हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शकांनी पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत कार्यरत आहेत ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांनी सनातन धर्मावर होणार्‍या आरोपांचे खंडण करणारे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. हे ग्रंथ मार्गदर्शक आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून धर्मविरोधी विचारांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळते. अशी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. पू. (डॉ.) सेन हे विद्वान असूनही त्यांच्यामधील प्रेमभाव, आदर आणि नम्रता या गुणांमुळे ते सर्वांमध्ये मिसळतात. भक्तीच्या जोडीला ज्ञानयोगाच्या मार्गाने साधना करणे कठीण असते; पण या दोन्ही माध्यमांतून ते वर्तमानात आवश्यक असलेले कार्य करत आहेत. ‘पूू. (डॉ.) शिवनारायण सेन हे स्वयंप्रकाशित आहेत. त्यांना आता मन राहिलेले नाही, म्हणजे त्यांचा मनोलय झाला आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.’’

आ. पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे कार्य अतुलनीय ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पू. (डॉ.) शिवनारायण सेन (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘एकेकाळी ज्ञानशक्तीच्या जोरावर भारत विश्‍वगुरुपदी विराजमान होता. त्यानंतरच्या काळात ही ज्ञानशक्ती धर्मद्रोह्यांनी नष्ट केली. हिंदूंना धर्मशास्त्रापासून वंचित केले. एखादी गोष्ट नष्ट करणे सोपे असते; पण ती पुन्हा निर्माण करणे किंवा तिची पुनर्स्थापना करणे फार कठीण असते. त्यासाठी कठोर साधना आणि तत्त्वनिष्ठा असावी लागते. ही ज्ञानशक्ती प्रगट करण्याचे अतुलनीय कार्य ज्ञानी पुरुष करत असतात. पू. (डॉ.) सेन यांचे कार्य असेच आहे. बंगालसारख्या प्रतिकूल वातावरणात राहून असे कार्य करणे, ही मोठी साधना आहे. आम्ही जेव्हा कोलकाता येथे ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’च्या कार्यालयात जातो, तेव्हा पू. (डॉ.) सेन नेहमी ग्रंथलिखाणात व्यस्त असतात, तरीही ते आम्हाला वेळ देतात. कतरास (झारखंड) येथे होणार्‍या सनातनच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यालाही ते आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डॉ. सेन या रत्नाला ओळखले ! – डॉ. कौशिक चंद्र मल्लिक, उप-संपादक, ‘ट्रुथ’ साप्ताहिक, शास्त्र धर्म प्रचार सभा (पू. सेन यांचे भाचे)

‘एक संतच दुसर्‍या संतांविषयी काही सांगू शकतात. रत्नाचे मूल्य रत्नपारख्याला समजते. तसे पू. शिवनारायण सेन कोण आहेत, ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना समजले. पू. शिवनारायण सेन यांच्याविषयी मी काही सांगण्याची माझी पात्रता नाही; पण आज्ञा म्हणून सांगत आहे. पू. शिवनारायण सेन हे मामा लागतात. माझ्या जन्मापासून मी त्यांना पहात आहे. ते जे बोलतात, तेच करतात. त्याचे जीवन आदर्शवत् आहे.  त्यांच्यात षड्विधा शरणागती पाहिली आहे. त्यांचा सन्मान झाल्याविषयी मला आनंद होत आहे. देवाची विशेष कृपा साधूंच्या माध्यमातून आपल्यावर होत असते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराप्रमाणे अद्भुत कार्य करत आहे. महापुरुषाच्या चरणांखालील रजकणाच्या अभिषेकाने देवाजवळ जाण्याची मती होते. सर्वजण यशस्वी होतात; परंतु ज्यांना ईश्‍वर आपला म्हणून स्वीकारतो, तो कधी खाली येत नाही.’ मनोगत व्यक्त करतांना डॉ. कौशिक यांचा भाव जागृत झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF