हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यासाठी गुणसंवर्धन आणि कौशल्यविकास करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’स उत्साहात प्रारंभ

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), रामनाथी (गोवा), ५ जून (वार्ता.) – येणार्‍या काळात हिंदूसंघटनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. हे करतांना समविचारी राष्ट्र-धर्मप्रेमी आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संघटन प्राधान्याने करायचे आहे; कारण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत हेच हिंदू प्रत्यक्ष योगदान देणार आहेत. बर्‍याच वेळी हिंदुत्वनिष्ठ भावनेच्या पोटी कार्य करतात. भावनेपोटी केलेले कार्य परिणामकारक नसते. उलट त्यामुळे धर्मकार्यात अडचणी निर्माण होण्याचा धोका असतो; म्हणून हे धर्मकार्य विचारपूर्वक, दायित्वाने आणि साधनेचे अधिष्ठान ठेवून करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांनी कौशल्यविकास आणि गुणसंवर्धन करण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुुरु नंदकुमार जाधव यांनी केले. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत ५ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सद्गुुरु नंदकुमार जाधव

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ उपस्थित होते. या अधिवेशनासाठी देशातील विविध राज्यांतून २३६ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित आहेत.

८ जूनपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राच्या मूलभूत संकल्पना, पुरोगाम्यांकडून घेतले जाणारे आक्षेप आणि त्याचे वैचारिक खंडण आदी विषयांवर उद्बोधन करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रायोगिक भाग, अनुभवकथन आदी सत्रांमधूनही हिंदुत्वनिष्ठांना दिशा देण्यात येणार आहे.

या अधिवेशनाचा प्रारंभ सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु नंदकुमार जाधव, कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा आणि सनातन संस्थेचे विदर्भ समन्वयक पू. अशोक पात्रीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी आणि पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले. अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी वाचन केले.

वेदकाळापासूनच्या ‘हिंदु राष्ट्र’ या प्राचीन संकल्पनेची स्वातंत्र्योत्तर काळात मोडतोड करण्यात आली ! – रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे

देश आणि राष्ट्र या संकल्पना वेगळ्या आहेत. देश ही संकल्पना भौगोलिक सीमांशी संबंंधित आहे, तर राष्ट्र ही संकल्पना प्राचीन इतिहास, परंपरा, संस्कृती आणि आस्था यांच्याशी निगडित आहे. हिंदु राष्ट्र ही वेदकाळापासून चालत आलेली प्राचीन संकल्पना आहे; पण स्वातंत्र्योत्तर काळात ही संकल्पना षड्यंत्रपूर्वक भारतियांच्या मनातून पुसण्याचा प्रयत्न झाला. स्वतंत्र भारतात हिंदूंची स्वतःची शास्त्रीय कालमापन पद्धत लागू करायला हवी होती; पण ती सोडून अतिशय घोळ असलेली ग्रेगोरियन कालमापन पद्धत लागू करण्यात आली. धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंच्या प्राचीन संकल्पना नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. ८०० वर्षे लढा दिल्यानंतरही धर्मांध हे आसाम जिंकू शकले नाहीत, याउलट स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा वापर करून निम्म्यापेक्षा अधिक आसामवर धर्मांधांनी ताबा मिळवला आहे आणि ते आज ‘ग्रँड बांगलादेश’ निर्माण करू पहात आहेत. याच धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत काश्मीरमधील हिंदूंना जिहादी आतंकवादामुळे विस्थापित व्हावे लागले. राज्यघटनेत अल्पसंख्यांकांसाठी विशेष कायदे आहेत. त्यानुसार अल्पसंख्यांक मंत्रालय, आयोग निर्माण करण्यात आला. त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आहे; पण बहुसंख्यांक हिंदूंसाठी अशी व्यवस्था नाही. राज्यघटनेमध्येच अंतर्विरोध आहे. हिंदूंनी संघटित होऊन या दुटप्पीपणाच्या विरोधात कार्यरत रहायला हवे.


Multi Language |Offline reading | PDF