राज ठाकरे यांना लोकांनी नाकारले

सभा घेतलेल्या सर्व ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांचा दारूण पराभव

मुंबई, २३ मे (वार्ता.) – महाराष्ट्रात मोदी-शहा यांच्या विरोधात १० प्रचारसभा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाजूने प्रचार केला. प्रत्यक्षात मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या सर्व ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला.

राज ठाकरे यांनी १२ ते २६ एप्रिल या कालावधीत नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, महाड, काळाचौकी (मुंबई), भांडुप (मुंबई), कामोठे (पनवेल), नाशिक येथे भाजपच्या विरोधात सभा घेतल्या. सभांना झालेली सहस्रावधी लोकांची गर्दी पहाता ‘भाजप-शिवसेना यांच्या उमेदवारांना फटका बसेल’, असे म्हटले जात होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांना जे करता आले नाही, ते राज ठाकरे यांनी घेतलेल्या सार्वजनिक सभांतून राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते. प्रसिद्धीमाध्यमांनीही राज ठाकरे यांच्या सभांना उचलून धरले. प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या सभांना होत असलेली गर्दी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतदानामध्ये परावर्तीत होऊ शकली नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF