५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली हडपसर, पुणे येथील चि. अक्षरा संतोष नान्नीकर (वय २ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अक्षरा संतोष नान्नीकर ही एक आहे !

चि. अक्षरा नान्नीकर

चि. अक्षरा संतोष नान्नीकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी (२५.५.२०१९) या दिवशी चि. अक्षरा संतोष नान्नीकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१८ मध्ये चि. अक्षरा हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

१. गर्भारपण

१ अ. मळमळणे, उलट्या होणे आणि चक्कर येणे, असे त्रास होणे : ‘गर्भारपणी दुसर्‍या मासापासूनच (महिन्यापासून) मला मळमळणे, उलट्या होणे आणि चक्कर येणे, असे तीव्र त्रास चालू झाले. त्यासाठी मला ३ वेळा रुग्णालयात भरती करून सलाईन लावावे लागले. सातव्या मासापर्यंत मला हा त्रास होत होता; मात्र परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने मला आयुर्वेदिक वैद्य आणि स्त्रीरोग तज्ञ हे दोघेही सात्त्विक वृत्तीचे अन् योग्य मार्गदर्शन करणारे मिळाले.

१ आ. या काळात शारीरिक अस्वास्थ्य आणि जागरण यांमुळे मला बसून नामजप करणे शक्य होत नव्हते; पण मी येता-जाता नामजप आणि प्रार्थना करत होते.

१ इ. शारीरिक त्रास होत असूनही देवच बाळाची काळजी घेत असल्याचे जाणवणे : मला होणार्‍या उलट्यांमुळे माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण उणावत असे, तसेच माझा रक्तदाबही न्यून होत असे. सातव्या मासापर्यंत माझे वजनही ५ किलो न्यून झाले होते. असे असले, तरीही ‘देवच बाळाची काळजी घेत आहे’, असे मला जाणवायचे, तसेच बाळाच्या सोनोग्राफीचे अहवाल नेहमी सकारात्मक आणि चांगले येत होते.

१ ई. स्तोत्रे म्हणणे आणि धार्मिक अन् ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन करणे : या कालावधीत मी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र म्हणत होतेे. सातव्या मासानंतर मी महाभारत, पंचतंत्र, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इत्यादी ग्रंथांचे वाचन करत होते. वाचन करत असतांना ‘मी बाळालाच त्यातील कथा वाचून दाखवत आहे’, असा भाव ठेवत असे. या काळात मी संत भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने दिवसभर ऐकत असे.

१ उ. ‘शस्त्रकर्म (सिझेरियन) करावे लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि परात्पर गुरुमाऊलींना कळवळून प्रार्थना केल्यावर नैसर्गिक प्रसुती होणे : मला त्रास होऊ लागल्याने आम्ही रुग्णालयात गेलो. त्या वेळी ‘बाळाच्या हृदयाचे ठोके अल्प-अधिक होत असल्यामुळे शस्त्रकर्म (सिझेरियन) करावे लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले; परंतु माझे यजमान श्री. संतोष नान्नीकर यांनी आधुनिक वैद्यांना ‘आपण काही वेळ वाट पाहू’, असे सांगितले. या कालावधीत माझे यजमान, आई आणि मी परात्पर गुरुमाऊलींना कळवळून प्रार्थना करत होतो. त्या वेळी मी श्रीकृष्णाचा नामजप सतत करत होते. असह्य वेदना होत असतांनाही माझ्याकडून ‘परात्पर गुरुमाऊली शेजारी बसली आहे. ती माझ्या डोक्यावरून आणि पोटावरून हात फिरवत आहे’, असे भावजागृतीचे प्रयत्न देवाच्या कृपेने झाले. गुरुमाऊलींची कृपादृष्टी आणि आशीर्वाद यांमुळे माझी नैसर्गिक प्रसुती झाली.’

– सौ. रीमा नान्नीकर (आई), हडपसर, पुणे.

२. चि. अक्षरा हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. हातांच्या मुद्रा करणे : ‘अक्षरा १२ दिवसांची असल्यापासून हाताच्या बोटांची मुद्रा करते. त्या वेळी ती ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे वाटते. ती झोपतांना आणि जेवण करतांना मुद्रा करते.

२ आ. सहनशील : अक्षरा ४ आणि ८ मासांची असतांना २ वेळा पलंगावरून खाली पडली. त्या वेळी ती रडली नाही. तिने ते सर्व दुखणे सहन केले आणि ती लगेचच शांत झाली. केवळ गुरुमाऊलींच्या कृपेने दोन्ही वेळा तिला काहीच झाले नाही. ‘प्रत्यक्ष गुरुमाऊलीनेच तिला हातात अलगद झेलले’, असे आम्हाला जाणवले.’

