२० वर्षे रेंगाळलेला जळगावचा घरकुल घोटाळा !

‘जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत रहाणार्‍या लोकांना अल्प दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरि विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटी रुपयांचे कर्ज काढून ११ सहस्र घरकुले बांधण्याच्या कामास वर्ष १९९९ मध्ये प्रारंभ झाली; मात्र या योजनेतील सावळागोंधळ वर्ष २००१ मध्ये समोर आला. प्रारंभीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, अपव्यवहार उघडकीला आले. पालिकेने घरकुल ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती अनुमती (एन्.ए.) घेतली गेली नव्हती. सत्ताधार्‍यांनी मर्जीतील ‘खान्देश बिल्डर्स’ला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणार्‍या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना ही गोष्ट लक्षात आल्यावर ३ फेब्रुवारी २००६ या दिवशी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ सहस्र रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली. या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांच्यासह ‘खान्देश बिल्डर’चे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तूविशारद, पालिकेचे विधी सल्लागार, तसेच अधिकारी अशा सुमारे ९० जणांचा समावेश आहे. या प्रकरणी तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात जावे लागले. धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ हे जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या अपहाराविषयी ७ जूनला निकाल देणार आहेत. आता निकाल काय लागतो ?, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २० वर्षांनी निकाल लागेल; मात्र ज्या गरिबांच्या नावावर ही योजना झाली, कर्ज घेतले, ते अद्यापही वार्‍यावरच राहिले.

तात्पर्य, प्रामाणिक प्रशासन आणि शासनकर्ते असल्याविना भ्रष्टाचार थांबणे शक्य नाही.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now