नामजप, स्वभावदोष निर्मूलन आणि सात्त्विक जीवनपद्धत, या त्रिसूत्रीमुळे आनंदप्राप्ती होते ! – सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

इटली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित ‘आनंदप्राप्ती’ या विषयावरील संशोधन सादर

सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

इटली – सतत सर्वोच्च सुख (आनंद) अनुभवण्याची ओढ, ही मानवाच्या प्रत्येक कृतीमागील प्रेरणा असते. असे असूनही संपूर्ण मानवजात ज्यासाठी आसूसलेली आहे, त्या ‘आनंदप्राप्ती’ या विषयावर सध्याची विद्यालये आणि महाविद्यालये यांमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. नामजप, स्वभावदोष निर्मूलन अन् सात्त्विक जीवनपद्धत या त्रिसूत्रींचा अंगिकार केल्यास सर्वोच्च अन् कायमस्वरूपी टिकणारे सुख, म्हणजेच आनंदप्राप्ती होऊन मनःशांती मिळू शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी केले. त्या ‘हॅपिनेस अ‍ॅण्ड वेलबिईंग’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. ही परिषद ‘डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटिज, युनिव्हर्सिटी ऑफ फोगिया, इटली’ यांनी १६ आणि १७ मे या दिवशी फोगिया, इटली येथे आयोजित केली होती. सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी या परिषदेत १७ मे या दिवशी ‘तणावपूर्ण जगात मनःशांती मिळवण्याचे उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून सद्गुरु सिरियाक वाले, सौ. द्रगाना किस्लोव्हस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

सौ. द्रगाना किस्लोव्हस्की पुढे म्हणाल्या, ‘‘जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी होतो. परिणामस्वरूप स्वतःची मनःशांती आणि सुख यांवर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या जीवनातील समस्यांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी ३ मूलभूत कारणे असतात. जीवनातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समस्या आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेल्या असतात; परंतु त्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांच्या स्वरूपात प्रकट होऊ शकतात. ही आकडेवारी आध्यात्मिक संशोधनातून प्राप्त झाली आहे. प्रारब्ध, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि सूक्ष्मातील वाईट शक्ती, ही ३ प्रमुख आध्यात्मिक कारणे आहेत. समस्येच्या निवारणासाठी त्या समस्येच्या कारणाच्या स्तरानुसार उपाय करावा लागतो. जेव्हा एखाद्या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा उपाययोजनाही आध्यात्मिकच करणे आवश्यक असते. जेव्हा समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, तेव्हा आध्यात्मिक उपायांनी शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्येही साहाय्य होते.’’

सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी आनंदप्राप्ती करण्यासाठी सांगितलेले ३ प्रमुख प्रयत्न

१. नामजप

ही एक सोपी; परंतु शक्तीशाली उपायपद्धत आहे. नामजपातून निर्माण होणार्‍या आध्यात्मिक स्पंदनांमुळे मनाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. ही स्पंदने त्या व्यक्तीभोवती एक सूक्ष्म संरक्षककवच निर्माण करून त्याचे त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण करतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मानुसार सांगितलेला नामजप करू शकते. आजच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा एक अत्यंत उपयुक्त नामजप आहे.

सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी नामजपाच्या सकारात्मक परिणामाचे मापन करण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाविषयी माहिती दिली. ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या कुंडलिनी चक्रांचे मापन केले जाते. या प्रयोगात एका व्यक्तीची कुंडलिनी चक्रे नामजपापूर्वी मध्यभागात नसून बाजूला असल्याचे दिसून आले. त्याने केवळ ४० मिनिटे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केल्यानंतर त्याची चक्रे मध्यभागी एका रेषेत आल्याचे लक्षात आले. कुंडलिनी चक्रांची ही स्थिती त्या व्यक्तीची अधिक चांगली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती दर्शवते.

२. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया

मनातील स्वभावदोषांचे संस्कार नष्ट करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही प्रक्रिया विकसित केली आहे. या प्रक्रियेच्या संदर्भात अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणाविषयी सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी माहिती दिली. या सर्वेक्षणात ही प्रक्रिया राबवणार्‍या ५० साधकांनी सहभाग घेतला होता. त्यातील ९० टक्के साधक व्यावसायिक होते. ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी त्यांना स्वतःच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम करणार्‍या ३ प्रमुख दोषांची यादी करण्यास सांगण्यात आले. साधकांनी सांगितले की, त्यांना या स्वभावदोषांना ५० ते ८० टक्के न्यून करण्यासाठी लागलेला सर्वसाधारण कालावधी २ वर्षे ५ मास एवढा होता. नातेसंबंधांत आणि कार्यक्षमतेत सुधारणा होणे, हे सर्वांनीच अनुभवले असले, तरी ‘नातेसंबंधांत पुष्कळ प्रमाणात सुधारणा झाली’, असे ७३ टक्के साधकांनी सांगितले, तर ‘कार्यक्षमतेत पुष्कळ प्रमाणात सुधारणा झाली’, असे ७७ टक्के साधकांनी सांगितले.

३. सात्त्विक जीवनपद्धत अंगिकारणे

स्वतःची प्रत्येक कृती आणि विचार यांत आपल्यातील सकारात्मकता किंवा नकारात्मकता वाढवण्याची क्षमता असते. जसजशी आपली आध्यात्मिक उन्नती होत जाते, तसतशी आपल्यात आपले कपडे, संगीत, आहार, पेय इत्यादी दैनंदिन जीवनशैलीतील निर्णयांमुळे निर्माण होणारी स्पंदने जाणण्याची क्षमता निर्माण होते. आपली निवड जेवढी सात्त्विक असेल, तेवढा आपल्या जीवनात अधिकाधिक प्रमाणात आनंद आणि मनःशांती येते.


Multi Language |Offline reading | PDF