भाजप सरकार प्रथम कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्यानंतर वर्ष २०२४ मध्ये राममंदिराचे बांधकाम चालू करील ! – रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती

म्हणजेच पुढील लोकसभेच्या निवडणुकीतही राममंदिर बांधण्याचे सूत्र असणार, हे यातून स्पष्ट होते !

अयोध्या – केंद्रातील भाजप सरकारला वर्ष २०२० मध्ये राज्यसभेत बहुमत मिळणार आहे. त्यानंतर सरकार पहिल्या टप्प्यामध्ये काश्मीरमधील कलम ३७० रहित करील, दुसर्‍या टप्प्यामध्ये कलम ३५ अ (काश्मिरी नागरिकांव्यतिरिक्त अन्य कोणीही राज्यात जमीन खरेदी करू शकत नसल्याचा कायदा) रहित करील आणि तिसर्‍या टप्प्यात अयोध्येत वादग्रस्त नसलेली भूमी रामजन्मभूमी न्यासाला परत करील आणि चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे वर्ष २०२४ मध्ये राममंदिराचे बांधकाम चालू करील, असे प्रतिपादन रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आणि भाजपचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी अयोध्येत केले. ‘भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात वादग्रस्त नसलेली भूमी न्यासाला देण्यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे. ही भूमी मिळाल्यावर राममंदिराचे बांधकाम चालू होईल’, असे वेदांती यांनी स्पष्ट केले.


Multi Language |Offline reading | PDF