परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाची ‘विष्णुयागा’द्वारे झालेली सांगता आणि सद्गुरुद्वयींना आलेली दैवी प्रचीती !

श्रीविष्णूच्या मूर्तीला वाहिलेले फूल ऊन असूनही कोमेजले नव्हते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी संकल्प !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – श्रीमन्नारायणस्वरूप  परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव ५ ते १२ मे या कालावधीत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात येथे पार पडला. महर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार आश्रमात या कालावधीत विविध धार्मिक विधी करण्यात आले. या विधींचे यजमानपद सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भूषवले. या विधींच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे’, असे संकल्प करण्यात आले. या विधींचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केले. या वेळी आश्रमातील संत आणि साधक उपस्थित होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भृगु महर्षींच्या आज्ञेने सर्वप्रथम ५ मे या दिवशी सौरयाग, ६ मे या दिवशी मयन महर्षींच्या आज्ञेने महाराजमातंगी याग, ७ मे या दिवशी श्री सत्यनारायण पूजा, ८ मे या दिवशी लक्षकुंकुमार्चन अंतर्गत स्फटिकाच्या श्रीयंत्रावर श्री ललितात्रिपूरसुंदरी देवीचे आवाहन करून पूजन करण्यात आले. ९ मे या दिवशी श्रीयंत्रावर लक्षकुंकुमार्चन, १० मे या दिवशी लघुगणहोम करण्यात आला, तर १२ मे या दिवशी ‘श्रीसत्यनारायण’स्वरूप श्रीविष्णुयागाने जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.

डावीकडून श्री. ईशान जोशी, पूर्णाहुती देतांना श्री. अमर जोशी आणि भावपूर्ण नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

विष्णुयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि सद्गुरुद्वयींना आलेली दैवी प्रचीती

१. सद्गुरुद्वयी पूजनस्थळी आल्यावर पुष्कळ मोठ्या प्रमाणात चाफ्याचा सुगंध पसरला. पूजनाच्या मांडणीत ठेवलेल्या श्रीविष्णूच्या मूर्तीला चाफ्याचे फूल वाहण्यात आले होते. एरव्ही फूल जवळ असल्यावरही सुगंध येत नाही; पण मूर्तीला वाहिलेले फूल आमच्यापासून दूर अंतरावर असतांनाही सुगंध येत होता. यातून ‘देवाने त्याच्या अस्तित्वाची प्रचीती दिली आहे’, असे सद्गुरुद्वयींना जाणवले.

२. पूजनाला आरंभ होण्यापूर्वी एक घार आश्रमाभोवती घिरट्या घालत होती, असे लक्षात आले.

३. आचमन झाल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी डोळे बंद केल्यावर त्यांना गणपति पूजनासाठी ठेवलेला नारळ हलतांना जाणवला. त्या वेळी ‘महर्षीनी दिलेली चांदीची मूर्ती ठेवण्यासाठी गणपति सुचवत आहे’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या लक्षात आले.

४. यागाचा संकल्प करण्यापूर्वी यज्ञस्थळाच्या समोर असलेल्या आैंदुबर वृक्षातून अनेक पाने पडत होती. त्या वेळी ‘महाविष्णुतत्त्व कार्यरत असल्याने निसर्गालाही आनंद होत आहे’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या लक्षात आले.

५. पूजनात उजव्या सोंडेचा गणपति ठेवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला वाहिलेली फुलांची माळ त्यांच्या उजव्या भागाकडे वळली.

या सर्व अनुभूतींच्या माध्यमातून ‘पूजनस्थळी महाविष्णूचे तत्त्व जागृत झाले आहे’, असे सद्गुरुद्वयींच्या लक्षात आले.

६. ज्या वेळी सद्गुरुद्वयी उजव्या सोंडेच्या गणपतीचे पूजन करत होत्या, त्या वेळी देवाला वाहिलेले सर्व कुंकू मूर्तीच्या उजव्या भागावर पडत होते. यातून ‘पूजनातील शक्तीचा प्रवाह उजव्या भागाकडे, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे जात आहे’, असे लक्षात आले.

७. दुपारी २ वाजता श्रीविष्णूला कृष्णकमळ अर्पण करण्यात आले. कडक ऊन असतांनाही ते कोमेजले नाही.

८. पूजेपूर्वी एक गरूड आश्रमाजवळ येऊन थांबला होता.

९. यज्ञकुंडातील धुराचा मंद सुगंध येत असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या एका साधिकेला जाणवले.

श्रीविष्णुयागाच्या वेळी श्रीसत्यनारायणाच्या रूपात दर्शन देणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांनी केले स्मरण !

श्रीविष्णुयागाचा संकल्प सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. प्रारंभी श्री गणपतिपूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीविष्णूच्या षोडशोपचार पूजनाच्या अंतर्गत विष्णुसहस्रनामाचे उच्चारण करत १०८ तुळशीदले अर्पण करण्यात आली. पुरुषसुक्त आणि विष्णुसुक्त म्हणत यागात तूप अन् पांढरे तीळ यांची आहुती देण्यात आली. जन्मोत्सवाच्या दिवशी श्रीसत्यनारायणाच्या रूपात दर्शन देणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांनी स्मरण करत श्रीविष्णूची यागाद्वारे पुन्हा एकदा आराधना केली. या वेळी सनातनचे संत आणि आश्रमातील साधक उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF