अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना स्वतःच्या आणि ईश्‍वराच्या व्यापक अस्तित्वाच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. स्वतःतील व्यापक ‘मी’ची झालेली जाणीव

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१ अ. अधिवक्त्यांच्या बैठकीत आरंभी काही न सुचणे, मन एकाग्र केल्यावर स्वतःतील ‘मी’ची वेगळ्याच प्रकारची जाणीव अनुभवणे, शरिरातील ‘मी’ पेक्षा बोलणारा ‘मी’ व्यापक असून त्याने सर्वांना व्यापून टाकल्याचे जाणवणे आणि त्या वेळी सर्वांविषयी प्रेम अन् बोलतांना सहजता अनुभवणे : ‘वर्ष २०१८ च्या एप्रिल मासात अधिवक्त्यांचे अधिवेशन होते. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती मला घ्यायची होती. त्या बैठकीतील विषयांचे स्वरूप ‘झालेल्या चुका, उफाळून आलेले दोष आणि केलेल्या उपाययोजना’, असे होते. मला बैठकीच्या आरंभी काहीच सुचत नव्हते. ‘मी या बैठकीत नाहीच’, असे काहीतरी मला जाणवत होते. मी माझे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला एक वेगळीच जाणीव झाली. या एकाग्रतेतून मला जाणवले, ‘बैठकीला आलेल्या १८ ते २० अधिवक्त्यांमध्येही ‘मीच’ आहे. मी जरी बैठकीत बोलत असलो, इतरांना सूत्रे विचारून आणि त्यांच्याकडून समजून घेत असलो, तरी तो बोलणारा ‘मी’ दुय्यम आणि झाकलेला आहे. खरा ‘मी’ शरिरातील ‘मी’पेक्षा वेगळा आणि मोठा असून तो समोर बसलेल्या अधिवक्त्यांसकट एका व्यापक जाणीवस्वरूपात आहे. माझ्या शरिरातील ‘मी’ पेक्षा वेगळा असलेला तो ‘मी’ बैठकीत बसलेल्या सर्व अधिवक्त्यांमध्ये असून तो व्यापक असा आहे. त्या अवस्थेत मला सर्वांविषयी प्रेम जाणवत होते. या पूर्वी ही प्रेमाची जाणीव अल्प क्षण असायची; परंतु या वेळी बैठक संपेपर्यंत ती टिकून होती. नंतर मला सूक्ष्म स्तरावरही माझे सर्व बोलणे प्रेमाने आणि सहज होत असल्याची जाणीव होत होती.

१ आ. प्रवासात शरीर थकलेले असल्याने जप करण्याचा प्रयत्न करणे, त्या वेळी बाहेर आकाशाकडे पहातांना ‘मी’ स्थिर असल्याची जाणीव होणे, तेव्हा ‘प्रवास करणाराही ‘मी’ आहे’, असे वाटणे; परंतु ‘(स्थिर असणारा) खरा मी’ प्रवास कसा करेल ?’, असे वाटून तो सगळीकडे असल्याची जाणीव होणे आणि भावजागृती होऊन जप चालू होणे : मी वर्ष २०१८ मध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात सेवेसाठी गेलो होतो. सायंकाळी माझा परतीचा प्रवास चालू झाला. तेव्हा शरीर थकलेले होते; म्हणून मी नामजप करण्याचा प्रयत्न करत होतो. मी चारचाकीतून प्रवास करत बाहेर आकाशाकडे पहात होतो. तेव्हा मला जाणीव झाली, ‘मी’ स्थिर आहे. जो प्रवास करत आहे, तोही ‘मी’च आहे; परंतु खरा ‘मी’ (जो स्थिर आहे,) कसा प्रवास करेल ? तो एका ठिकाणहून दुसरीकडे जाऊच शकत नाही; कारण त्याला जायला आणि यायला काही जागाच नाही. त्याला कसलाच प्रवास नाही; कारण तो सगळीकडे व्यापून राहिला आहे.’ त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि माझा ॐकाराचा जप चालू झाला.

२. वाहन चालवतांना ईश्‍वर आणि माया यांच्या अस्तित्वासंदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. वाहन चालवतांना ‘सर्वत्र ईश्‍वर भरून राहिला आहे’, याची तीव्रतेने जाणीव होणे आणि ईश्‍वराचे व्यापकत्व अनुभवल्याने भावजागृती होणे : मे २०१८ मध्ये शेवटच्या आठवड्यात मी बेंगळुरूला गेलो होतो. अनेक शहरांतून प्रवास होत होता. त्या ३ – ४ दिवसांत अनेकदा दुचाकीवरून प्रवास झाला. मी प्रवासात वाहन चालवत असतांना ‘सर्वत्र ईश्‍वर भरून राहिला आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव होत होती. लिहितांना मी हे एका ओळीत लिहू शकलो; परंतु त्याचा अर्थ मात्र एका ओळीत न मावणारा किंबहुना तो कशातच न मावणारा आहे. त्या स्थितीत माझा भाव जागृत होत होता.

२ आ. मार्गातील आजूबाजूची सर्व रहदारी, ध्वनी आणि स्वतः चालवत असणारे वाहन हे सर्व चित्रासारखे स्थिर वाटणे, स्वतः त्या चित्रात असूनही त्याबाहेर असल्याचे जाणवणे, चित्राच्या कापडाला बोट लावल्यावर ते जसे हलते, तसे सर्व हलत असल्याचे वाटून ‘ही सर्व माया आहे’, हे जाणवणे : काही वेळाने ‘आजूबाजूची सर्व रहदारी, ध्वनी आणि मी चालवत असणारे वाहन हे सर्व स्थिर चित्रासारखे आहे’, असेही जाणवले. त्या स्थितीत मी आहेच; परंतु मला ही स्थिती आणि आजूबाजूचा आसमंत एका चित्रासारखा जाणवत होता. आपण अनेकदा चित्र बाहेरून पहात असतो. त्याला बोट लावू शकतो. तसेच इथे मला वाटत होते. ‘मी त्या चित्रात असूनही त्याच्या बाहेर आहे. आपण कापडाला बोट लावल्यावर ते जसे हलते, तसे हे चित्रही हलत होते. त्यामुळे ‘ही सर्व माया आहे’, असे मला जाणवत होते.

२ इ. मार्गातून जातांना भर गर्दीतही ‘सर्वत्र ईश्‍वर भरून राहिला आहे’, अशी स्पष्ट जाणीव होऊन भावजागृती होणे : चालता-चालता ‘सर्वत्र ईश्‍वर भरून राहिला आहे’, अशी स्पष्ट जाणीव मला व्यापून टाकत होती आणि भावजागृती होत होती. त्यामुळे ‘आता मी इथेच हुंदके देऊन रडतो कि काय ?’, असे मला वाटले. हे सर्व भर गर्दीतील रस्त्यांतून जातांना होत असल्याने काहीतरी वेगळेच वाटत होते.

३. बोलणारा स्वतः नसून भगवंतच बोलत असल्याचे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे

या वेळी अशा काही गोष्टी घडल्या की, मी घेतलेले अनेक निर्णय माझे नव्हतेच. मी जे काही बोलत होतो, ते बोलणारा मी नव्हतोच. ते सर्व भगवंताचेच होते. पूर्वी प्रत्येक वाक्य बोलण्याआधी मी ते शब्द, त्याचा अर्थ मनात योजून मगच बोलायचो. आता माझ्याकडून सहज बोलले जाते आणि बोलल्यानंतर ‘आपण काय बोललो ? हे कसे सुचले ?’, या विचारांनी कृतज्ञता व्यक्त होते.

४. एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आलेल्या अनुभूती

४ अ. न्यायालयात सर्वत्र भगवंताचे अस्तित्व जाणवणे, युक्तीवादाच्या वेळी तणावपूर्ण वातावरण असूनही आतून स्थिरता वाटणे, बोलण्यात त्वेष असून सर्व वाक्ये आतूनच येत असल्याचे आणि स्वतःवरील आवरण विरघळत असल्याचे अनुभवणे अन् नंतर पुष्कळ हलके वाटणे : ११.६.२०१८ या दिवशी न्यायालयात एका खटल्याची सुनावणी होती. या सुनावणीचा निकाल आमच्या बाजूने लागणार नाही, हे आम्हा सर्व सहसाधकांना ठाऊक होते, तरीही ‘आपल्याला जे करायचे आहे, ते मनापासून आणि चांगले प्रयत्न करून करूया’, अशी सर्वांची भावना होती. या सुनावणीच्या सिद्धतेसाठी सहसाधक आदल्या रात्री ३ पर्यंत जागले होते.

