कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरात प्रवेश करणार्‍यांसाठी ड्रेस कोड लागू

मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचा स्तुत्य आणि अभिनंदनीय निर्णय !

मंदिर परिसरात लावण्यात आलेला एक फलक

फोंडा, ६ जून (वार्ता.) – कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा देवस्थान समितीने १ जूनपासून मंदिरात प्रवेश करणारे पर्यटक, महाजन आणि सर्व भाविकवर्ग यांच्यासाठी वेशभूषा आचारसंहिता (ड्रेस कोड) लागू केली आहे. यापूर्वी भाविकांसाठी अशाच प्रकारची वेशभूषा आचारसंहिता म्हार्दोळ येथील श्री महालसा मंदिर आणि मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान समिती यांनी लागू केली आहे. जुने गोवे येथील चर्चमध्ये प्रवेश करणार्‍यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयाला अनुसरून मंदिर समितीचे सदस्य दिलीप गायतोंडे प्रसारमाध्यमांना म्हणाले,पर्यटकांना या निर्णयामुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात प्रवेश करतांना समिती पर्यटकांना विनामूल्य बाह्यवस्त्र पुरवणार आहे. नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी देवस्थान समिती सुरक्षारक्षक नेमण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सोसत आहे. गोव्यातील भाविकांकडून मागणी आल्याने मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. वेशभूषा आचारसंहितेचे फलक मंदिराचे प्रवेशद्वार आणि परिसरात इतर ठिकाणी लावण्यात आले आहेत. यानुसार मंदिरात शॉटर्स, मिनि स्कर्ट, मिडीज, स्लिव्हलेस टॉप, लो वेस्ट जीन्सआणि टी-शर्ट परिधान केलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करणार्‍यांसाठी गोव्यातील इतर मंदिरांनीही अशाच प्रकारे वेशभूषा आचारसंहिता लागू केल्यास पर्यटक मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखू शकतील.

तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालण्याची रणरागिणीने गोव्यातील विविध मंदिर विश्‍वस्तांकडे यापूर्वीच केली होती मागणी

फोंडा – मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी रणरागिणी शाखेने यापूर्वी केली होती. कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थान समितीसह गोव्यातील काही इतर मंदिरांच्या समित्यांकडे रणरागिणीने एका निवेदनाद्वारे सुमारे २ वर्षांपूर्वी ही मागणी केली होती. रणरागिणीने या निवेदनात म्हटले होते की, गोव्यातील काही मंदिरांमध्ये युवती आणि काही महिला तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करतांना आढळतात. तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करणे, ही धर्महानी आहे. हे रोखण्यासाठी मंदिराच्या विश्‍वस्तांनी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालून त्यासंबंधीचे फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावावेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now