अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेच्या विरोधात ठराव संमत करण्याची मागणी

आसामच्या सिलचर जिल्हा बार असोसिएशनला हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन सादर

 ७ जूनला जिल्हा बार असोसिएशनमध्ये बैठकीचे आयोजन

सिलचर (आसाम) – डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) हा खटला लढवणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेली अटक धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. अन्वेषण यंत्रणांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. ‘जिल्हा बार असोसिएशन’ने या प्रकरणी बैठक बोलवावी आणि अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध करणारा ठराव संमत करावा. ठरावाची प्रत आवश्यक कारवाईसाठी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ला पाठवावी, अशा मागणीचे निवेदन आसाम येथील हिंदुत्वनिष्ठांकडून सिलचर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांना देण्यात आले. या वेळी अधिवक्ता राजीव नाथ, सोमण चौधरी, अब्दुलहाई लष्कर, शशांक देय, रत्नाकर भट्टाचार्य, मृगांक भट्टाचार्य, मितरी देय यांच्यासह ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता उपस्थित होते. या प्रकरणी ७ जूनला ‘जिल्हा बार असोसिएशन’ने बैठक आयोजित केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. अधिवक्ता आणि त्यांचे अशील यांच्यातील संभाषण हे खटल्याच्या युक्तीवादासाठी कायद्याने ग्राह्य आहे. तो गुन्हा ठरवला जाऊ शकत नाही. तसे केल्यास तो एक चुकीचा पायंडा ठरेल.

२. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अनेक वेळा भूमिका पालटली आहे. पूर्वी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे सारंग अकोलकर आणि विनय पवार हे खुनी असल्याचे सांगण्यात आले. २ वर्षांनी म्हणजे वर्ष २०१८ मध्ये सीबीआयने स्वत:ची भूमिका पालटली आणि आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्याचा दावा केला जात आहे. अटक करण्यात आलेल्यांविषयीही खटला चालवण्यासही विरोध करून सीबीआय वेळकाढूपणा करत आहे.

३. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे न्यायासाठी लढत आहेत. अशा अधिवक्त्यांना आरोपीने काही मासांपूर्वी दिलेल्या कबुलीजबाबावरून अटक केली जाणे, हे एक षड्यंत्रच आहे.

४. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे, तसेच सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या विसंगत दाव्यांविषयी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF