हिंदु राष्ट्र संघटकांनो, गुरु, ग्रंथ आणि गोविंद यांचे आलंबन ठेवून कार्य करा !

गुरु, ग्रंथ आणि गोविंद यांचे धर्मसंस्थापनेच्या कार्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे !

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे

१. गुरु

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्र-धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहोत. हे आपले महत्भाग्य आहे. अध्यात्मातील अधिकारी गुरु द्रष्टे असल्याने काळानुसार आवश्यक धर्मसंस्थापनेसाठी मार्गदर्शन करू शकतात. महाभारतात धर्मराज्यासाठी जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले होते. हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले होते. धर्मविजय मिळवण्यासाठी श्रीगुरूंचा आशीर्वाद आवश्यक असतो; म्हणून संतांच्या किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याचा प्रयत्न करा !

२. ग्रंथ

सनातन धर्मातील ग्रंथ ही हिंदु धर्माची ज्ञानशक्ती आहे. धनुर्वेद (उपवेद), मनुस्मृति, बृहस्पतिनीति, शुक्रनीति, योगवासिष्ठ, रामायण, महाभारतातील शांतीपर्व इत्यादी धर्मग्रंथांमध्ये ‘राज्य कसे चालवावे ?’, याची माहिती आहे. इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वीपासून आपल्याकडे कौटिल्याचे अर्थशास्त्र प्रसिद्ध आहे. त्यात लिहिले आहे की, जलाशयात रहाणारे मासे पाणी कधी पितात, हे कळत नाही. त्याप्रमाणे शासनात कार्य करणार्‍या व्यक्ती पैसे कधी खातात, हे कळत नाही. अशांना शासन करण्यासाठी आर्य चाणक्याने ‘प्रदेष्टा’, म्हणजेच आजच्या भाषेत ‘भ्रष्टाचारविरोधी खाते (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) स्थापन करावे’, अशी सूचना केली होती. त्या काळात सामान्य व्यक्तीच्या भ्रष्टाचाराला १ वर्षाची शिक्षा असेल, तर ‘प्रदेष्टा’ पदभार सांभाळणार्‍या अधिकार्‍याच्या भ्रष्टाचाराला १० वर्षांची शिक्षा घोषित केली होती. जर न्यायाधिशानेही भ्रष्टाचार केला, तर त्याची सर्व संपत्ती सरकारजमा करून त्याला देशाबाहेर हाकलण्याची आज्ञा दिली होती. गंभीर अपराधात तर न्यायाधिशाला फाशीची शिक्षाही देण्याचे विधान होते. स्वातंत्र्यानंतरच्या ७ दशकांमध्ये न्यायदानाच्या क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार असूनही केवळ एका न्यायाधिशावर कारवाई झाली. अनेक न्यायाधीश भ्रष्ट असल्याची माहिती असूनही त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही. ही कसली व्यवस्था आहे ? यासाठी कौटिल्याचे अर्थशास्त्र राज्यव्यवस्थेत हवे.

आमच्याकडे राज्यशास्त्रासह न्यायशास्त्र, धर्मशास्त्र यांसारखी शास्त्रे आणि आचार्य भारद्वाजनिर्मित विमानशास्त्रादी तंत्रज्ञान यांची विशाल परंपरा आहे. युरोपमधील विज्ञान भारतात येण्यापूर्वी भारतात सोने बनवत होते, लोखंड बनवत होते, पुष्पक विमान उडत होते, उंची वस्त्रे बनवली जात होती. इतका विशाल वारसा हिंदु राष्ट्र चालवायला सक्षम आहे.

सनातन संस्थेनेही पुढील १ सहस्र वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी कलियुगातील वैज्ञानिक भाषेत ३१२ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांच्या ७५ लक्षाहून अधिक प्रती देश-विदेशांतील ११ हून अधिक भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. त्यात साधना, अध्यात्म, धर्म, देवतांची उपासना, कला, आयुर्वेद, राष्ट्ररचना आणि धर्मसंस्थापना यांविषयी दिग्दर्शन आहे. अजूनही १० सहस्रांहून अधिक ग्रंथ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संकलित होत आहेत.

३. गोविंद

हे भगवान श्रीकृष्णाचे भक्तीरूप आहे. आद्यशंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्’, असा संदेश दिला होता. श्रीकृष्णाची भक्ती सहजसुलभ असून ती करण्याचे लाभ अनेक आहेत. भगवान श्रीकृष्ण ही धर्मसंस्थापनेची देवता आहे. ‘यदा यदा ही धर्मस्य…’ हे भगवंताचे वचन आहे. आजही धर्माला ग्लानी आली असतांना आपण धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करत आहोत. या कार्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे आपल्याला त्याचा निश्‍चितच आशीर्वाद लाभेल. भावी काळ भीषण आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठीदेखील श्रीकृष्णाची भक्ती आवश्यक आहे; कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होणार नाही !’ श्रीकृष्णाची भक्तीसाधना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे सतत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप करणे. कालमाहात्म्याप्रमाणे वर्ष २०२३ पर्यंत श्रीकृष्णाचा आणि त्यानंतर श्रीरामाचा जप हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणार्‍यांच्या साधनेसाठी पूरक आहे.

गुरु, ग्रंथ आणि गोविंद यांचे आलंबन करून हिंदु राष्ट्र-संस्थापनेचे कार्य केल्याने आपली काळानुसार योग्य साधना होईल.’

– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.


Multi Language |Offline reading | PDF