– श्री. संतोष आणि सौ. रीमा नान्नीकर (अक्षराचे आई-वडील)

२ इ. शांत स्वभाव : ‘मी कुठे बाहेर अथवा बैठकीला गेल्यास ती त्रास देत नाही. एकदा आम्ही चिंचवड (पुणे) येथील पू. फडकेआजोबांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. आम्ही १ घंटा त्यांच्याकडे होतो. त्या वेळी पू. आजोबा म्हणाले, ‘‘इतर कुणी असते, तर आतापर्यंत गोंधळ घातला असता. तुमची मुलगी शांत आहे.’’

२ ई. शिकण्याची वृत्ती : तिला नवनवीन गोष्टी शिकून त्याप्रमाणे करायला आवडते. मी स्वयंपाकघरात ओट्याजवळ उभी असल्यास ‘मी काय करत आहे ?’, हे पहाण्याचा ती प्रयत्न करते.’

– सौ. रीमा नान्नीकर

२ उ. सात्त्विक गोष्टींची आवड

१. ‘सनातन-निर्मित सात्त्विक अगरबत्ती लावली की, ती लगेच हसते. तिला अगरबत्तीचा धूर पुष्कळ आवडतो. त्याकडे ती एकटक पहात रहाते. तो धूर पकडण्याचा प्रयत्न करते.

२. तिला श्रीकृष्णाचे मोरपीस आवडते. तिच्या अंगावरून मोरपीस फिरवले की, ती शहारे आल्यासारखे करते आणि मोरपीस हातात घ्यायचा प्रयत्न करते.

३. समाजातील लोकांच्या तुलनेत ती साधकांकडे लगेच आकर्षित होते आणि त्यांच्याकडे लगेच जाते.

२ ऊ. देवाची ओढ : आमच्या घरी श्रीकृष्ण अन् गणपति यांची चित्रे आणि परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र आहे. ‘कृष्ण बाप्पा की जय ।’ किंवा ‘प.पू. आजोबा की जय ।’, असे म्हटल्यावर ती लगेच त्यांच्या छायाचित्राकडे पहातेे. ‘कृष्णबाप्पा नमस्कार, गणपतिबाप्पा नमस्कार’, असे म्हटले की, ती हात जोडून नमस्कार करते. ‘विठ्ठल विठ्ठल’, असे म्हटले की, ती लगेच टाळ्या वाजवते. तिला चंडीकवच आणि श्रीकृष्णाचा पाळणा पुष्कळ आवडतो. ते लावले की, ती लगेच हसतेे आणि कधी रडत असेल, तर शांत होते.’

– श्री. संतोष आणि सौ. रीमा नान्नीकर

३. परात्पर गुरुदेवांचे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपातील छायाचित्र असलेला दैनिक सनातन प्रभातचा अंक डोक्यावर ठेवताच बाळाने सुमधुर हास्य करणे अन् ‘तिची परात्पर गुरुदेवांशी पूर्वीपासून ओळख आहे’, असे जाणवणे

‘चि. अक्षराचा जन्म झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी परात्पर गुरुदेवांचा अमृत महोत्सव सोहळा होता. ‘तो सोहळा रुग्णालयात पहाता यावा’, अशी माझी इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो. २१.५.२०१७ या दिवशीच्या परात्पर गुरुदेवांचे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपातील छायाचित्र असलेला दैनिक सनातन प्रभातचा अंक घरी आला. मी लगेचच तो अंक बाळाच्या डोक्यावर आणि अंगावर ठेवला. त्या वेळी बाळ झोपले होते; परंतु डोक्यावर अंक ठेवताच बाळाने क्षणार्धात एक सुमधुर हास्य केले. ते हास्य पाहून ‘तिची परात्पर गुरुदेवांशी पूर्वीपासून ओळख आहे आणि ती गुरुमाऊलींची वाटच पहात होती’, असे जाणवले.’ – सौ. रीमा नान्नीकर

४. अक्षरामधील स्वभावदोष

अ. ‘हट्टीपणा

आ. ती सतत भ्रमणभाषशी खेळत असते. तिला भ्रमणभाष दिला नाही, तर ती चिडचिड करते. तो मिळवण्यासाठी ती आटापिटा करते.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे श्रीकृष्णा आणि परात्पर गुरुमाऊली, आपल्याच अगाध कृपेमुळे आम्हाला अक्षरासारख्या बाळकृष्णरूपी साधिकेची प्राप्ती झाली. तिच्याकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. तिच्या माध्यमातून आपणच आमची साधना करवून घेत आहात. त्याबद्दल आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! ‘आपली अखंड कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे आणि आपणच आम्हा तिघांकडूनही आपल्याला अपेक्षित अशी साधना करवून घ्या’, हीच नम्र प्रार्थना आहे.’

– श्री. संतोष आणि सौ. रीमा संतोष नान्नीकर, हडपसर, पुणे.

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 


Multi Language |Offline reading | PDF