भाजपचा विजय : हिंदूंची अपेक्षा !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि त्याच्या आघाडीला हिंदूंनी बहुमत देऊन विजयी केले आहे. वर्ष २०१४ मध्ये भाजप आघाडीने काँग्रेसची सत्ता घालवल्याने देशात प्रथमच काँग्रेसेतर पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आले. त्या वेळी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधासह हिंदूंना आतंकवादी ठरवण्याच्या विरोधातील हिंदूंचा जो राग होता, त्या रागातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यात आले होते. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात भारताची झालेली दयनीय स्थिती पहाता केवळ ५ वर्षांत सत्ता मिळाल्यावर भाजपला पुष्कळ काही करता येण्याची हिंंदूंना त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. त्यामुळे गेल्या ५ वर्षांच्या भाजप सरकारच्या कार्यकाळाचा कारभार पहाता ‘हिंदूंनी त्यांना आणखी एक संधी देण्याची आवश्यकता आहे आणि हे ठरवल्यामुळेच भाजपचा पुन्हा विजय झाला’, हे मान्य करावे लागेल. ‘भाजपने गेल्या ५ वर्षांत विकासाचे कार्य केले आणि ते नजरेत भरणारे आहे किंवा ते उठून दिसणारे आहे’, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. जीएस्टी आणि नोटाबंदी यांमुळे जनतेच्या मनात असंतोष होता, हे नाकारता येणार नाही. भाजप स्वतःला हिंदुत्वनिष्ठ पक्ष म्हणतो किंवा मोदी यांची प्रतिमाही हिंदुत्वनिष्ठ म्हणून असतांना गेल्या ५ वर्षांत हिंदूंना अपेक्षित असलेली सूत्रे पूर्ण केली, असेही म्हणता येणार नाही. असे असतांनाही हिंदूंनी भाजपला विजयी करून पुन्हा सत्ता दिली आहे, याचा त्यांनी विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय ती पुढे टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना अपेक्षित जे कार्य आहे, ते करण्यासाठी काय केले पाहिजे ?, याचाही विचार भाजपने करणे आवश्यक आहे.

आणखी एक संधी !

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीनंतर त्या वेळचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची प्रतिमा प्रखर हिंदुत्वनिष्ठ म्हणून पुढे आली. भाजप आणि रा.स्व. संघ यांच्यामध्येही अशा प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याची आवश्यकता असल्याने आणि विरोधी पक्षांनी त्यांना सातत्याने याच प्रतिमेवरून लक्ष्य केल्याने हिंंदूंना त्यांचा आधार वाटू लागला आणि यातूनच ते पुढे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचा भ्रष्टाचार, काळा पैसा, गोमांस निर्यातबंदी आदी सूत्रे घेतल्याने हिंदूंनी त्यांना सत्तेवर बसवले. सत्तेवर आल्यावर ते राममंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, गोहत्याबंदी, आतंकवादाचा नायनाट आदी सूत्रांवर ते ५ वर्षांत हिंदूंना अपेक्षित असे कार्य करतील, अशी अपेक्षा होती; मात्र यातील एकाही सूत्रावर कार्यवाही झाली नाही. उलट गोरक्षकांना ‘समाजकंटक’ ठरवले गेले. जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट होण्याऐवजी सैन्याच्या तळांवर आक्रमणे झाली. विदेशातून काळा पैसा आणण्याच्या सूत्रावर सरकारने पूर्णतः मौन बाळगले. याच वेळी सरकारने पूर्ण लक्ष विकासावर ठेवले. यामुळे खूप काही कार्य झाले आणि त्यांच्या योजनांना मोठे यश मिळाले, जनतेचा प्रतिसाद मिळाला, असेही म्हणता येत नाही. याच कालावधीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील त्यांची राज्यांतील सत्ताही गेली. हे पहाता भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नव्हतीच. याची जाणीव भाजपलाही झाली. त्याच वेळी सैन्य तळांवरील जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’मुळे भाजपला पुनः संजीवनी मिळाल्यासारखेच झाले आणि आता निवडणुकीच्या प्रचारात हेच सूत्र उठवण्यात आले. ज्वलंत हिंदुत्वासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचाही प्रभाव पडला आणि त्याचा लाभ भाजपला विजयी होण्यात झाला. हिंदूंना वाटले की, केवळ ५ वर्षांत भाजप राममंदिर आणि अन्य हिंदुत्वाची सूत्र पूर्ण करू शकला नाही आणि जर त्याला सत्ताच्युत केले, तर नंतरही ते होण्याची शक्यता नाही. त्या तुलनेत भाजपला पुन्हा सत्ता दिली, तर किमान ही आशा कायम राहू शकते की, भाजप ही सूत्रे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील. ‘काँग्रेसच्या भ्रष्टाचार आणि हिंदुद्वेषी कारभारापेक्षा मोदी यांचा कारभार उजवा आहे’, असा विचार करूनच हिंदूंनी मोदी यांना पुन्हा सत्ता दिली आहे.

शेवटची संधी ठरू नये !

भाजपचा आताचा विजय हा स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवा की, ती त्यांना जनतेने सत्तेच्या रूपात दिलेली ही आणखी एक आणि शेवटची संधी आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसच्या काळात हिंदूंची जी दूरवस्था झाली, ती पालटण्याचे कार्य मोदी करू शकतात, अशी आशा हिंदूंना वाटते. आता मोदी यांनी त्यांनी घोषणापत्रातून दिलेली कलम ३७० आणि ३५ अ काढण्याची कृती सर्वप्रथम केली पाहिजे, तसेच समान नागरी कायदा त्वरित लागू करून लांगूलचालनाची विकृती कायमची बंद केली पाहिजे. त्याच वेळेस गोहत्याबंदीही केली पाहिजे. धर्मांतरविरोधी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदाही केला पाहिजे. यासाठी भाजपला पुष्कळ काही करावे लागणार नाही. ज्याप्रमाणे तोंडी तलाकवर मोदी सरकारने अधिसूचना काढून तो लागू केला, तसेच यांविषयी केले जाऊ शकते. राममंदिराचे सूत्र न्यायालयात असले, तरी सरकारच्या अधिकार कक्षेत राममंदिर बांधता येऊ शकते, असे डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्यासह अनेक कायदेतज्ञ म्हणत आहेत, ते केले पाहिजे. महत्त्वाचे सूत्र म्हणजे ज्याप्रमाणे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द घातला, तसेच तो काढून तेथे भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ असल्याचा शब्द घालून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे. ही सूत्रे पूर्ण केली, तर पुन्हा भाजपला प्रचार करण्याचीही आवश्यकता न भासता हिंदू त्यांना पुन्हा सत्तेवर बसवतील, यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.


Multi Language |Offline reading | PDF