यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६० सहस्र कोटी रुपयांचा व्यय ! – ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज्’च्या अहवालातील माहिती

  • भाजपचा व्यय तब्बल २७ सहस्र कोटी रुपये

  • निवडणुकीच्या खर्चातच भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचीही माहिती

  • गरिबीमुळे भारतातील अनुमाने अर्धीअधिक जनता एकवेळ उपाशी असतांना केवळ निवडणुकांवर ६० सहस्र कोटी रुपये व्यय करणे कितपत योग्य ?
  • राजकीय पक्षांनी वेळोवेळी जनहिताची कामे केली असती, तर त्यांना एवढा पैसा व्यय करण्याची आवश्यकता भासली नसती !

नवी देहली – यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वांत महागडी निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत तब्बल ६० सहस्र कोटी रुपयांचा व्यय (खर्च) करण्यात आला आहे. यांपैकी २७ सहस्र कोटींची रक्कम (अनुमाने ४५ टक्के) ही एकट्या भाजपने व्यय केली आहे. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज्’ने नुकत्याच घोषित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ मधील निवडणुकांवर झालेल्या व्ययाची (खर्चाची) तुलना केल्यास वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा व्यय हा एक अब्ज रुपयांवर जाऊ शकतो’, अशी शक्यताही या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

(मंदिरांचा पैसा गरिबांना वाटण्याविषयी कायम आरोळ्या ठोकणारे पुरो(अधो)गामी, नास्तिक, कथित विचारवंत आता निवडणुकीवर प्रचंड प्रमाणात होणारा खर्च थांबवून तो पैसा गरिबांना वाटण्याचा आग्रह का धरत नाही ? तब्बल ६० सहस्र कोटी रुपये व्यय करून जनतेला गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी आणि दुराचारी लोकप्रतिनिधी देणारी लोकशाही नको, तर सात्त्विक, नि:स्वार्थी, त्यागी अन् चारित्र्यसंपन्न राज्यकर्ते देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक)

याविषयी एका इंग्रजी वर्तमानपत्राला माहिती देतांना ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज्’चे अध्यक्ष एन्. भास्कर राव म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या खर्चातच भ्रष्टाचाराचे मूळ आहे. हे मूळ जर आपण शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार आपण कदापि संपवू शकणार नाही. यासाठी जनतेने जागृत होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योग्य पावले उचलावीत.’’

हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्‍लेषण यांचा समावेश आहे. यातील माहितीनुसार निवडणुकीसाठी ६० सहस्र कोटी रुपये व्यय होणे, म्हणजे एका मतदारावर अनुमाने ७०० रुपये व्यय झाले आहेत. याशिवाय १२ ते १५ सहस्र कोटी रुपये थेट मतदारांना वाटण्यात आले आहेत, तर २० ते २५ सहस्र कोटी रुपये प्रसिद्धीवर व्यय करण्यात आले आहेत. या रकमेपैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून देण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भाजपचा व्यय तब्बल २७ सहस्र कोटी रुपये !

निवडणुकीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा व्यय करणारा भाजप महाराष्ट्रात विकासकामांच्या पूर्ततेसाठी शिर्डीसारख्या मंदिरांचा पैसा वापरतो !

‘नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत व्यय झालेल्या ६० सहस्र कोटी रुपयांपैकी एकट्या भाजपने तब्बल २७ सहस्र कोटी रुपये (अनुमाने ४५ टक्के) व्यय केले आहेत. ६० सहस्र कोटी रुपयांपैकी १५ ते २० टक्के व्यय हा निवडणूक आयोगाने केला आहे’, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF