पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

पूरप्रसंगी घ्यावयाची दक्षता

१. प्रशासनाच्या वतीने ध्वनीवर्धक, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरून देण्यात येत असलेल्या अद्ययावत् संकटकालीन सूचना सतत ऐकत अन् पहात रहाव्यात.

२. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. त्यामुळे ती सुरक्षित रहातील किंवा संकटकाळी घरातून निघतांना ती समवेत नेता येतील. त्यामुळे हानी होणार नाही किंवा झालीच, तर न्यूनतम होईल.

३. प्रथमोपचाराचे साहित्य आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

४. विद्युत् आणि विद्युत् उपकरणे यांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.

५. एखाद्या उंच ठिकाणी निघून जावे. घराला दुसरा माळा असेल, तर तेथे जावे.

६. पुरेसे खाद्यपदार्थ आणि पिण्याचे शुद्ध पाणी उंच अन् सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

७. वेगाने वहाणारे झरे किंवा पाणी यांतून चालण्याचा किंवा खेळण्याचा प्रयत्न करू नये.

भूकंप झाल्यावर काय करावे ?

१. लगेच स्वतःचे रहाते स्थान सोडून मोकळ्या जागेत जावे.

२. बहुमजली इमारतीतून खाली येण्यासाठी उद्वाहकाचा (लिफ्टचा) वापर करू नये.

३. घरातील काचेची तावदाने असलेल्या खिडक्या, कपाट, विजेच्या तारा आणि इतर सहज कोसळणारा भाग यांपासून दूर रहावे.

४. पटल किंवा पलंग यांच्याखाली आश्रय घ्यावा. हातांनी डोके झाकून खोलीतील कोपरा किंवा छताच्या बीमच्या खाली बसावे. गॅस आणि वीज यांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.

५. तुम्ही घराबाहेर असाल, तर इमारती, विजेचे खांब आणि झाडे यांपासून दूर रहावे.

प्रथमोपचार पेटीतील आवश्यक साहित्य

१. निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) ‘गॉज ड्रेसिंग्स्’

२. स्टिकींग प्लास्टर रोल (Sticking Plaster Roll)

३. चिकट ड्रेसिंग (बॅण्ड एड)

४. कोपर, गुडघा अथवा घोटा बांधण्यासाठी ‘क्रेप बँडेजेस्’

५. गुंडाळपट्ट्या (रोलर बँडेजेस्)

६. त्रिकोणी पट्ट्या (ट्रँग्युलर बँडेजेस्)

७. कापसाची गुंडाळी : १०० ग्रॅम

८. विविध संपर्क क्रमांक अन् पत्ते लिहिलेली वही

औषधे

१. ‘डेटॉल’ किंवा ‘सॅवलॉन’

२. ‘बेटाडीन’ किंवा ‘सोफ्रामायसीन’ मलम

३. ‘पॅरासिटामॉल’ गोळी (५०० मि.ग्रॅॅ.)

प्रथमोपचाराची साधने

१. एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे आणि ‘फेस मास्क’

२. सेफ्टीपिन्स, चिमटा (फोरसेप-ट्विजर), तापमापक (थर्मामीटर)

३. ‘सर्जिकल’ कात्री (१२ सें.मी. लांबीची)

आगीच्या संदर्भातील करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना

उपकरणे आणि सिलिंडर यांची काळजी घ्या !

१. इमारतीमध्ये बसवलेल्या अग्नीशमन उपकरणांची योग्य काळजी घ्या.

२. इमारतीचा फायर पंप, इमारतीतील आणि जवळचा पाण्याचा साठा यांविषयी जाणून घ्या.

३. संरक्षक झाकण नसल्यास किंवा सिलिंडरमध्ये दोेष आढळल्यास असा सिलिंडर स्वीकारू नका.

४. भरलेले आणि रिकामे सिलिंडर वेगवेगळे ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचे सिलिंडर साठवायचे असल्यास त्यांचे विषारी, ज्वलनशील असे गट पाडा.

५. सिलिंडर भूमीवरून घासत ओढू नका किंवा उंचावरून फेकू नका.

६. सिलिंडरच्या जवळ धूम्रपान किंवा अन्य प्रकारच्या ज्वलनास कडक बंदी घाला.

७. काड्यापेटी, लायटर यांसारख्या वस्तू लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत, अशा उंच ठिकाणी शक्यतो बंद डब्यात ठेवा.

फटाक्यांविषयीची काळजी

१. फटाके घराबाहेर मोकळ्या पटांगणातच लावा. रॉकेटसारख्या आकाशात जाणार्‍या फटाक्यांविषयी विशेष काळजी घ्या. ते लावतांना दारे-खिडक्या व्यवस्थित लावून घ्या.

२. विझलेला फटाका परत पेटवण्याचा प्रयत्न करू नका.

३. फटाके दुसर्‍यांच्या दिशेने फेकू नका.

४. वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न लावणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.

५. घरगुती वापराच्या वायूची शेगडी, स्टोव्ह किंवा मेणबत्ती पेटलेली असतांना तेथे मुलांना एकटे सोडून जाऊ नका.

आपत्कालीन साहाय्य आणि भगवद्भक्ती !

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल.

आरोग्यरक्षण म्हणून औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी सचित्र वनस्पती-दर्शन !

विश्‍वाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आयुर्वेदाचे सृजन केले. अनादि काळापासून भारतामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात आहे. आयुर्वेद हा ‘पाचवा वेद’ समजला जातो; परंतु भारतातच या शास्त्राच्या झालेल्या उपेक्षेमुळे आज या चिकित्साशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. या वनस्पतींच्या संवर्धनासाठी सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’, हा ग्रंथ समर्पित आहे. या ग्रंथातील काही औषधी वनस्पतींची रंगीत छायाचित्रे आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. शक्य असल्यास आपणही या वनस्पतींची लागवड करावी !

भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्‍वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती घराजवळ आताच लावून ठेवल्यास पुढील काळात त्यांचा उपयोग होईल. येथे काही वनस्पतींची मराठी नावे दिली आहेत. या वनस्पतीं व्यतिरिक्त इतर वनस्पती ठाऊक असल्यास त्याही लावू शकतो. कृषी विद्यापीठ, वनखाते किंवा आयुर्वेदाविषयी कार्य करणार्‍या स्थानिक संस्था यांच्या वतीने वनस्पतींचे विनामूल्य वाटप केले जाते. त्याचाही लाभ घ्यावा.

‘भावी भीषण आपत्काळात आरोग्याचे रक्षण होण्यासाठी प्रत्येकाकडून आयुर्वेदीय औषधी वनस्पतींची लागवड होवो, तसेच सुजनांना या वनस्पतींचा सुयोग्य वापर करण्याची बुद्धी आणि शक्ती प्राप्त होवो’, ही श्री धन्वन्तरीच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF