भ्रमणभाषमध्ये खेळ खेळतांना स्फोट होऊन विद्यार्थ्याचा डोळा निकामी

भ्रमणभाषच्या अतिरेकी वापराचा दुष्परिणाम !

कोल्हापूर, ५ जून – भ्रमणभाषवर खेळ खेळतांना स्फोट होऊन त्यातील एक भाग डाव्या डोळ्यात घुसल्याने उंदरवाडी (ता. कागल) येथील १६ वर्षीय मुलाचा डोळा निकामी झाला आहे. या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा दिली होती. (कोल्हापूर जिल्ह्यातच काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी भ्रमणभाषवर सलग तीन दिवस खेळ खेळल्याने बेशुद्ध पडला होता. भ्रमणभाषच्या खेळाचे वाढते दुष्परिणाम पहाता सरकार आणि पालक यांनी त्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना काढली पाहिजे ! – संपादक) हा विद्यार्थी गुरांना वैरण घातल्यावर घराच्या उंबरठ्यावर भ्रमणभाषवर खेळ खेळत होता. थोड्या वेळाने भ्रमणभाष गरम होऊन त्याचा स्फोट झाला. त्यातील धातूचा एक भाग त्याच्या डोळ्यात घुसला. विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती केल्यावर नेत्ररोग तज्ञांनी शस्त्रकर्म करून तुकडा बाहेर काढला; मात्र त्याला एका डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. संबंधित भ्रमणभाष आस्थापनाच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करणार असल्याचे विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF