प्रत्येक साधकाच्या अगदी बारीक गोष्टींकडे लक्ष असणारे आणि मोक्ष मार्ग अतिशय सोपा करून देणारे परात्पर गुरु (डॉ.) आठवले !

१. कै. रंजन देसाई पिंगुळी, यांच्या कुडाळ येथील कारखान्यात प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा होणे

श्री. दत्तात्रय पटवर्धन

‘पिंगुळी, कुडाळ येथे कै. रंजन देसाई यांचा ‘अरुणोदय मेटल इंडस्ट्रिज’ नावाचा कारखाना आहे. त्या वेळी कारखाना आणि सनातनचे सेवाकेंद्र एकाच परिसरात होते. त्यामुळे कारखान्याच्या वतीने प्रतिवर्षी होणारे स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाचे (१५ ऑगस्टचे) झेंडावंदन हे त्यांचे कर्मचारी आणि आपले साधक असे संयुक्तपणे होऊ लागले. अशाच एका स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी मी उपस्थितांसमोर भाषण केले आणि एक कविता म्हणून त्या भाषणाचा समारोप केला. मला वाटते, ‘या घटनेलासुद्धा सुमारे १३ – १४ वर्षे झाली असतील.’ ती बातमी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये ‘पिंगुळी, कुडाळ येथे श्री. रंजन देसाई यांच्या कारखान्यात ‘स्वातंत्र्याचा वर्धापनदिन सोहळा’ साजरा झाला. त्या प्रसंगी श्री. द.र. पटवर्धन यांनी भाषण केले. त्यांनी त्यांच्या भाषणाची सांगता एका गीताने केली’, अशा आशयाची ती बातमी प्रसिद्ध झाली होती; परंतु ते गीत प्रसिद्ध झाले नव्हते.

२. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी ते गीत न छापण्याविषयी चौकशी करून स्वातंत्र्यदिनाच्या तिथीला ते छापण्यास सांगणे

काही दिवसांनी श्री. भूषण केरकर (रामनाथी आश्रमातील दैनिक कार्यालयात सेवा करणारे साधक) यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा श्री. भूषण केरकर यांनी सांगितले, ‘‘ही बातमी वाचल्यावर मला परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी बोलावून घेतले आणि विचारले, ‘‘बातमीमध्ये ‘श्री. पटवर्धन यांनी भाषणाची सांगता एका गीताने केली’, असे म्हटले आहे. मग ते गीत कुठे छापले आहे ?’’ त्यावर श्री. भूषण केरकर यांनी परात्पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘ते गीत उशिरा मिळाल्यामुळे त्या दिवशीच्या दैनिकात छापता आले नाही.’’ त्यावर परात्पर गुरुदेव (डॉ.) आठवले म्हणाले, ‘‘आता आपण तिथीनुसार स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन सोहळा साजरा करतो. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाची तिथी असेल, त्या दिवशीच्या ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये ते गीत छापा.’’ काही दिवसांनी स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाला ती कविता प्रसिद्ध झाली.

यातून श्री. भूषण केरकर यांचेही प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निरागसपणा, हे गुण प्रकर्षाने दिसून आले. त्यांनी हे मला सांगितले नसते, तर मला ते कधी कळलेही नसते.

३. ‘गीत छापले गेले नाही’, ही छोटीसी गोष्टही परात्पर गुरुदेवांच्या दृष्टीतून न सुटणे

यातून ‘परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे एवढे प्रचंड विश्‍वात्मक कार्य हाती घेतलेले असूनसुद्धा ही एवढी छोटीशी गोष्टही त्यांच्या दृष्टीतून सुटली नाही; पण ती गोष्ट पूर्णत्वास जाईपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला’, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या तुलनेत माझ्यासारखे साधक काहीही करत नाहीत, तरी आम्हाला काही सुचत नाही.’

४. ‘केली सोपी पायवाट’ असा मोक्षाचा मार्ग अतिशय सोपा करून देणारे सर्वोत्तम असे गुरुदेव मिळालेले असतांनाही त्यांचा लाभ करून घेण्यास अल्प पडत असल्याची खंत वाटणे

‘तुका म्हणे, ‘केली सोपी पायवाट’, अशा प्रकारे ‘मोक्षाचा मार्ग अतिशय सोपा करून ठेवला असतांना आणि अनेक साधकांना मोक्षाप्रत नेऊन ते सिद्ध करून दाखवले असतांनासुद्धा आम्हाला त्याचा लाभ करून घेऊन आनंद घेता येत नाही’, याचे अत्यंत वाईट वाटते.’

– श्री. द.र. पटवर्धन, माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF