सावरकरांचे देशाच्या युद्धसज्जतेसंदर्भातील द्रष्टेपण !

आज २४ मे (वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी), या दिवशी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने…

‘जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंगले. मात्र त्यांनी त्यासंबंधी अत्यंत दु:खाने केलेले भाकीत खरे ठरले. ‘शस्त्रबळ वाढवा, प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या’, अशी शिकवण सावरकरांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली. ‘रिक्रूटवीर’ म्हणून त्यांची कुचेष्टा करण्यात आली; पण वर्ष १९६२ मध्ये चीनचे सत्य आणि क्रूर स्वरूप जेव्हा प्रकट झाले, तेव्हा अनेकांना सावरकरांच्या द्रष्टेपणाची ओळख पटू लागली. सैन्यसामग्री वाढवण्याची घोषणा तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना करावी लागली. केंद्र सरकारलाही ती पटू लागली. वर्ष १९६५ मध्ये भारतीय सैन्याने जेव्हा पाकिस्तानवर एकामागून एक विजय मिळवले, तेव्हा रुग्णशय्येवर असलेल्या या पुरुषश्रेष्ठाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.’ (साभार : सावरकर इतिहास दैनंदिनी)

– दादुमिया (संदर्भ : स्वातंत्र्यवीर – दिवाळी विशेषांक २०१६)

प्रतिकूल परिस्थितीत मन वज्रशाली करण्यासाठी गीतेचे साहाय्य घेणारे सावरकर

‘सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रांसच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. आता आपला अमानुष छळ होणार, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरता त्यांना गीता आठवली. कवचमंत्र म्हणून ही कविता रचली. त्यातील आशय आणि शब्द गीतेतीलच आहेत.

अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ॥

अग्नि जाळी मजसि ना खड्ग छेदितो ।
भ्याड मृत्यु मजसि पाहुनि पळत सुटतो ॥

यातील शब्द आणि तत्त्वज्ञान गीतेतच आहे.
अजो नित्य: शाश्‍वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

– श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्‍लोक २०)

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ॥

– श्रीमद्भगवद्गीता (अध्याय २, श्‍लोक २३)

अर्थ : हा आत्मा अजन्मा, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीर मारले गेलेले असतांनाही हा आत्मा मारला जात नाही. या आत्म्याला न शस्त्रे कापू शकतात, न अग्नी जाळू शकतो.

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील वरील श्‍लोकाचेच हे प्रतिबिंब आहे. गीतेच्या या शब्दांनी त्या घोर संकटात त्यांचे मन स्थिर आणि युसुत्सू झाले अन् छळ करायला आलेल्या पहारेकर्‍यावर ते ओरडले, ‘‘खबरदार, पुढे याल तर मी तुमच्यापैकी एकाचा मुडदा पाडल्याशिवाय रहाणार नाही.’’ त्यामुळे पहारेकरी घाबरले आणि त्यांनी सावरकरांच्या अंगाला हात लावला नाही.’

– श्री. वा. ना. उत्पात

(संदर्भ : स्वातंत्र्यवीर – दिवाळी विशेषांक २०१६)

जिहादी मानसिकतेचा अचूक वेध घेणारे द्रष्टे सावरकर !

‘वर्ष १९४२ मध्ये परदेशी वर्तमानपत्रांनी त्या वेळी चाललेल्या पाकिस्तानच्या वादाविषयी विचारले. आपले डावे नेते ‘पाकिस्तान फार काळ टिकणार नाही’, असे मत मांडत होते. त्यात नेहरू, जयप्रकाश नारायण इत्यादी नेत्यांचा समावेश होता. सावरकर म्हणाले, ‘‘मुसलमान जिहाद पुकारून भारताचे प्रांत जिंकतील आणि पाकिस्तान समृद्ध करतील. त्यांची कीव येणारे भाबडे त्यांना आर्थिक साहाय्य करणार नाहीत कशावरून ?’’ आज मुसलमानी आतंकवादी काय करत आहेत ? मुलायमसिंह पाकिस्तानला २,००० कोटी रुपये द्या, असे बडबडले होते ना ? आज आपण काश्मिरात आणि अफगाणिस्तानात सहस्रो कोटी रुपये ओततोच आहोत ना ? सावरकरांनी हे भाकीत सत्तर वर्षांपूर्वी केले होते.’

– दादुमिया (संदर्भ : स्वातंत्र्यवीर – दिवाळी विशेषांक २०१६)


Multi Language |Offline reading | PDF