हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आयोजित अधिवेशनांची फलनिष्पत्ती स्पष्ट करणारी काही उदाहरणे !

‘जून २०१८ मध्ये गोवा येथे झालेल्या सप्तम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’त आणि ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण-अधिवेशना’त सहभागी झालेले संत, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, दिलेला प्रतिसाद यांविषयीचा वृत्तांत थोडक्यात पुढे देत आहोत.

श्री. आनंद जाखोटिया

१. राजस्थान

१ अ. अधिवेशनाहून आल्यापासून सनातनचाच प्रचार करत आहोत ! – स्वामी संवित् सोमगिरी महाराज, राजस्थान

राजस्थानहून आलेले स्वामी संवित् सोमगिरी महाराज अधिवेशनासाठी आले होते. त्यानंतर त्यांच्याशी दूरभाषवर बोलणे झाल्यावर ते म्हणाले, ‘‘इथे आल्यापासून आम्ही सनातनचाच प्रसार करत आहोत.’’ स्वामीजींनी माऊंट अबू येथे गेल्यावर तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक घेऊन त्यांना हिंदु राष्ट्राविषयी दिशा दिली.

१ आ. स्वामी संवित् सोमगिरी महाराज, राजस्थान यांचे शिष्य स्वामी समानंदगिरीजी यांनी सांगितलेली सूत्रे

१. ‘‘तुमची संस्था पुष्कळ मोठ्या आणि मोकळ्या मनाची (ओपन माईंडेड) आहे. अन्य संस्थांमध्ये असे नसते. एकप्रकारच्या चौकटीत ते कार्य करत असतात.’’

२. सनातन वहीविषयी ते म्हणाले, ‘‘तुम्ही अप्रतिम वह्या सिद्ध केल्या आहेत. ज्या गोष्टींचा आम्ही विचारही केला नव्हता, त्या तुम्ही आधीच करून ठेवल्या आहेत.’’

३. अधिवेशनाविषयी ते म्हणाले, ‘‘अधिवेशनातील महत्त्वाच्या भाषणांचे संकलन करून ते आपल्या संपर्कातील सर्व संतांपर्यंत पोचवले पाहिजे. जेणेकरून त्यांच्या भक्तांपर्यंत धर्माची स्थिती पोचेल.’’

२. मध्यप्रदेश

२ अ. एकाच जिल्ह्यात कार्यरत दोन संघटनांचा परस्पर परिचय अधिवेशनात होणे : मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात कार्यरत दोन संघटनांचा आपसांत परिचय नव्हता. मध्यप्रदेशातून दूर गोवा येथील अधिवेशनात त्यांचा परस्पर परिचय झाला. त्यानंतर एकमेकांच्या क्षेत्रात गेल्यावर त्यांनी आपसांत भेटण्यास प्रारंभ केला.

२ आ. श्री ऋषि गुुरुकुलाचे देवकरण शर्माजी यांनी विद्यार्थ्याप्रमाणे अधिवेशनातील विषय लिहून घेणे आणि स्थानिक स्तरावर संघटन करण्यासाठी पुढाकार घेणे : ‘उज्जैन, मध्यप्रदेश येथून आलेले श्री ऋषि गुरुकुलाचे श्री. देवकरण शर्माजी यांना सनातन आश्रम आणि अधिवेशन पाहून हृदयातून आनंद होत होता’, असे त्यांच्याशी बोलतांना जाणवले. ते एका विद्यार्थ्याप्रमाणे अधिवेशनातील प्रत्येक विषय लिहून घेत होते. स्थानिक स्तरावर संघटन होण्यासाठी त्यांनी तेथील अधिवेशन आणि पुढील वर्षी गोवा येथे होणारे अधिवेशन, यांसाठी अर्पण करण्याची सिद्धता दर्शवली.

३. प्रयाग, उत्तरप्रदेश

३ अ. प्रयाग येथील अनेक हिंदुत्ववाद्यांनी साधनेची प्रक्रिया सविस्तर समजून घेणे : येथील अनेक हिंदुत्वनिष्ठ साधना शिबिराला थांबले. साधना समजून घेतल्यावर त्यांना ‘आपण व्यष्टी किंवा समष्टी जीवनात कोठे थांबलो आहोत’, याची जाणीव झाली. अनेकांनी साधनेची प्रक्रिया विस्ताराने समजून घेतली.

३ आ. सुश्री नीरा सिंह यांनी ‘साधना शिबिरा’त सर्वांसमोर स्वतःचे दोष सांगणे आणि शिबिरात जे शिकायला मिळाले, ते कुठेच शिकायला न मिळाल्याचे त्यांनी सांगणे : प्रयाग, उत्तरप्रदेश येथून आलेल्या सुश्री नीरा सिंह यांनी ‘साधना शिबिरा’त सर्वांसमोर आपले दोष सांगितले. अनेक गावांमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य चालू आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सामाजिक जीवनात अनेक वर्षांपासून आहे. अनेक व्यक्ती आणि संस्था यांच्या संपर्कात आले; पण इथे जे शिकायला मिळाले, ते अन्यत्र कोठेही मिळाले नाही.’’ हे सांगतांना त्यांचा कृतज्ञतेचा भाव दाटून आला होता.

४. रामनाथी आश्रम, तेथील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन आणि साधना शिबिर यांचा लाभ घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांमध्ये जाणवलेले पालट

अधिवेशनानंतर मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा झाल्या. रामनाथी येथील सनातन आश्रम, तेथील सूक्ष्म-जगताविषयीची प्रदर्शनी आणि साधना शिबिर यांचा लाभ घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांमध्ये पुढील पालट दिसले.

अ. प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना करण्यास आरंभ केला.

आ. ‘वाईट शक्तींमुळे त्रास होतात’, हे त्यांना लक्षात आले आणि तशी उदाहरणे प्रत्यक्ष अनुभवायला आल्यावर त्यांचा विश्‍वास वाढला.

इ. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी साधकांप्रमाणे चुकांसाठी नम्रपणे क्षमा मागायला प्रारंभ केला.

ई. ‘गोवा येथील अधिवेशनाप्रमाणे आपल्याला आयोजन करायचे आहे’, असा विचार मनात ठेवून ते प्रयत्न करायला लागले.

५. अधिवेशनाला आलेल्यांना सनातन संस्थेचा अन् तिच्या संतांचा आधार वाटू लागणे आणि त्यांनी हिंदु राष्ट्रासाठी झटण्याचा एक उत्साह अन् निर्धार घेऊन जाणे

थोडक्यात अधिवेशनाला आलेल्या धर्मप्रेमींना धर्मकार्याची दिशा मिळाली. धर्मकार्य करणारे आपल्यासारखे अनेक जण आहेत आणि ‘आपल्या पाठीशी कोणीतरी आहे’, याचा आधार त्यांना मिळाला. काही जण नुकतेच संपर्कात आलेले असूनही जातांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सनातनच्या संतांविषयी त्यांना अपार कृतज्ञता वाटत होती. कोणी सनातनच्या संतांना मार्गदर्शकाच्या रूपात, कोणी मात्या-पित्यासमान, तर कोणी एक आधारवड म्हणून पहात होता. अनेकांनी संतांचे चरण धरले. संतही त्यांना प्रेमाने जवळ घेऊन धर्मकार्यासाठी आश्‍वस्त करत होते. ‘अधिवेशनाला आलेला प्रत्येक धर्माभिमानी हिंदु राष्ट्रासाठी झटण्याचा एक उत्साह आणि निर्धार घेऊन येथून गेला’, असे मला वाटले.

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥

– श्री. आनंद जाखोटिया, उज्जैन, मध्यप्रदेश. (जुलै २०१८)


Multi Language |Offline reading | PDF