राजकीय पक्षांची नावे धर्माच्या आधारे असू नयेत ! – देहली उच्च न्यायालयात याचिका

मुस्लिम लीग, हिंदु सेना आदी नावांवर आक्षेप

पक्षांची नावे पालटली, तरी त्यांच्या ध्येयधोरणांत पालट होणार का ?

नवी देहली – राजकीय पक्षांची नावे धार्मिक आणि जाती यांच्या आधारे नसावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे नेते अधिवक्ता अश्‍विनीकुमार उपाध्याय यांनी देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना नोटीस पाठवून त्यांचे मत मागवले आहे. या याचिकेत उदाहरण म्हणून ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ (एआयएम्आयएम्), ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ (आययूएम्एल्), हिंदु सेना आदी पक्षांची नावे देण्यात आली आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.

१. या याचिकेत म्हटले आहे की, धर्माशी संबंधित नावे आणि ध्वज, चिन्हे यांचा वापर ‘लोकप्रतिनिधित्व कायदा (आर्पीए) १९५१ अंतर्गत भ्रष्ट कृतींच्या समान आहे. असा वापर करणार्‍या सर्व राजकीय पक्षांचे पुनरावलोकन करण्यात यावे.

२. देशामध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. या पक्षांनी पुढील ३ मासांत त्यांची नावे पालटावीत अन्यथा त्यांची नोंदणी रहित केली जाईल, असे केले पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF