अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित सुटका करा ! – गोवा येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची ‘सीबीआय’कडे मागणी

ही अटक म्हणजे कायद्याने दिलेला ‘पक्षकार-अधिवक्ता’ संवादाचा विशेषाधिकार हिरावून घेण्याचा प्रकार !

बांबोळी, गोवा येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करतांना हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

पणजी, ३ जून (वार्ता.) – कायद्याने ‘पक्षकार-अधिवक्ता’ यांना संवाद साधण्याचा विशेषाधिकार दिला आहे. सीबीआयने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करणे; म्हणजे अधिवक्त्याला असलेला विशेषाधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे. ‘पक्षकार-अधिवक्ता’ या संबंधाचे शोषण करण्याच्या प्रकाराला त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. ‘सीबीआय’ने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेल्या अटकेचा निषेध करून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी ‘सीबीआय’च्या बांबोळी येथील कार्यालयाकडे केली. या वेळी अधिवक्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आणि संबंधित अधिकार्‍यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनावर २६ अधिवक्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (शेष यामध्ये वाराणसी येथील ‘इंडिया विथ विज्डम ग्रुप’चे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, परिषदेचे उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी., परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांच्यासह गोव्यातील अधिवक्ता सत्यवान पालकर, फोंडा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता शैलेंद्र नाईक, अधिवक्ता गजानन नाईक, अधिवक्त्या (सौ.) अनुपमा शिरोडकर आणि अधिवक्ता राजेश गावकर यांचा समावेश आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘सीबीआय’ची ही कारवाई म्हणजे अधिवक्त्यांसाठी मोठा धोका आहे. त्यामुळे यापुढे पक्षकार पोलीस अधिकारी किंवा अन्य कोणीही यांच्या सांगण्यावरून अधिवक्त्यांवर कोणताही आरोप करू शकतो. यासंबंधी ‘बार काऊन्सिल’ आणि ‘बार असोसिएशन’ यांनी काहीही कृती न केल्यास यापुढे अन्य कोणत्याही अधिवक्त्यावर असा प्रसंग ओढवू शकतो. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव यांना पाठवण्यात आल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF