काँग्रेसची मृत्यूघंटा !

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. जय-पराजय

सर्वांसमोर आले. वर्ष २०१४ च्या निवडणुकीपासून चालू झालेली भाजपची घोडदौड यंदाच्या निवडणुकीत आणखीनच वेगाने होत असल्याचेही दिसून आले. ‘राष्ट्रनिर्माणकर्ते’ नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या भाजपच्या निकालाने राजकीय इतिहासात यशस्वीतेची मोहोर उमटवली आहे. सातत्याने झालेली चिखलफेक, तसेच असंख्य टीका आणि विरोध यांचे वार झेलत नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ते खरे धनुर्धारी असल्याचे दाखवले. या धनुर्धार्‍यामुळेच काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा घायाळ झाला आहे; मात्र या वेळची पराजयाची जखम अधिकच खोलवर गेलेली आहे. निकालाचे संपूर्ण चित्र पहाता ‘काँग्रेससमोर तर आता राजकारणातून परागंदा होण्याचीच वेळ आली आहे’, असे म्हणता येईल. सत्तेविना काँग्रेसींची घुसमट होत असेल, यात शंका नाही. काँग्रेसचे नीलेश राणे यांच्या पराजयानंतर नारायण राणे यांनीही सांगितले की, परिस्थिती अशीच राहिली, तर निवडणुका लढवायच्या कि नाहीत, असा विचार आम्हाला करावा लागेल. या उदाहरणावरूनच काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे दिसून येते. ज्या काँग्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशाला व्यापले होते, त्या पक्षाला केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागणे, ही काँग्रेसवर ओढवलेली नामुष्कीच आहे. नरेंद्र मोदी यांना भक्कम पर्याय देण्यामध्ये काँग्रेस पक्ष अपयशीच ठरला आहे. त्यामुळे ‘एकप्रकारे काँग्रेसी युगाचा अंत होत आहे’, हे निर्विवाद सत्य आहे.

आतापर्यंत इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन गांधी घराणेशाहीने अनेक वर्षे राजकारणात आपले पाय रोवले होते; मात्र लाट जशी येते, तशी ती मागेही जात असते. प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नियम लागू असतो. राजकारणही त्याला अपवाद नाही. खरेतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसची निर्मिती झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधी यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा आदेश देऊनही स्वार्थी काँग्रेसींनी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आणि काँग्रेस तशीच ठेवली. त्यामुळे कालांतराने राजकीय स्वार्थ साधण्यासाठीची टोळी असे तिचे स्वरूप झाले. सत्तापिपासू वृत्तीमुळे काँग्रेसने देशाला रसातळाला नेले. भ्रष्टाचार, मतपेटीसाठी अल्पसंख्यांकांचे केलेले लांगूलचालन, प्रत्येक वेळी धर्मनिरपेक्षतेची लावलेली लेबले, ‘हिंदु आतंकवादा’वरून हिंदु धर्माला केलेले लक्ष्य, हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष, जात्यंधता, गुंडगिरी, गुन्हेगारी यांमुळे जनतेच्या मनातील काँग्रेसविषयीचा उरलासुरला आदरभावही संपुष्टात येऊ लागला. काँग्रेसने आतापर्यंत केलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या अतोनात छळामुळे शिशुपालाप्रमाणे काँग्रेसचे १०० अपराध भरत आहेत. याचा परिणाम २३ मे या दिवशी लागलेल्या निकालावरूनच प्रकर्षाने दिसून आला. लोकशाहीची कटू फळे पदरात पाडून घेण्यापेक्षा जनतेला, पर्यायाने देशाला नव्या नेतृत्वाची आवश्यकता भासू लागली. जनतेच्या याच भूमिकेमुळे भाजपला यशाची शिखरे पादक्रांत करता आली.

खुळचटपणा नडला !

भाजपला जसे नरेंद्र मोदी यांच्या रूपात भक्कम नेतृत्व लाभले आहे, तस काँग्रेसला लाभलेले नाही. राहुल गांधी यांचा विचार केला, तर देशातील सामान्य जनताही त्यांना ‘बालीश’च समजते. राहुल यांनी मोदी यांच्यासमोर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची कर्तबगारी (?) दाखवण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी राहुल गांधींच्या या उड्यांची खिल्लीच उडवली गेली. ‘राफेल’च्या सूत्रावरून त्यांनी मोदींवर केलेले चुकीचे आरोप आणि टीका जनता जाणून आहे. राफेल प्रकरणामुळेच त्यांच्या पराभवाच्या पहिल्या पायरीला प्रारंभ झाला. ‘चौकीदार चोर है ।’ हे राहुल गांधी यांचे देशाच्या पंतप्रधानांना उद्देशून केलेले विधान जनतेच्या जिव्हारी लागले. लोकसभेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राहुल गांधी यांनी डोळा मारल्याचे प्रकरणही जनतेने लक्षात ठेवले. सत्ता मिळाल्यास गरिबांना प्रतिवर्षी ७२ सहस्र रुपये देण्याच्या योजनेचे गाजर त्यांनी दाखवले; मात्र जनता त्याला जराही भुलली नाही. आर्थिक आमिषे दाखवून कधीही जनाधार मिळत नसतो. त्यासाठी खरेतर कार्य करून जनभावनांना हात घालावा लागतो. राहुल गांधी यांचा खुळचटपणा, अभ्यासू वृत्तीचा अभाव आणि कर्तव्यशून्यता यांमुळे जनतेला सत्तेच्या किल्ल्या पुन्हा एकदा मोदींच्याच हाती सोपवाव्याशा वाटल्या. काँग्रेसच्या पदरी पराभवच पडला. थोडक्यात राहुल गांधी यांचे नेतृत्व लाभलेल्या काँग्रेसने स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

भाजपसाठी थोडेसे…!

काँग्रेसने आतापर्यंत केलेले अपराध, तसेच टीका, विरोध यांचे परिणाम आज त्यांच्याच वर ‘बूमरँग’ होत आहेत. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे भाजपने वेळीच शहाणे व्हावे. काँग्रेसने केलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रयत्नशील व्हावे. ‘विकास’ आणि ‘हिंदुत्व’ या कारणांसाठी भाजपला सत्ता मिळाली आहे. विकास तर काही प्रमाणात साधला आहेच; पण आतापर्यंत काँग्रेसमुळे हिंदुत्वाला लागलेले ग्रहण पुढील ५ वर्षांत दूर करावे, ही हिंदूंची भाजपकडून अपेक्षा आहे. काँग्रेसने राष्ट्रकारण आणि धर्मकारण देशात कधीच नांदू दिले नाही; पण भाजपने या दोहोंना समवेत घेऊन सत्तेची धुरा चालवावी. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची जशी धूळधाण उडवली आहे, त्याप्रमाणे विधानसभेच्या येत्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला पूर्ण पराभूत करण्याची संधी गमावू नये. काँग्रेसच्या काळ्या कृत्यांना ईश्‍वराने न्याय दिला आहेच. एकीकडे काँग्रेसची मृत्यूघंटा वाजत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या विजयाच्या तुतार्‍या निनादत आहेत; पण ‘हिंदुत्वा’ला जेव्हा न्याय मिळेल, तेव्हाच तो खरा विजयोत्सव ठरेल, हे भाजपने लक्षात ठेवावे. त्या दिवसाची हिंदू आतुरतेने वाट पहात आहेत…!


Multi Language |Offline reading | PDF