क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांनी भारतीय सैन्याचे ‘बलीदान चिन्ह’ असलेले ग्लोव्हज वापरण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा आक्षेप

  • आयसीसीचा भारतद्वेष ! भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या देशाच्या सैन्याचे मानचिन्ह असलेले ग्लोव्हज वापरल्यास आयसीसीला पोटशूळ का उठतो ?
  • याविषयी बीसीसीआयने नमती भूमिका न घेता धोनी यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे आवश्यक आहे !

लंडन – इंग्लंडमध्ये सध्या चालू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यांनी त्यांच्या ग्लोव्हजवर (क्रिकेट खेळतांना हातात घालायचे मोजे) भारतीय सैन्याचे ‘बलीदान चिन्ह’ लावले आहे. याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (‘आयसीसी’ने) आक्षेप घेत असे चिन्ह असलेले ग्लोव्हज न वापरण्याचा आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) दिला आहे. याविषयी बीसीसीआयने धोनी यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावर उत्तर देण्यासाठी बीसीसीआयकडून बैठक घेण्यात आली आणि मंडळाकडून एक अधिकारी लंडन येथे जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

१. भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये धोनी यांनी हे चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले  होते. हे चिन्ह सैन्याच्या ‘पॅरा कमांडोज’च्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह आहे. आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूंच्या कपड्यांवर आणि अन्य वस्तूंवर राजकीय, धार्मिक आणि वंश यांविषयी कोणत्याही प्रकारचे लिखाण अथवा चिन्ह लावण्यावर बंदी आहे. यापूर्वी धोनी यांनी मार्च मासामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळतांना सैन्याची टोपी घातली होती.

२. आयसीसीच्या या आदेशावर पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करतांना म्हटले, ‘मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो, तर धोनी यांनी चिन्ह असलेले ग्लोव्हज घातल्यास त्यात काय चुकले ? विश्‍वचषकामध्ये इस्लामी पद्धतीनुसार दाढी आणि मिशा चालतात. धोनी यांच्या ग्लोव्हजची कोणालाही अडचण नसावी.’ या वेळी त्यांनी पाकिस्तानी संघाचे एक जुनेअनादर छायाचित्र ट्वीट केले आहे. यामध्ये संपूर्ण पाकिस्तानी संघ क्रिकेटच्या मैदानातच नमाजपठण करतांना दिसत आहे. त्यावर त्यांनी लिहिले आहे, ‘या प्रार्थनेमध्ये ख्रिस्ती आणि ज्यू लोकांना न्यून लेखले जाते. आयसीसीला केवळ धोनी यांनी घातलेल्या ग्लोव्हजवरील बलीदान चिन्हाचे वावडे आहे.’

३. सामाजिक माध्यमांतूनही आयसीसीच्या आदेशावर भारतियांकडून टीका केली जात आहे. याविरोधात ‘ट्विटर’वर मोहीम चालवण्यात येत आहे.

‘बलीदान चिन्हा’चे महत्त्व

महेंद्रसिंह धोनी यांनी त्यांच्या ग्लोव्हजवर लावलेल चिन्ह कोणालाही वापरण्याची अनुमती नाही. सैन्याच्या पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची अनुमती मिळते. या चिन्हावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलीदान’ असे लिहिलेले असते. हे चिन्ह चांदीपासून बनवलेले असते आणि यावर लाल रंगाचे प्लास्टिकचे आवरण असते. धोनी यांना सैन्याने मानद ‘लेफ्टनंट कर्नल’ हे पद दिलेले आहे. धोनी यांनी पॅराट्रूपिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. धोनी भारतीय सैन्याच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचे सदस्य आहेत. त्यामुळे ते या चिन्हाचा वापर करू शकतात.

(म्हणे) ‘धोनी महाभारतासाठी गेलेले नाहीत !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री फवाद हुसैन

  • पाकचे खेळाडू जिंकल्यावर मैदानातच नमाजपठण करतात, तेव्हा ते खेळण्यासाठी गेलेले असतात कि नमाजपठणासाठी, याचे उत्तर फवाद हुसैन देणार आहेत का ?
  • भारताच्या विरोधात खेळतांना पाक आणि त्याची जनता त्याकडे धर्मयुद्धाच्या दृष्टीने पहाते, तेव्हा फवाद गप्प का असतात ?

पाकचे परराष्ट्रमंत्री फवाद हुसैन यांनीही यावर ट्वीटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करतांना लिहिले आहे, ‘धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत, महाभारतासाठी नाही. भारतीय प्रसारमाध्यमे मूर्खपणा करत वाद निर्माण करत आहेत. भारतीय माध्यमांचा एक गट यासाठी वेडा झाला आहे. जसे की, त्यांना युद्धासाठी सीरिया, अफगाणिस्तान किंवा रवांडा येथे पाठवण्यात येणार आहे.’ यासह फवाद हुसैन यांनी हॅशटॅग म्हणून ‘#Idiots’(वेडे) या शब्दाचा वापर केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF