली बेपत्ता झाली होती. त्याविरोधात तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ५ दिवसांनंतर येथील एका कचराकुंडीजवळ अनेक कुत्री एका शवाचे लचके तोडत असल्याचे नागरिकांनी पाहिले. जेव्हा नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा ते शव एका बालिकेचे असल्याचे पाहून सर्वच जण हादरले. या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची शंका अनेकांनी वर्तवली; परंतु अलीगडचे पोलीस अधीक्षक आकाश कुलहरी यांनी मात्र बलात्कार झालाच नसल्याचा दावा केला. या बालिकेचा मृतदेह कशा अवस्थेत कचर्‍यात टाकला होता, हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला अनुभव तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे. त्या बालिकेचे डोळे बाहेर आले होते आणि तिचे हात तुटलेल्या अवस्थेत शरिराच्या बाजूला पडले होते. सदर बालिकेची हत्या ही इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांची आठवण करून देणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बालिकेच्या परिवाराने धर्मांधांच्या कुटुंबाकडून ४० सहस्र रुपये कर्ज घेतले होते; मात्र त्यातील ३५ सहस्र रुपयेच त्यांना फेडता आले. उरलेले ५ सहस्र ते देऊ शकले नाहीत. यावरून दोन्ही कुटुंबांत वाद चालू होते. त्यामुळे धर्मांधांनी बालिकेची हत्या केली.’ हे म्हणणे पोलिसांचे आहे; पण या घटनेच्या सखोल तपासाअंती आणखी धक्कादायक कारणे पुढे येण्याची शक्यता अधिक आहे; कारण पोलीस सांगतात एक आणि निघते भलतेच, हा आजवरचा अनुभव आहे.

या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांची अकार्यक्षमता दिसून येते. सदर बालिका बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी केल्यावरही पोलीस अपहरणकर्त्यांना त्वरित का पकडू शकले नाहीत ? पोलिसांनी ठरवले असते, तर अपहृत बालिकेला २४ घंट्यांतही शोधू शकले असते; पण पोलिसांनी तसे का केले नाही ? हे जनतेला कळायला हवे. वास्तविक एखाद्या गुन्ह्याची उकल करायची असेल, तर सर्व बाजूंनी अन्वेषण करणे आवश्यक असते; पण पोलिसांनी हा वाद दोन कुटुंबांपुरता मर्यादित असल्याचे अगोदरच सांगून टाकत या घटनेचे गांभीर्य न्यून करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अशाने गुन्ह्याची संपूर्ण उकल कशी होणार ? जगभराचे पोलीस गुन्हा पाहून अन्वेषणाची दिशा ठरवतात, तर भारतातील पोलीस आरोपीचा धर्म पाहून अन्वेषणाची दिशा ठरवतात ! अशाने आरोपींचे मनोबल वाढले नाही, तरच नवल.

आरोपींचा अनुल्लेख का ?

या घटनेचे वृत्त ज्या ज्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, त्यांपैकी जवळपास कुणीच आरोपी महंमद जाहिद आणि महंमद असलम यांच्या नावांचा किंवा ते अल्पसंख्यांक गटातील असल्याचा उल्लेख केलेला नाही किंबहुना तो जाणीवपूर्वक टाळला आहे. याच प्रसारमाध्यमांनी कठुआत अन्य पंथीय बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी हे ‘बहुसंख्य गटातले होते’ किंवा ‘ते हिंदू होते’, अशा आरोळ्या ठोकल्या होत्या. प्रसारमाध्यमांच्या या भेदभावाला हिंदुद्वेष म्हणायचे कि जिहाद ? चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही अलीगड येथील घटनेचा निषेध केला खरा; परंतु आरोपींचा उल्लेख मात्र जाणूनबुजून टाळला. याच कलाकारांपैकी अनेकांनी कठुआ प्रकरणात वरीलप्रमाणे प्रसारमाध्यमांसारखी भूमिका बजावली होती. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, कथित कलाकार, (अ)विचारवंत, पुरो(अधो)गामी आदी बांडगुळे आरोपीच्या धर्माला महत्त्व देतात. वर हेच लबाड लोक ‘कुठल्याही घटनेकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नका’, असा फुकाचा सल्लाही देऊन मोकळे होतात. कुठल्याही घटनेत आरोपी हिंदु असेल, तर त्याचे नाव घेऊन हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याची चढाओढ लागते; मात्र अन्य घटनांत जेव्हा आरोपी हिंदु नसतो, तेव्हा अशा घटनेचा केवळ निषेध नोंदवला जातो. तेथे अहिंदु आरोपीचे नाव घेतले जात नाही. हा हिंदुद्वेष आता हिंदूंच्याही लक्षात येऊ लागला आहे. अशी मंडळीच खरे धर्मांध असतात, ते घटनेचे गांभीर्य न्यून करत असतात. विशिष्ट आरोपींचा अनुल्लेख करून आरोपींचे मनोधैर्य उंचावत असतात. अर्थात् अशी लबाडी फार काळ चालत नाही. योग्य वेळी जनताच अशांना त्यांची जागा दाखवून देते.

अलीगडच्या प्रकरणात प्रथम पोलिसांची अकार्यक्षमता दिसून आली. दुसरे म्हणजे अनेक प्रसारमाध्यमांनी कठुआ प्रकरणाप्रमाणे अलीगड प्रकरणात आरोपींची नावे जाणूनबुजून जनतेपासून लपवून ठेवली. असहिष्णुतेवरून बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात डांगोरा पिटणारे कलाकारही आरोपींची नावे घ्यायला सिद्ध नाहीत. महिला आयोग अद्याप याविषयी काहीही बोलायला सिद्ध नाही. देशातील कुठल्याही प्रार्थनास्थळातून अशा घटनेचा निषेध होतांना आढळत नाही. हिंदूंना वारंवार लक्ष्य करणारे ओवैसी यांच्यासारखे नेतेही याविषयी तोंड उघडत नाहीत. यावरून हे सर्वजण कोणता संदेश देऊ पहात आहेत ? हे चित्र कुठेतरी पालटले पाहिजे.

गुन्हेगारांना फाशीच हवी !

अलीगडची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. आपल्याकडे यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत; पण किती प्रकरणांत आरोपींना फाशी होते ? तसे झाले असते, तर देहली, अलीगड, कठुआ यांसारख्या घटना रोखता आल्या असत्या. वास्तविक बलात्कार आणि हत्या हे अत्यंत अमानुष प्रकार आहेत. गुन्हेगारांनी केलेल्या कुकर्माची कठोरात कठोर शिक्षा त्यांना मिळणे आवश्यक आहे. ते दायित्व सरकारचे आहे. सरकार हे दायित्व पार पाडणार नसेल, तर आगामी काळात जनतेच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने हे वेळीच ओळखणे हिताचे आहे.


Multi Language |Offline reading | PDF