सोलापूरवासियांच्या अपेक्षा उंचावल्या !

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला, तर सोलापूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महाराज यांनी पराभव केला आहे. अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून, तर सुशीलकुमार शिंदे सोलापूरातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्याने भाजपचे पारडे उंचावले आहे. विशेष म्हणजे सोलापूर येथून सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या अनुभवी आणि दिग्गज नेत्यांसमवेत लढा देत असतांना, तसेच प्रथमच निवडणूक लढवूनही बहुमताने निवडून आलेले भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महाराज यांचे कौतुकच करावे लागेल. सोलापूर हा शिंदे यांचा गड मानला जात असतांना महास्वामी यांच्या विजयाने हा गड उद्ध्वस्त झाला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानचे संस्थापक डॉ. जयसिद्धेश्‍वर महाराज यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठे कार्य केलेले आहे. निवडणुकीसाठी त्यांचे नाव भाजपने सोलापूर येथून जाहीर करताच एका धर्मगुरूंना तिकीट दिल्याने काही लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोधही केला. हा विरोध पचवून महाराजांनी मोठ्या धडाडीने निवडणूक जिंकली. त्यामुळे साहजिकच सोलापूरचा विकास व्हावा यासाठी सोलापूरवासियांच्या मनात असणार्‍या इच्छा, आकांक्षांना उधाण आले आणि आता सोलापूर केवळ ‘स्मार्ट सिटी’ होण्याच्या सूचीत न रहाता ते प्रत्यक्षात काही चांगले होईल, अशी चर्चा आहे.  धर्मगुरु अशी ओळख असणार्‍या डॉ. महास्वामी यांच्याकडून काही अपेक्षा आहेत की, त्यांनी सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, श्री सिद्धेश्‍वर मंदिराच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, गोरक्षकांना संरक्षण द्यावे जेणेकरून त्यांना गोरक्षणाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. मुळेगाव येथील अवैध पशूवधगृह बंद होण्यासाठी आतापर्यंत अनेक संघटनांनी विविध प्रयत्न केले; पण त्याला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही; मात्र ‘महाराजांनी यासाठी प्रयत्न केल्यास निश्‍चित यश मिळेल’, असे वाटते. महाराजांच्या मतदारसंघातील अनेक मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. (उदा. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर), तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ही मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी महाराजांनी पुढाकार घ्यावा. या आणि अशा अनेक अपेक्षांची आता पूर्तता होईल याची सोलापूरवासीय आशा बाळगून आहेत. त्यामुळे महाराजांना आमचा नमस्कार आणि पुढील कार्य पूर्तीसाठी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर


Multi Language |Offline reading | PDF