भाजपचा पुन्हा बहुमताने विजय !

लोकसभा निवडणूक २०१९

 • भाजप आणि मित्र पक्ष ३०० + ५१

 • काँग्रेस आणि मित्र पक्ष ५१ + ३८

 • इतर १०२

नवी देहली – १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची मोजणी २३ मेच्या सकाळपासून चालू झाल्यावर अवघ्या काही घंट्यांत भाजपला पुन्हा बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले. एकट्या भाजपला ३००, तर भाजपप्रणीत लोकशाही आघाडीला ३५१ जागांवर आघाडी मिळत असल्याचे स्पष्ट झाले. मागील निवडणुकीत भाजपला २८२, तर भाजप लोकशाही आघाडीला ३३५ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे मागच्या तुलनेत या वेळी भाजपला १८ हून अधिक जागांचा लाभ झाला आहे. यातून भाजपच्या, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारभाराला जनतेने  स्वीकारल्याचे दिसून येते. भाजप पुन्हा जिंकत असल्याने सलग दुसर्‍यांदा काँग्रेसेतर पक्षाचे सरकार येण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी ३ वेळा, तर इंदिरा गांधी यांनी २ वेळा काँग्रेसला बहुमत मिळवून सत्ता स्थापित केली होती. सलग २ वेळा निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांची बरोबरी केली आहे. १९ मे या दिवशी १० विविध संस्थांनी मतदानोत्तर चाचणीचे अंदाज घोषित केले होते, यातील ९ संस्थांच्या अंदाजांनुसार भाजप आघाडी सरकारला बहुमत मिळणार असल्याचे समोर आले होते. त्यानुसारच जवळपास प्रत्यक्षात भाजपला आणि त्याच्या मित्रपक्षांना मतमोजणीत आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. व्हीव्हीपॅट (या यंत्राच्या माध्यमातून ‘ज्या उमेदवाराला मत दिले आहे, ते मत त्याच उमेदवाराला मिळाले कि नाही’, याची शहानिशा करता येते.) आणि ईव्हीएम् (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) यांमधील मतांच्या नोंदीच्या पडताळणीमुळे निकाल घोषित होण्यास वेळ लागणार असल्याने मध्यरात्रीपर्यंत बहुतांश निकाल लागण्याची शक्यता आहे.

५४२ मतदारसंघांपैकी भाजप ३००, तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर आहे. डीएमके २३, तृणमूल काँग्रेस २३, वायएस्आर् काँग्रेस २४ आणि शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ आणि बिजू जनता दल १३ जागांवर आघाडीवर आहे. सद्यपरिस्थितीनुसार भाजप आघाडी ३५१, काँग्रेस आघाडी ८९ आणि अन्य पक्ष १०२ जागांवर आघाडीवर आहेत.

या निवडणुकीसाठी ११ एप्रिल ते १९ मे पर्यंत ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले होते. देशभर सरासरी ६७.११ टक्के मतदानाची नोंद झाली. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात मतदानाचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. यात भाजपला ३१.३४ टक्के, काँग्रेसला १९.५२ टक्के, तर ४९.१४ टक्के अन्य पक्षांना मते मिळाली आहेत.

ओमर अब्दुल्ला यांच्याकडून मोदी यांचे अभिनंदन

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदी अन् अमित शहा यांचे अभिनंदन केले. ‘विरोधी पक्षांनी आता वर्ष २०२४ ची सिद्धता केली पाहिजे. अजून पुढची ५ वर्षे भाजपला कोणी हरवू शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये भाजप आघाडीवर

वर्ष २०१८ मध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन तेथे काँग्रेसने विजय मिळवला होता; मात्र लोकसभेत काँग्रेसला हे यश राखता आलेले नाही. राजस्थानमध्ये २५ पैकी २३ जागांवर, मध्यप्रदेशात २९ पैकी २८ जागांवर, तर छत्तीसगडमध्ये ११ पैकी ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.

कर्नाटकमध्ये भाजपला २८ पैकी २४ ठिकाणी आघाडी

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे युती सरकार असतांना येथे भाजपने २८ पैकी २४ जागांवर आघाडी घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ६ पैकी प्रत्येकी २ ठिकाणी भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स पुढे

सायंकाळी विलंबाने मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील सर्व ६ जागांपैकी २ जागांवर भाजप पुढे आहे, तर २ जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि २ जागांवर अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मागच्या तुलनेत भाजप एका जागेवर, तर पीडीपी ३ जागांवर पराभवाच्या छायेत आहे. अनंतनागमधून माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती या नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैद मसूदी यांच्यापेक्षा ४ सहस्र मतांनी मागे (पिछाडीवर) होत्या.

तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस यांना सर्वाधिक जागा

तमिळनाडूूमध्ये द्रमुक आणि काँग्रेस यांच्या युतीला ३६ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर एआयएडीएम्के २ जागांवर आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत; पण या राज्यात वेल्लोरची निवडणूक रहित करण्याची कारवाई झाली होती. गेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या एआयएडीएम्के पक्षाने ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळवला होता.

बंगालमध्ये भाजपला मोठे यश

बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे, तरीही भाजपने प्रथमच येथे १८ जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेसला २४ जागांवर आघाडी राखता आलेली आहे. या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यांच्या वेळी हिंसाचार झाला होता. तरीही येथे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते.

भारत जिंकला ! – पंतप्रधान मोदी

या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, या निवडणुकीत भारत जिंकला आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्‍वास म्हणजे विजय !’

रशिया, चीन, जपान, इस्रायल आणि श्रीलंका यांच्या प्रमुखांकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही शुभेच्छा दिल्या. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी दूरभाषवरून मोदी यांच्याशी चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही विजयानिमित्त मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ‘तुमच्यासमवेत काम करू’, असे विक्रमसिंघे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतांना म्हटले, ‘भारत आणि इस्रायल यांची मैत्री अधिक सशक्त होईल.’

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून मोदी यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ! शांतता आणि दक्षिण आशियाची भरभराट यांसाठी त्यांच्यासमवेत काम करू.’

काँग्रेसकडून पुन्हा ईव्हीएमवर – प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न

भाजपची घोडदौड पाहून काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी पुन्हा ईव्हीएमवर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर) प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे; मात्र देहलीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांनी ‘ज्या पद्धतीने प्रवाह दिसतोय तो पहाता ही मोदी लाटच आहे’, असे म्हटले आहे.

प्रियांका वाड्रा प्रभावशून्य !

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला उत्तरप्रदेशमध्ये अमेठी (राहुल गांधी) आणि रायबरेली (सोनिया गांधी) या दोनच जागा जिंकता आल्या होत्या. आताच्या लोकसभा निवडणुकीच्या काही मासांपूर्वी काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका वाड्रा यांना राजकारणात उतरवले आणि त्यांना सरचिटणीस करून उत्तरप्रदेशाच्या पूर्व भागाचे दायित्व दिले. या निवडणुकीच्या काळात त्यांनी राज्यात मोठा प्रचार केला. मोदी आणि भाजप यांच्या विरोधात जोरदार प्रचार करूनही त्यांना जनतेने नाकारले आहे.

नामांकित उमेदवारांची २३ मे या दिवशीची सायंकाळी उशिरापर्यंतची स्थिती

 • वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड लाख मतांनी पुढे
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात ५ लाखांपेक्षा अधिक मतांनी पुढे
 •  थिरुवनंतपूरम येथून काँग्रेस उमेदवार शशी थरूर १३ सहस्र मतांनी पुढे
 • भाग्यनगर येथून एमआयएमचे  असदुद्दीन ओवैसी पुढे
 • भाजपचे उन्नावचे उमेदवार आणि खासदार साक्षी महाराज विजयी
 • साध्वी प्रज्ञासिंह १ लाख १० सहस्र मतांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यापेक्षा पुढे, बेगुसराय येथे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह हे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्यापेक्षा ८७ सहस्र मतांनी आघाडीवर
 • गुलबर्ग्याचे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे ४२ सहस्र मतांनी पिछाडीवर
 • बिहारच्या काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा ७४ सहस्र मतांनी पिछाडीवर
 • काँग्रेसचे मध्यप्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे ५३ सहस्र मतांनी पिछाडीवर

साधनेचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद यांमुळे नरेंद्र मोदी यांचा विजय !

नरेंद्र मोदी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन तेथील एका गुहेत बसून १८ घंटे ध्यानधारणा केली. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची डिसेंबर २०१८ मध्ये कल्याण येथे ते आले असता भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. ‘त्याचेच हे फळ आहे’, असे जनतेला वाटते. योगतज्ञ दादाजी यांनी ‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील’, असे भाकीत वर्तवले होते आणि ते खरे ठरले होते.


Multi Language |Offline reading | PDF