लातूरच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी प्रसार करतांना आलेल्या अडचणी आणि अनुभूती

‘६.१.२०१९ या दिवशी लातूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. लातूर येथील सभेच्या सेवेत ‘भगवंतच कसा त्याची सेवा करवून घेत आहे आणि वाळवंटात कसे वैकुंठ निर्माण करत आहे ?’, हे अनुभवण्यास मिळाले.

१. सभेच्या आधी अडचणी येणे आणि देवाच्या कृपेने त्यांतून मार्ग मिळणे

१ अ. सभेसाठी प्रसाराला गेल्यावर संमिश्र प्रतिसाद मिळणे आणि तेथील गोलईत वसलेल्या जगदंबामातेची ओटी भरून प्रार्थना केल्यावर ‘मातेला पुष्कळ आनंद झाला आहे’, असे जाणवणे : लातूरला साधक प्रसारासाठी गेल्यावर आधी तेथे सकारात्मक आणि नकारात्मक असा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सभेच्या दृष्टीने अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे ‘सभा कशी होईल ? सभा घ्यावी का ?’, असेही वाटत होते. नंतर आम्ही सर्व साधक तेथील गोलईत (लातूर शहरातील एका परिसराचे नाव) वसलेल्या जगदंबामातेची ओटी भरण्यासाठी गेल्यावर बुणगेकाकांनी मातेला प्रार्थना केली. तेव्हा ‘माता मान वळवून बघत आहे आणि तिला पुष्कळ आनंद झाला आहे’, असे जाणवत होते.

१ आ. लातूर हा दुष्काळग्रस्त भाग असून तेथे लोकांच्या अन्न-पाण्याच्या समस्या असतांना गुरुमाऊलीच्या कृपेने अन्नपूर्णामाताच धावून येणे आणि तेथील भोजनालयात वाचक अन् धर्मप्रेमी यांनी साधकांच्या महाप्रसादाची सोय करणे : लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. तेथे गेल्यावर प्रथम सभेच्या सेवेला आलेल्या साधकांसाठी निवास आणि भोजन मिळण्यासाठी संपर्क करत होतो. आरंभी संपर्क केल्यावर काही लोक म्हणाले, ‘‘दुष्काळी भागात काय सभा घेता ? येथे लोकांना अन्नपाण्याच्या समस्या आहेत, तर धर्मासाठी एकत्र कोण येणार ?’’; पण नंतर गुरुमाऊलीच्या कृपेने अन्नपूर्णामाताच धावून आली. तेथील भोजनालयात वाचक आणि धर्मप्रेमींनीच साधकांच्या महाप्रसादाची सोय केली.

१ इ. पाणी नसल्याने बंद असलेल्या कूपनलिकेला पाणी येऊ लागणे; म्हणजे साधकांसाठी गंगामाताच अवतरणे : सभेसाठी साधक सेवेला लातूरला गेले होते; पण तेथील लोक पाणी विकत घेऊन वापरतात. त्यामुळे ‘काय करायचे ?’, असा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा ज्या साधिकेकडे साधकांची निवासव्यवस्था होती. त्यांच्या बंद असलेल्या कूपनलिकेला पाणी येऊ लागले. त्या भागातील अन्य कूपनलिकांना पाणी नव्हते. साधकांसाठी प्रत्यक्ष गंगामाताच तेथे अवतरली होती.

१ ई. रिक्शावाल्यांनी साधिकांच्या हातातील फ्लेक्स घेऊन रिक्शावर लावणे : साधिका रिक्शावर फ्लेक्स लावण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा रिक्शावाल्यांच्या माध्यमातून देवच साहाय्याला आला. ‘तुम्ही महिला फ्लेक्स कसा लावणार ? आम्हीच लावतो’, असे म्हणून त्यांनी हातातील फ्लेक्स घेऊन प्रत्येक रिक्शावर लावला.

१ उ. अनेक अडचणी येऊनही साधकांनी सकारात्मक राहून शरणागतीने सेवा करणे : सभेला साहित्य मिळण्यात पुष्कळ अडथळे येत होते. अन्य संघटना आणि राजकीय नेते यांच्याकडून विरोध होत होता, तरीही साधक गुरुमाऊलीच्याच कृपेमुळे सकारात्मक राहून ‘देवच करवून घेणार आहे. कितीही अडथळे आले, तरी सकारात्मक राहून सेवा करायची. देवाला आपली शरणागती वाढवायची आहे’, अशा भावाने सेवा करत होते.

१ ऊ. पटांगणाच्या प्रवेशद्वारातच नारळ आणि लिंबू उतरवून टाकलेले दिसणे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी करणी उतरवण्याचा मंत्र म्हटल्यावर अन् उपाय केल्यावर त्रास नष्ट होणे : सभेसाठी स्थुलातून तर अडचणी येतच होत्या; पण सूक्ष्मातूनही आक्रमणे झाली. सभेच्या आदल्या दिवशी पटांगणाच्या प्रवेशद्वारातच नारळ आणि लिंबू उतरवून टाकलेले दिसले. त्यामुळे पटांगणात त्रास वाढला होता. संतांना विचारल्यावर करणी केल्याचे लक्षात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी करणी उतरवण्याचा मंत्र म्हटल्यावर आणि उपाय केल्यावर त्रास नष्ट झाले. पटांगणात चैतन्य जाणवू लागले.

१ ए. सभेच्या आधी २ दिवस थंडी उणावणे : सभेच्या कालावधीत लातूरला थंडीही वाढली होती. सभेच्या बैठका घेण्यासाठी साधक सकाळीच ग्रामीण भागात जायचे; पण सूर्यनारायणाच्या कृपेने सभेच्या २ दिवस आधी थंडी उणावली होती. सभा झाल्यावर थंडी परत वाढली.

२. सभेच्या दिवशी आलेल्या अनुभूती

२ अ. सभेच्या दिवशी ‘सुखसागर’ या भोजनालयाच्या (हॉटेलच्या) मालकांनी साधकांची जेवणाची सोय करणे : सभेच्या ठिकाणी सेवेसाठी साधक संख्या अल्प होती. ‘प्रसार आणि मैदानातील सेवा करून भोजनकक्षातील सेवा कशी होणार?’, अशी अडचण होती. त्या वेळी तेथील ‘सुखसागर’ या भोजनालयाच्या (हॉटेलच्या) मालकांनी आम्हाला सांगितले, ‘‘सभेच्या दिवशी तुमची साधकसंख्या अधिक असेल. तेव्हा सभा झाल्यावर माझ्या भोजनालयामध्ये जेवायला या.’’ सभा झाल्यावर आवरण्याची सेवा संपवून सगळे साधक भोजनालयामध्ये जेवणासाठी गेले. तेथील वाढपीही कृतज्ञताभावाने आम्हाला जेवण वाढत होते. जेवण बनवणे, आवरणे इत्यादी सेवांसाठी साधक संख्या लागली असती, तर अन्नपूर्णामातेनेच सर्वांना भोजनालयाच्या मालकांच्या माध्यमातून जेवण वाढले.

२ आ. सभेच्या वेळी शंखनाद झाला, त्या वेळी आकाशात काही काळ भगवा रंग पसरला आणि दीपप्रज्वलन झाल्यावर परत आकाश निळ्या रंगाचे झाले.

२ इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमी येऊ नयेत, यासाठी सभेच्या दिवशी काही राजकीय लोकांनी मोठ्या सभा आणि बैठका यांचे आयोजन केले होते, तरी सभेला २ सहस्र २०० धर्मप्रेमी उपस्थित होते.

‘गुरुमाऊली, तुमच्याच कृपेने लातूरच्या सभेत तुमची कृपा अनुभवता आली. तुम्हीच साधनेची संधी दिली. तुमचा कृपा वर्षाव अनुभवण्यास दिला, यासाठी कोटी कोटी कृतज्ञता ! ‘तुम्हाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी आम्हा साधकांचे प्रयत्न तळमळीने, भावपूर्ण होऊन गुरुकृपा अखंड अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या श्रीचरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– कु. दीपाली मतकर, सोलापूर (११.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF