‘हिंदु राष्ट्रा’चा विचार करणार्‍या ‘हिंदु राष्ट्रवादा’चा विजय ! – अमेरिकेतील दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे वृत्त

भाजपचा विजय ‘हिंदु राष्ट्रवादा’चा विजय असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे मत

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे भाजप आणि मोदी यांच्या विजयाला ‘हिंदु राष्ट्रवादा’चा विजय मानत आहेत. वर्ष २०१४ मधील भाजपचा विजयही असाच होता; मात्र त्या वेळी भाजपने तो हिंदु राष्ट्रवादाचा विजय असल्याचे मानण्यास नकार देत तो विकासाच्या सूत्राचा विजय असल्याचे म्हटले होते. आता तरी काही दिवसांत सत्ता स्थापन करणार्‍या भाजप सरकारने हिंदु राष्ट्राचा उघड पुरस्कार करून हिंदूंना आश्‍वस्त करावे !

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय त्या ‘धार्मिक (हिंदु) राष्ट्रवादा’चा विजय आहे, ज्याला हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने पाहिले जात आहे, असे अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वृत्त प्रसिद्ध करतांना म्हटले आहे.

या दैनिकाच्या बातमीचा मथळाच ‘राष्ट्रवादाच्या आवाहनासह भारताच्या मोदी यांनी निवडणूक जिंकली’, असा आहे. या वृत्तात म्हटले आहे, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष यांनी जगातील सर्वांत मोठ्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. भारतीय मतदारांनी मोदी यांच्या ‘शक्तीशाली आणि गौरवशाली हिंदू’ या प्रतिमेवर शिक्का मारला आहे.

मोदी हा हिंदु राष्ट्रवादाचा राजकीय ‘ब्रॅण्ड’ ! – द न्यूयॉर्क टाइम्स

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे, ‘हिंदु राष्ट्रवादाचा राजकीय ‘ब्रॅण्ड’ ठरलेल्या मोदी यांनी संपूर्ण जगात भारताची शक्तीशाली प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न केला होता. मोदी यांनी देशातील ९१ कोटी मतदारांना पूर्णपणे प्रभावित केले. मोदी यांनी कर व्यवस्थेला सोपे करत भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवले. मोदी यांनी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वांत शक्तीशाली हिंदु राष्ट्रवादाच्या साहाय्याने स्वपक्षाला चांगला विजय मिळवून दिला.’

 ‘हिंदु राष्ट्रवादी’ राजकारणाचा विजय असल्याचे म्हटले जात आहे ! – बीबीसी

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत मोठा विजय मिळवून पुन्हा ५ वर्षांसाठी सत्ता मिळवली आहे. या विजयाला ‘मोदी यांच्या हिंदु राष्ट्रवादाच्या राजकारणाला मिळालेले बहुमत आहे’, असे म्हटले जात आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, मोदी यांच्यावर भारताचे तुकडे करण्याचे आरोप करण्यात आले; पण निवडणुकीचे परिणाम दाखवत आहेत की, त्यांच्या ध्रुवीकरण प्रतिमेला लोकांनी पसंत केले आहे.

भारतीय राजकारणाचा ‘हिंदु राष्ट्रवादा’च्या युगात प्रवेश ! – ब्रिटीश दैनिक ‘द गार्डियन’

ब्रिटीश दैनिक ‘द गार्डियन’च्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, मोदी यांच्या असामान्य लोकप्रियतेमुळे भारतीय राजकारणाचा आता ‘हिंदु राष्ट्रवादा’च्या नव्या युगामध्ये प्रवेश झाला आहे; मात्र भारताच्या धर्मनिरपेक्ष आत्म्यासाठी मोदी यांचा विजय वाईटच आहे. जगाला आणखी एका लोकप्रिय राष्ट्रवादी नेत्याची आवश्यकता नाही जो अल्पसंख्यांकांना दुसर्‍या दर्जाचे नागरिक समजत आहे. (अशा फुकाच्या सल्ल्यांची भारताला आवश्यकता नाही. भारतातील अल्पसंख्यांकांचा ब्रिटीश प्रसारमाध्यमांना एवढाच कळवळा असेल, तर त्यांनी त्यांच्या सरकारला सांगून या अल्पसंख्यांकांना ब्रिटनमध्ये आश्रय द्यावा ! – संपादक)

पुलवामाचा भाजपला लाभ झाला ! – पाकमधील वृत्तवाहिनी ‘जियो टीव्ही’

पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘जियो टीव्ही’ने तिच्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे लोकसभेच्या प्रचाराच्या प्रारंभी काही विधानसभा निवडणुकांतील पराभव, तसेच महागाई अन् बेरोजगारी यांवरून जनतेत निर्माण झालेला रोष यांमुळे दबावात होते; पण पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर प्रचाराच्या सूत्राचा केंद्रबिंदू पाकिस्तान झाला. (पाकला कायमचा धडा शिकवावा, ही भारतियांची इच्छा आहे. ती मतदानातून व्यक्त झाली. भाजप सरकारने हे लक्षात घेऊन पाकवर कारवाई करावी ! – संपादक) यामुळे भाजपला लाभ झाला. भाजपची निवडणूक यंत्रणा ही तळागाळापर्यंत अधिक प्रभावी होती.

(म्हणे) ‘मोदी इम्रान खान यांच्या शांतता प्रस्तावाकडे लक्ष देणार का ?’ – पाकमधील दैनिक ‘द डॉन’

पाकमधील दैनिक ‘द डॉन’ने लिहिले की, मोदी यांच्या विजयामुळे पाकिस्तानविरोधी धोरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपची पाकिस्तानविषयी असलेली नीती पालटणार नाही आणि दोन्ही देशांतील तणाव न्यून होणार नाही. आता ‘मोदी इम्रान खान यांच्या शांतता प्रस्तावाकडे लक्ष देतील का ?’, हा प्रश्‍नच आहे. (मोदी पुन्हा निवडून आल्यामुळे केवळ पाक सरकारचेच नव्हे, तर तेथील प्रसारमाध्यमांचेही धाबे दणाणले आहेत ! अन्य वेळी भारताला दूषणे देणारी पाकची प्रसारमाध्यमे आता ‘शांतते’च्या गप्पा मारू लागली आहेत ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF