हिंदु राष्ट्र अधिवेशनातील मान्यवरांचे प्रांतभेद विसरून साधना आणि धर्मकार्य यांचा संगम साधण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापक विचारधारा अंगीकारावी ! – पू. संतश्री डॉ. संतोषजी महाराज, शिवधारा आश्रम, अमरावती, महाराष्ट्र

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), ४ जून (वार्ता.) –  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक रूपरेषा, कृतीआराखडा आणि हिंदूंसाठी नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरीच्या काळात सिंधी समाज अन्न, वस्त्र आणि निवास यांमध्ये अडकल्याने मधल्या काळात संस्कृतीकडे दुर्लक्ष झाले; पण आता परिस्थिती पालटली आहे. सिंधी समाजही धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यात अग्रेसर आहे. हिंदु राष्ट्र तर येणारच आहे; मात्र त्यासाठी संप्रदायांना संकुचितता सोडून व्यापक होऊन कार्य करावे लागेल, असे आवाहन अमरावती (महाराष्ट्र) येथील शिवधारा आश्रमाचे पू. संतश्री डॉ. संतोषजी महाराज यांनी केले. अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये ३ जून या दिवशी झालेल्या सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी तमिळनाडू येथील हिंदु मक्कल कच्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर, मुंबई येथील सौ. मीनाक्षी शरण, नवी देहली येथील अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव श्री. मुन्ना कुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. सनातन संस्थेचे विदर्भ प्रांताचे धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर यांनी पू. संतश्री डॉ. संतोषजी महाराज यांचा सन्मान केला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून होणारा साधना अन् धर्मप्रसार यांचा संगम कौतुकास्पद ! – पू. संतश्री डॉ. संतोषजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना धर्मजागृती अन् हिंदु राष्ट्राची स्थापना हे विषय राष्ट्रीय स्तरावर मांडत आहेत. साधारणतः असे चित्र असते की, धर्मप्रसार करणारे लोक साधना करत नाहीत आणि साधना करणारे धर्मरक्षण करत नाहीत; पण या ठिकाणी ‘साधना आणि धर्मप्रसार’ यांचे मिलन जाणवले. असेच कार्य सध्याच्या काळात आवश्यक आहे. येथे हिंदु राष्ट्राचा जो उद्घोष होत आहे, त्याचा मूळ उद्देश धर्मरक्षण आणि संस्कृतीरक्षण हा आहे. हे कौतुकास्पद आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न होत आहे. येथे शिकलेले विषय हिंदुत्वनिष्ठांनी आपापल्या प्रांतात जाऊन कृतीत आणायला हवेेत. जे संत केवळ स्वतःच्या साधनेकडे आणि वैयक्तिक आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देत आहेत, त्यांच्यापेक्षाही सर्व समाजाला साधना सांगून त्यांच्याकडून ती करवून घेणारे संत श्रेष्ठ आहेत. आपलेही जीवन तेव्हाच धन्य होईल, जेव्हा स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसह समाजाची साधना होण्यासाठीही प्रयत्न केले जातील. ‘एका मोठ्या व्यासपिठावरून हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होत आहेत’, हे पाहून आनंद झाला.

‘अखंड हिंदु राष्ट्र निर्माण होईल’, यावर गुरुजींचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) विश्‍वास आहे; पण त्यासाठी आपण कर्मयोगी व्हायला हवे’, असेही पू. संतश्री डॉ. संतोषजी महाराज म्हणाले.

सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एन्आर्सी) लागू करा ! – सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय संयोजक, भारत रक्षा मंच

घुसखोरीच्या विरोधात एक सक्षम कायदा करण्याची आवश्यकता आहे. बाहेरील देशांतील लोकांना भारतात नोकरीसाठी यायचे असल्यास, त्यांना ‘वर्क परमिट’ घेणे बंधनकारक करावे. त्यामुळे अन्य देशातून आलेल्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती प्रशासनाकडे राहील. सीमावर्ती राज्यांमध्ये भारताकडून ‘एन्आर्सी’ (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) च्या अंतर्गत नागरिकांची ओळख पटवून त्यांना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेच्या अंतर्गत आसाममधील ३ कोटी ३० लाख लोकांपैकी ४० लाख लोकांकडे भारतियत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. भारत बांगलादेशी घुसखोरमुक्त करण्यासाठी सीमावर्ती राज्यांप्रमाणे सर्व राज्यांमध्ये ‘एन्आर्सी’ची प्रक्रिया राबवायला हवी. अलीकडे भारत-बांगलादेश सीमेवर तारेचे कुंपण घालण्यात आले. त्यामुळे घुसखोरी काही प्रमाणात नियंत्रित झाली आहे. खोटे चलन, अमली पदार्थ, गोवंश आणि महिला यांची ‘तस्करी’ थांबली. आता भारतातील ३ ते ५ कोटी घुसखोरांना बाहेर घालवणे आवश्यक आहे. ज्या हिंदूंना अत्याचारांमुळे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांमधून भारतात यावे लागले, त्यांना नागरिकत्व मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

इतिहासातील खरे नायक हिंदु राजा होते ! – सौ. मीनाक्षी शरण, मुंबई

हिंदूंच्या इतिहासात अनेक थोर नायक झाले आहेत. या नायकांची माहिती समोर आणली पाहिजे. सध्याच्या मुलांना चित्रपटातील अभिनेते नायक वाटतात; पण इतिहासातील खरे नायक हे हिंदु राजा होते. त्यांनी मुसलमान आक्रमकांशी संघर्ष केला आणि हा देश जिवंंत ठेवला. वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानमधील हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. त्या वेळी अनुमाने १० लक्ष हिंदूंचे हत्याकांड करण्यात आलेे. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आतापर्यंत मुसलमान हिंदूंशी द्वेषभावनेने वागत आले आहेत; मात्र तरीही काही हिंदूंचे डोळे उघडले नाहीत.

विदेशींनी योग, प्राणायाम आदी हिंदु ग्रंथातील माहिती उचलली. त्याचा व्यवसाय करून ते कोट्यवधी रुपये कमावत आहेत. हिंदु मात्र या सर्वांपासून वंचित आहेत किंवा विदेशींकडून शिकत आहेत. हिंदु चराचरातील ईश्‍वराला वंदन करतो. हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे; म्हणून हिंदु हाच खरा धर्म असून अन्य सारे पंथ आहेत. त्यामुळे सर्वधर्मसमभाव होऊ शकत नाही.

सौ. शरण यांनी त्यांच्या कुटुंबियांनी फाळणीच्या वेळी भोगलेल्या हृदयद्रावक यातनांविषयी माहिती दिली. तेव्हा त्यांच्या भावना अनावर झाल्या.

तमिळनाडू राज्याची स्थिती जम्मू-काश्मीरसारखी ! – अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कच्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रमुक सरकारमुळे जम्मू-काश्मीर राज्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तेथे हिंदु धर्मीय आणि भारत देश यांच्या विरोधातील शक्ती शिरजोर झाल्या आहेत. द्रमुक पक्षाची नास्तिकतावादी भूमिकाही छद्म नास्तिकतावादाची आहे. त्यांच्या दृष्टीने ‘केवळ ‘हिंदु देवता’ अस्तित्वात नाहीत’; पण अल्ला आणि येशू यांच्याविषयी त्यांचे काही म्हणणे नाही. ख्रिस्त्यांसह युती करून ते हिंदु धर्मावर आघात करत आहेत. चित्रपट आणि मालिका यांच्या माध्यमातून ते हिंदुविरोधी विचार लोकांवर लादत आहेत. जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. आतापर्यंत राज्यामध्ये १७३ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या वेचून वेचून हत्या केल्या गेल्या; मात्र याविषयी आवाज उठवला जात नाही. तो उठवला गेला पाहिजे.

श्री. अर्जुन संपथ यांनी केलेली प्रेरणादायी वक्तव्ये

  •  हिंदु राष्ट्र हा प्रत्येक हिंदूचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
  •  भारत देश जर देह असेल, तर हिंदु धर्म हा त्याचा आत्मा आहे आणि देवभक्ती अन् देशभक्ती हे त्याचे २ डोळे आहेत.

जात आणि प्रांत भेद विसरून ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हा ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय महासचिव, अखिल भारत हिंदु महासभा

राजकीय पक्षांनी हिंदु समाजाला जातीपातींत विभागले आहे. जात, प्रांत हे भेद विसरून हिंदूंनी एक ‘हिंदु’ म्हणून संघटित व्हायला हवे. हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करायला हवी. सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवून प्राचीन संस्कृतीविषयीही जागृती करायला हवी. तसे झाल्यास हिंदु राष्ट्राचा दिवस दूर नाही.

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करण्याचे कार्य होत आहे. ते पाहून ‘लवकरच लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, याची निश्‍चिती वाटते. यामध्ये सहभागी होऊन हे संघटन बळकट करण्याचा प्रयत्न करूया’, असेही ते म्हणाले.

धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी पोलीस-प्रशासनाला भाग पाडले पाहिजे ! – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी

व्यवस्थेमध्ये राहून प्रस्थापित व्यवस्थेच्या साहाय्याने व्यवस्थेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या नियमांचे पालन करून उपलब्ध गोष्टींच्या साहाय्याने कार्य करायचे आहे; कारण आपण या समाजाचे घटक आहोत. ते आपले उत्तरदायित्व आहे. समाजाचे अस्तित्व असेल, तर आपले कुटुंब सुरक्षित राहू शकते. धर्मांध जिहाद करून समाजात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अतिक्रमण करून अवैधरित्या धार्मिक स्थळे बांधतात; मात्र पोलीस-प्रशासन काही कारवाई करत नाही. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, तरच धर्म, संस्कृती आणि देश टिकू शकतो.

वाराणसी येथील लोकशाही व्यवस्थेमधील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात दिलेल्या कायदेशीर लढाईची माहिती अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF