संभाजीनगर येथील निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) संतपदी विराजमान !

विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी (गोवा), ३ जून (वार्ता.) – अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा प्रत्येक दिवस हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी धर्मकार्याचा नवा अध्यायच ठरत आहे. गेली अनेक वर्षे सनातन संस्थेला विविध प्रकरणांत विनाकारण गोवण्यात आले. अशा काळात सनातनच्या साधकांच्या पाठीशी अनेक जण खंबीरपणे उभे राहिले. सनातनच्या या न्यायालयीन संघर्षाचे योद्धे, कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ३ जून या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी केली. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसापासूनच तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांनी आध्यात्मिक उन्नती केल्याचे घोषित होत आहे.

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर

अधिवेशनात आतापर्यंत घोषित झालेल्या ५ संतांपैकी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी हे सर्वजण न्यायालयीन क्षेत्राशी संबंधित असल्याने आता हिंदु राष्ट्र स्थापनेचा न्यायालयीन लढा लवकरच पूर्णत्वाला जाऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचा संकेतच या माध्यमातून मिळाला.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

सनातनचे उत्तर महाराष्ट्राचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा हार घालून सन्मान केला. पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची एकाच वेळी ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली होती. सन्मान सोहळ्यानंतर पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तर संत अन् साधक यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.


Multi Language |Offline reading | PDF