परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी दुर्ग (छत्तीसगड) येथील कु. शर्वरी कानस्कर (वय १२ वर्षे) आणि रत्नागिरी येथील कु. अपाला आैंधकर (वय १२ वर्षे) यांच्या नृत्याच्या वेळी साधिकेला भाव अन् आनंद यांच्या स्तरांवर जाणवलेली सूत्रे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ११.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. शर्वरी कानस्कर आणि रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर या बालसाधिकांनी नृत्य सादर केले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

कु. मेघा चव्हाण

१. भावावस्थेत नृत्य सादर करणार्‍या कु. शर्वरीचे नृत्य पहातांना भावजागृती होणे आणि ‘नृत्य करतांना शर्वरीला जगाचे भान राहिले नसून केवळ स्वतःचे अन् नारायणाचेच अस्तित्व जाणवत असावे’, असे वाटणे

कु. शर्वरी कानस्कर

कु. शर्वरी नृत्य करण्यासाठी आली. तेव्हा ‘ती भावावस्थेत आहे’, असे मला जाणवले. त्या स्थितीतच तिने नृत्याला आरंभ केला आणि तिच्या भावस्थितीचा परिणाम होऊन माझीही भावजागृती होऊ लागली. ‘शर्वरी म्हणजे जणू ‘मीरा’ आहे आणि ‘मीराभावा’तच ती सार्‍या जगाला श्रीमन्नारायणाची महती सांगून ‘बोलो नारायण…नारायण …’ असे म्हणत आहे’, असे मला वाटले. ‘तिची प्रत्येक हालचाल आणि लय केवळ नृत्यालाच धरून नव्हती, तर भावालाही धरून होती. नृत्य करतांना ‘तिला जगाचे भान राहिले नसून केवळ ‘ती आणि नारायण’ एवढेच जाणवत आहे’, असे मला वाटले.

२. कु. अपाला औंधकर हिचे नृत्य पहातांना पुष्कळ आनंद जाणवणे

कु. अपाला औंधकर

यानंतर कु. अपालाचे नृत्य पहातांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘अपाला स्वतःही पुष्कळ आनंदी आहे आणि त्या आनंदातच ती नृत्य करत असल्याने ‘इतरांवरही आनंदाचा परिणाम होत आहे’, असे मला वाटले.’

– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०१९)

कु. शर्वरी कानस्कर हिने केलेले नृत्य पाहून भावजागृती होणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कु. शर्वरी कानस्कर हिने नृत्य सादर केले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले श्री सत्यनारायण रूपात समोर आसनस्थ होते. नृत्य करतांना शर्वरी अतिशय तल्लीन झाली होती. नृत्य झाल्यावर तिने सत्यनारायणाच्या रूपात असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांना नमस्कार केला. ते पाहून माझ्या डोक्यात संवेदना जाणवल्या आणि डोळ्यांत अश्रू आले. मी आजपर्यंत नृत्याचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत; पण नृत्यामुळे भाव जागृत होण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.’

– श्री. विनायक आगवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१९)

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या नृत्य विभागातील बालसाधिका कु. शर्वरी कानस्कर हिच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र

‘कु. शर्वरीला तिच्या वडिलांनी तिच्यासाठी खाऊ म्हणून आंबे पाठवले होते. ते आंबे ती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना वाटत होती. त्यांतील एक आंबा तिने मलाही दिला. त्या वेळी मी तिला म्हटले, ‘‘मी संगीत विभागात नाही आणि मला संगीतातील ‘स’ही येत नाही.’’ त्या वेळी ती मला म्हणाली, ‘‘पण तुला साधनेतला ‘स’ येतो !’’ हे ऐकून मला तिचे पुष्कळ कौतुक वाटले. यातून तिचे विचार आणि बुद्धीची प्रगल्भता लक्षात आली.’

– कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF