श्रीरामाप्रती उत्कट भाव असणारे आणि राममंदिर उभारण्यासाठी तन, मन, धन अन् प्रसंगी प्राणही समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान !

  • पू. (अधिवक्ता) हरि  शंकर जैन यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन (वय ३३ वर्षे) आणि ‘दैवी बालक’ असलेला त्यांचा नातू चि. वृषांक यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित ! 
  • अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये संतपद गाठलेले पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे पहिले हिंदुत्वनिष्ठ !

विद्याधिराज सभागृह (रामनाथ देवस्थान), रामनाथी (गोवा), ३ जून (वार्ता.) – धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन ! त्यांचा श्रीरामाप्रती उत्कट भाव आहे. अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर बांधले जावे, यासाठी तन, मन, धन आणि प्राणही समर्पित करण्याची त्यांची सिद्धता असून त्यासाठी २९ वर्षे ते झोकून देऊन न्यायालयीन लढा देत आहेत. असे निष्काम कर्मयोगी असलेले अधिवक्ता पू. हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ३० मे या दिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये दिली. धर्मरक्षणाच्या कार्यासह आध्यात्मिक वाटचालीतही पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन (वय ३३ वर्षे) आणि त्यांचा नातू चि. वृषांक (वय १ वर्ष १० मास) या दोघांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

पू. हरि शंकर जैन यांच्या संतपदाची घोषणा झाली, तेव्हा भावजागृती होऊन त्यांना भावाश्रू आले. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी पू. नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना वाकून नमस्कार केला.

प्रखर हिंदु धर्माभिमानी, धर्मकार्यासाठी सातत्याने कृतीशील, हिंदुत्वनिष्ठांना सातत्याने साहाय्य करणारे आणि सर्व कुटुंबावरही साधनेचे संस्कार करणारे एकमेव पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन !

‘वर्ष २०१२ मध्ये अखिल भारतीय हिंदु अधिवेशन चालू झाल्यानंतर अधिवेशनात घोषित होणारे पहिले धर्मनिष्ठ संत म्हणजे अधिवक्ता हरि शंकर जैन ! एकाच कुटुंबात पिता म्हणजे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे संतपदी विराजमान झाले असून, त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि नातू चि. वृषांक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. असे हे ३ पिढ्या जीवन्मुक्त असलेले (पू. हरि शंकर जैन,

श्री. विष्णु शंकर जैन आणि त्यांचा मुलगा चि. वृषांक शंकर जैन) जैन कुटुंब वैशिष्ट्यपूर्ण आहे. गृहस्थाश्रमात असतांना धर्मकार्य करून जीवन्मुक्त होणारे हे कुटुंब इतर सर्व हिंदुत्वनिष्ठांना पथदर्शक ठरेल. अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा प्रभु श्रीरामाप्रती उत्कट भाव असून ते सतत अनुसंधानात असतात. ते अनुसंधानात असल्यामुळेच त्यांना ध्यान लागल्याची अनुभूती येते. ‘अयोध्येमध्ये श्रीराममंदिर लवकर उभारले जावे’, या तळमळीमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे. अधिवक्ता हरि शंकर जैन यांची अशीच जलद आध्यात्मिक उन्नती होवो, अशी प्रभु श्रीरामचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


Multi Language |Offline reading | PDF