दुसर्‍या दिवशी या खटल्याच्या सुनावणीच्या आधी मला न्यायालयात भगवंताचे अस्तित्व काही वेळ स्पष्ट जाणवत होते. ‘भगवंत न्यायालयात सर्वत्र भरून राहिला आहे’, असे मला वाटत होते. मी युक्तीवादाला उभा राहिलो. तेव्हा तेथे स्फोटक आणि तणावपूर्ण परिस्थिती होती. मी साधारण २५ मिनिटे युक्तीवाद केला. त्या वेळी मला आतून स्थिरता वाटत होती; परंतु त्वेषही होता. ‘त्या वेळी कानाच्या पाळ्या गरम झाल्या आहेत आणि माझ्यावरील त्रासदायक आवरण विरघळत आहे’, असे मला जाणवत होते. युक्तीवाद करून खाली बसल्यावर लक्षात आले, ‘बोलतांना माझे शब्द अडखळत नव्हते. काही वाक्ये माझ्या आतून येत होती. त्यामुळे मला पुष्कळ हलके वाटत होते. इतर वेळी ‘न्यायाधीश काय म्हणतील ?’, याची थोडी काळजी असायची. या वेळी तोही विचार नव्हता.’

४ आ. देवाचे अस्तित्व अनुभवत सर्व सिद्धता केल्याने निकाल विरोधात लागूनही सर्वांनाच पुष्कळ आनंद मिळणे, न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतरही उपाय होत असल्याचे सहसाधिकेला वाटणे आणि ‘एखाद्या पक्षकाराने युक्तीवाद करण्यासाठी एक कोटी रुपये दिले असते, तरी मला आजच्या इतका आनंद मिळाला नसता’, असे एका अधिवक्त्यांनी सांगणे, या प्रसंगात सेवेतील सर्वांनाच खर्‍या आनंदाची प्रचीती येणे : अपेक्षेप्रमाणे निकाल आमच्या विरोधात गेला; परंतु त्याचे आम्हाला दुःखच वाटले नव्हते. ‘जे करायचे होते, ते आपल्याकडून देवाचे अस्तित्व अनुभवत झाले’, याचा आनंद पुष्कळ होता. सहसाधकांनाही तो आनंद मिळून त्यांनीही हलकेपणा अनुभवला होता. सहसाधिकेने सांगितले, ‘न्यायालयाचे कामकाज संपून साधारण ४५ मिनिटे झाली, तरी अजून उपाय होत आहेत’, असे जाणवते. आजचा प्रसंग काही वेगळाच होता. अधिवक्ता अमृतेशही अत्यंत आनंदी होते. त्यांची प्रतिक्रिया होती, ‘एखाद्या पक्षकाराने युक्तीवाद करण्यासाठी मला एक कोटी रुपये दिले असते, तरी मला आजच्या इतका आनंद मिळाला नसता.’ हा आनंद केवळ आम्हा अधिवक्त्यांना मिळाला, असे नाही, तर आम्हाला साहाय्य करणारे, संगणकावर प्रत काढणारे, छायांकित प्रती आणणारे आणि न्यायालयात न आलेले साधक यांनाही तो मिळाला होता. ‘त्यामुळे हा खरा आनंद होता’, असे वाटते.

५. आरोपींना भेटायला जातांना शासकीय यंत्रणा मोठी आणि स्वतः एकटे असूनही भगवंताची पुष्कळ शक्ती पाठीशी असल्याची जाणीव होणे

मी १३ दिवस पोलीस स्थानकात ४ आरोपींना भेटायला प्रतिदिन जात होतो. ती इमारत आणि परिसर पुष्कळ मोठा आहे. त्यामुळे साधकांचा वेळ जायला नको; म्हणून मी एकटाच जात होतो. मी बाहेर पडतांना तेथील दाबामुळे अनेकदा थकून जायचो. तेव्हा अनेकदा मनात विचार यायचा, ‘आपण ज्या यंत्रणेविरोधात उभे आहोत, ती प्रचंड मोठी आहे. तिच्याकडे अपार साधनसामुग्री आणि माणसे आहेत. त्या तुलनेत मी एकटाच दिसत आहे; परंतु ‘आपल्यामागे भगवंताची केवढी मोठी शक्ती आहे’, याची मला जाणीव असायची.

भगवंत हे सर्व पहायला आणि अनुभवायला देत आहे. त्यातून पुष्कळ काही शिकवतो आहे, यासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद. (१०.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF