नैसर्गिक आपत्तींमध्ये धर्मबंधूंचे रक्षण करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन शिकणे आवश्यक ! – मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भविष्यात नैसर्गिक आपत्ती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होणार आहे. या काळात हिंदु बांधवांचे रक्षण करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे. असे जरी असले, तरी ‘हिंदु बांधवांना नेमके कशा प्रकारे साहाय्य करावे’, ‘त्यासाठी सिद्धता कशी करावी’, याविषयी आपल्या मनात शंका येतात. याविषयीचे निरसन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशनात केले. त्यांच्या भाषणाचे सार येथे देत आहे.

वक्ते : श्री. मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.

‘आगामी काळ हा नैसर्गिक आपत्तींनी भरलेला असेल’, असे अनेक द्रष्ट्या संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. भविष्यकथनाच्या प्रचलित विविध पद्धतींपैकी एक असलेल्या नाडीभविष्यात तर म्हटले आहे की, येणार्‍या काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडेल. नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी निर्माण होईल. अशा आगामी भीषणकाळात आपल्याला धर्मबंधुत्वाच्या नात्याने हिंदूंच्या साहाय्यार्थ उभे ठाकावे लागेल. जनतेला संकटसमयी आधार दिला, तरच आपल्याला त्यांचा विश्‍वास संपादन करणे शक्य होईल आणि पुढे त्यांना हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील करता येईल. त्यामुळे भारतात कुठेही आपत्ती आली, तरी आपल्याला हिंदूंना संघटितपणे साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्या दृष्टीने आज आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्व काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ.

श्री. मनोज खाडये

१. आपत्तीचे प्रकार आणि त्याची उदाहरणे

आपत्ती कोणत्याही स्वरूपात येऊ शकते. त्यात भूकंप, महापूर, त्सुनामी लाटा, चक्रीवादळे, अग्नीप्रलय, ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा युद्ध, अणूबॉम्बस्फोट, दंगली, हिंसाचार, चेंगराचेंगरी यांसारख्या मनुष्यनिर्मित आपत्ती असतील. यांना तोंड देण्याची सिद्धता जितकी असेल, तितकी हानी अल्प होईल.

२ आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता !

२ अ. आपत्कालीन घटनेचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेणे : सर्वप्रथम आपत्तीच्या घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंपाची तीव्रता ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ? इत्यादी. अशी माहिती विविध प्रसारमाध्यमे आणि शासकीय संकेतस्थळे यांच्या आधारे जाणून घेता येते. मध्यम आणि मंद स्वरूपाच्या घटनेत आपण संघटितपणे साहाय्य करू शकतो, तर मोठ्या आपत्तीत आपण प्रशासन किंवा सैन्याला साहाय्य करू शकतो.

२ आ. आपत्कालीन साहाय्यकार्य करण्याविषयीचा प्राधान्यक्रम ठरवणे : घटनेचा अभ्यास केल्यानंतरच ‘आपण कुठल्या प्रकारचे साहाय्य करायचे’, हे ठरवता येते. उत्तराखंडला जलप्रलय आल्याने मार्गांवर दगड आले होते. त्यामुळे तेथे शासकीय यंत्रणा आणि सैन्य यांना साहाय्य पोेचवणे कठीण होते. अशा वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गावरील मोठेमोठे दगड हटवून महामार्ग मोकळा केला. परिणामी खाद्यान्नाचे ट्रक, सैन्याच्या गाड्या, रुग्णवाहिका आदींचे साहाय्यकार्य चालू होऊ शकले. नेपाळमध्ये भूकंपांमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्या वेळी पडलेल्या इमारतींचा ढिगारा बाजूला करण्याचे काम समितीच्या पथकाने केले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये पूर आल्यानंतर अनेकांच्या घरात पाणी आले असल्याने त्यांच्यापर्यंत खाद्यान्न पोेचवण्याचे कार्य शिवसेनेने केले.

२ इ. आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता पडताळून त्यानुसार जागरूक रहाणे : बर्‍याचदा भूकंप, अतीवृष्टी यांसारखी आपत्ती एकदा येऊन गेल्यानंतर पुन्हा येण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण करणार असलेल्या साहाय्यकार्यात अडथळे येऊ शकतात. नेपाळमध्ये साहाय्यकार्य करतांना अनेक वेळा आम्ही भूकंपांचे धक्के अनुभवले आणि सतर्कतेने स्वतःचे प्राणही वाचवले.

२ ई. पूर्वसिद्धतेसाठी घटनास्थळाच्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेणे : दर्‍याखोर्‍यांत वा डोंगराळ भागांत नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्यानंतर तेथील भौगोलिक स्थिती बिकट होते. अशा वेळी तेथे जाण्यासाठी आधीच पूर्वसिद्धता करावी लागते. उत्तराखंडमध्ये ‘रोप क्लायबिंग’ची उपकरणे नेल्याने लाभ झाला. नेपाळमध्ये भूकंपप्रवण स्थिती असल्याने तेथे रहाण्यासाठी तंबूंचा उपयोग झाला.

२ उ. वाहतूक व्यवस्थेची माहिती घेणे : घटनास्थळी पोेहोचण्यासाठी वाहतुकीची कोणती माध्यमे उपलब्ध आहेत, याची माहिती घेतल्यास साहाय्यकार्य करणे सुलभ होते. उत्तराखंडमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी १० आसनांचे वाहन, तर नेपाळ दुर्घटनेच्या वेळी ३० आसनांची बस नेली होती. त्याचा साहित्य आणि स्वयंसेवक यांची ने-आण करण्यासाठी त्याचा लाभ झाला.

हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, आपत्तीचा सामना कधी करावा लागेल, ही वेळ सांगून येत नाही. त्यामुळे अशा काळात धर्मबंधूंना संघटित साहाय्य करण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. भारतात कुठेही आपत्ती आली, तरी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सर्व संघटनांनी धर्मबंधूंच्या साहाय्यासाठी संघटितपणे कार्य करायचे आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला साहाय्य करील. यापूर्वी उत्तराखंडमधील जलप्रलयाच्या वेळी ३ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केले. नेपाळमध्ये भूकंपाच्या वेळी भारतातील ५ आणि नेपाळमधील ५ संघटनांनी एकत्र येऊन साहाय्यकार्य केले. ही आपल्यासाठी उदाहरणे आहेत. काही बिकट स्थितीत आपल्याला आपत्तीग्रस्तांची प्रेते उचलून मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कारही करण्याची सिद्धताही ठेवावी लागेल. हे सर्व करतांना सत्त्वगुणी हिंदूंचे रक्षण करायचे आहे.

‘आगामी आपत्काळात हिंदु समाजासाठी संघटितपणे साहाय्यता करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF