परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या धार्मिक विधींसाठी आवश्यक असणारी फुले जमवतांना कु. संगीता नाईक यांनी अनुभवलेली श्रीगुरूंची कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरुदेवांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी आश्रमात सौरयाग, महाराजमातंगी याग, श्री सत्यनारायण महापूजा, श्री त्रिपुरासुंदरी लक्षकुंकुमार्चन इत्यादी धार्मिक विधी करण्यात आले होते. या विधींसाठी मोगरा, सोनचाफा, कमळ अशी विविध प्रकारची फुले आणि केळीचे खांब अन् आंब्याच्या डहाळ्या यांचीही आवश्यकता होती. त्या वेळी ही फुले आणि पाने मिळवण्याची सेवा करतांना प्रसारातील साधिका कु. संगीता नाईक यांना ‘हे सर्व आणण्याचे नियोजन देवाचेच असून त्याने त्याची आधीच सिद्धता केली आहे’, असे अनुभवावयास आले. देवाची ही लीला पहातांना कु. संगीता नाईक यांना ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी आवश्यक त्या संख्येने लागणारी फुले आणि अन्य साहित्य सूक्ष्मातून सर्व देवी-देवतांनीच गोळा केले असून ती फुले, फुलझाडे, फुलांच्या बागांचे मालक आणि फुले मिळवण्याच्या सेवेत सहभागी असलेले साधक या सर्वांचेे जीवन कृतार्थ झाले आहे’, असे वाटले. इतकेच नव्हे, तर अनेक जण सनातनच्या कार्याशी जोडले जात असल्याच्या अनुभूतीही आल्या. या सेवेत असतांना कु. संगीता नाईक यांना आलेल्या अनुभूती आणि या सेवेसंदर्भात त्यांचे झालेले चिंतन येथे देत आहोत.

२४ मे या दिवशी आपण यज्ञासाठी फुले मिळवतांना आलेल्या काही अनुभूती पाहिल्या,

आज आपण पुढील भाग पाहूया.

२. सोनचाफ्याची फुले मिळवण्याचे देवाने केलेले नियोजन

२ अ. देवाने यज्ञासाठी लागणारी सोनचाफ्याची फुले हितचिंतकाकडून मिळवून देणे

कु. संगीता नाईक

‘८.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘श्री ललितात्रिपुरासुंदरी देवीचा लक्षकुंकुमार्चन सोहळा’ होणार होता. त्यासाठी सोनचाफ्याची ५० फुले लागणार होती. मडकई येथील सौ. भक्ती सतरकर या साधिका एका हितचिंतकांच्या घरी गेल्या होत्या. त्यांना त्यांच्या दारात सोनचाफ्याच्या फुलांनी बहरलेले एक सोनचाफ्याचे झाड दिसले. त्यांनी त्या हितचिंतकांना विचारले, ‘‘आश्रमात होणार्‍या ललितात्रिपुरासुंदरी देवीच्या पूजेसाठी सोनचाफ्याची फुले हवी आहेत. तुम्ही ती देऊ शकता का ?’’ त्यांनी लगेच ‘‘हो’’ म्हटले आणि सांगितले, ‘‘तुम्हाला जेवढी फुले लागतील, तेवढी घेऊन जा.’’ देवाने अशा प्रकारे ८.५.२०१९ या दिवशी यागासाठी लागणारी सोनचाफ्याची फुले दिली आणि पुढे १२ तारखेपर्यंत प्रतिदिन सोनचाफ्याची जेवढी फुले आवश्यक होती, तेवढी त्यांच्याकडून आपल्याला मिळत गेली. आपल्या दारातील फुले सनातन आश्रमात होणार्‍या यज्ञासाठी दिली जात असल्याचेे समाधान त्या हितचिंतकांना मिळाले.

३. लाल आणि पांढर्‍या रंगाची कमळे मिळवतांना आलेली अनुभूती

३ अ. अल्प कालावधीत कमळे आणायची असतांना यापूर्वी देवाने दिलेेल्या अनुभूतींमुळे‘याचेही नियोजन देवाने केले असणार आणि स्वतःला केवळ त्या सेवेसाठी नियोजित जिवाला शोधायचे आहे’, असा विचार येऊन कमळे आणण्यासाठी तळ्याकडे जाणे

‘८.५.२०१९ या दिवशी होणार्‍या श्री ललितात्रिपुरासुंदरी देवीच्या पूजेसाठी आपल्याला लाल आणि पांढर्‍या रंगांची कमळे हवी होती. त्यासाठी मी काही साधकांना भ्रमणभाष केले; पण त्यांनाही काही अडचणी येत होत्या. त्या वेळी सायंकाळचे ६ वाजले होते. देवाने मला ‘कुणाला तरी घेऊन तूच तळ्याकडे जा’, असा विचार दिला. त्यानुसार मी आश्रमातील एका साधकाला घेऊन तळ्याकडे गेले. यापूर्वीही ‘एका घंट्यात कमळे हवी असतांनाही देवाने कुणातरी जिवाच्या माध्यमातून (त्याला ती सेवा देऊन) आपल्याला आवश्यक तेवढी कमळेे मिळवून दिली आहेत’, अशा मला अनुभूती आल्या आहेत. त्यामुळे या वेळीही ‘देवाने फुले देण्याचे नियोजन केलेले आहे. मला केवळ देवाने नियोजन केलेल्या त्या जिवाला शोधायचे आहे’, असे वाटले.

३ आ. तळ्याजवळ बसलेल्या लोकांजवळ जाऊन यज्ञासाठी कमळे हवी असल्याचे सांगणे, तेव्हा तेथे असलेल्या एका व्यक्तीने तळ्यात मगरी असतांनाही तळ्यात जाऊन आवश्यकतेपेक्षा अधिक कमळे तोडून देणे

मी त्या तळ्याकडे गेले. तेव्हा तळ्याच्या बाजूच्या कठड्यावर ४ – ५ जण बसले होते. त्यांच्याकडे जाऊन मी नमस्कार करून त्यांना म्हटले, ‘‘आमच्याकडे असलेल्या यज्ञासाठी मला कमळे हवी आहेत. ती देण्यासाठी देवाने तुमच्यापैकीच कोणाचे तरी नियोजन केले आहे. तुमच्यापैकी कोणी माझ्यासमवेत येऊ शकतो का ?’’ माझे बोलणे ऐकून एक व्यक्ती खाली उतरली आणि म्हणाली, ‘‘यज्ञाला पाहिजे ना, मी तुमच्यासमवेत येतो.’’ ते तळे पुष्कळच मोठे आहे. काठावरून मध्यभागी असलेल्या त्या कमळांपर्यंत पोचण्यासाठी सुमारे ३०० मीटर एवढे अंतर आत जावे लागते. तळ्यापाशी येतांना ते म्हणाले, ‘‘लाल रंगाची कमळे आहेत, तेथे दोन दिवसांपूर्वी ३ मगरी होत्या. त्या अजूनही तळ्यात आहेत. त्यामुळे एरव्ही मी तुमच्यासमवेत आलो नसतो; पण यज्ञासाठी कमळे हवी आहेत; म्हणून मी येतो.’’ त्या व्यक्तीने चिखल असलेल्या ठिकाणी कमरेएवढ्या पाण्यात उतरून आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक कमळे तोडून आणून दिली.

३ इ. एरव्ही कमळे आणायला जातांना सूर्यदेवाला सांगून जाणे; पण या वेळी सूर्यदेवाला सांगायचे विसरणे आणि कमळे काढून देणार्‍या व्यक्तीचे नाव ‘सूरज’ असल्याचे कळल्यावर सूर्यदेवानेच फुले दिल्याची जाणीव होणे

कमळे घेऊन परत येतांना मी त्यांना माझे नाव सांगितले आणि त्यांची ओळख करून घेऊन त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. तेव्हा त्या व्यक्तीने त्यांचे नाव ‘श्री. सूरज बोरकर’ असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘तुम्हाला कधीही कमळेे हवी असतील, तर मला संपर्क करा.’’ त्यांचे नाव ऐकल्यावर मला जाणवले, ‘मला नेहमी सूर्यदेवाचेच नाव असलेल्या व्यक्ती भेटतात आणि कमळे देतात.’ ‘प्रत्यक्ष सूर्यनारायणच यज्ञासाठी कमळे देतो’, याची अनुभूती मी यापूर्वीही घेतली आहे. एरव्ही कमळे आणायला जाण्यापूर्वी मी सूर्यनारायणाला प्रार्थना करून (सांगून) जाते. ही सवय त्यानेच मला लावली आहे. त्या दिवशी मात्र मी त्याला सांगायला विसरले होते; पण मी देवाला विसरले, तरी देव मला विसरला नाही. त्याने त्याचेच नाव असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून मला कमळे काढून आणून दिली आणि ‘मी तुझा हात धरला आहे. मी तुला सोडणार नाही’, असे सांगून ‘तोच हे सर्व करत आहे’, याची त्याने मला पुन्हा एकदा अनुभूती दिली.

३ ई. कमळे काढून देणार्‍या व्यक्तीच्या मुलीचे नाव ‘यज्ञ’ असल्याचे त्या व्यक्तीने नंतर सांगणे, तेव्हा ‘यज्ञासाठी’ कमळे हवी आहेत’, असे देवानेच स्वतःकडून वदवून घेतल्याची जाणीव होणे आणि कुणाला कुठल्या शब्दांत सांगायचे, हे देवालाच ठाऊक असल्याचे शिकायला मिळणे

एरव्ही मी कमळेे मागतांना ‘माझ्या देवासाठी कमळेे हवी आहेत’, असे म्हणते; पण या वेळी माझ्या नकळत मी ‘यज्ञासाठी कमळे हवी आहेत’, असे सांगितले होते. जणू काही देवानेच माझ्याकडून तसे बोलून घेतले होते. त्याची मला रात्री प्रचीती आली. रात्री श्री. सूरज बोरकर यांचा मला भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या यज्ञासाठी कमळे हवी होती ना, आमच्याकडेही यज्ञ आहे.’’ तेव्हा मी त्यांना जिज्ञासेने ‘कुठला यज्ञ ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘यज्ञ’ असल्याचे सांगितले. त्या वेळी कमळे मागतांना ‘देवाने माझ्याकडून ‘यज्ञा’साठी कमळे हवी असल्याचे का बोलून घेतले ?’, याचा मला उलगडा झाला. यावरून ‘कुणाला कुठल्या शब्दांत सांगायचे, तेही देवाला ठाऊक असते आणि तोच आपल्याकडून बोलवून घेतो’, हे मला शिकायला मिळाले.

४. श्री सत्यनारायण पूजेसाठी लागणारे केळीचे खांब आणतांना आलेली अनुभूती !

४ अ. श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे खांब अल्पावधीत हवे असल्याचा निरोप मिळाल्यावर ‘देवाचे काहीतरी नियोजन असणार’, असा विचार करून डोळे बंद केल्यावर एका परिसरातील केळीची झाडे दिसणे आणि एका साधकानेही त्याच परिसरातील एका व्यक्तीला संपर्क करण्यास सांगणे

‘७.५.२०१९ या दिवशी आश्रमात श्री सत्यनारायणाची पूजा होती. त्यासाठी केळीचे खांब हवे असल्याचा निरोप मला त्याच दिवशी सकाळी ७.२० वाजता मिळाला आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत केळीचे खांब हवे होते. (या अगोदर असणार्‍या पूजा किंवा यज्ञ यांसाठी आपण आश्रमाच्या लागवडीतून किंवा साधक अन् वाचक यांच्याकडून केळीचे खांब आणले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे ते उपलब्ध नव्हते.) मी विचार केला, ‘केळीचे खांब आणण्यासाठी १ घंटा कालावधी आहे. तेव्हा त्याचे सर्व नियोजन देवाने केलेलेच आहे.’ मी डोळे बंद केल्यावर मला श्री शांतादुर्गा मंदिराचा पुढचा भाग आणि खडपाबांध येथील अलीकडील भाग येथील बागांतील केळीची झाडे दिसली. मी एका साधकाला घेऊन निघाले आणि अधिक माहितीसाठी फोंड्यातील साधक श्री. शैलेश बेहरे यांना भ्रमणभाष केला. त्यांनी २ ते ३ जणांकडे चौकशी करून मला श्री. दुर्गादास गावडे यांचा संपर्क क्रमांक दिला. त्यांची बाग मला सूक्ष्मातून दिसलेल्या भागातच होती.

४ आ. श्री. दुर्गादास गावडे यांनी ती केळीची झाडे केवळ देवाच्या पूजेसाठी लावल्याचे सांगून हवे तेवढे केळीचे खांब नेण्यास सांगणे आणि त्यांनी स्वतः त्यासाठी साहाय्य करणे

मी श्री. गावडे यांना संपर्क करून त्यांना सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे खांब हवे असल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझी केळीची बाग येथेच आहे. तुम्हाला हवे, तेवढे केळीचे खांब घेऊन जा.’’ आम्ही त्यांच्या बागेत गेल्यावर यज्ञासाठी जसे हवे होते, तसेच केळीचे खांब मिळाले. आम्हाला श्री. गावडे यांनी ते काढण्यासाठी साहाय्य केले. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला यज्ञासाठी फुले, फळे असे जे काही हवे असेल, तर मला संपर्क करा आणि माझ्या बागेतून घेऊन जा. मी ही केळीची झाडे केळी खाण्यासाठी लावली नाहीत, तर आजकाल लोकांना पूजेसाठी केळीचे खांब मिळत नाहीत; म्हणून मी ही झाडे ठेवली आहेत.’’

(क्रमश: सोमवारच्या अंकात)

– कु. संगीता नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF