उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांचे धर्मप्रेमी अधिवक्ता, उद्योगपती आणि जिज्ञासू यांना हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेशमध्ये जनसंपर्क अभियान

पू. नीलेश सिंगबाळ

१. औराई (संत रविदासनगर, उत्तरप्रदेश) येथे अधिवक्त्यांना मार्गदर्शन 

भारतात चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण केले जात नाही ! – पू. नीलेश सिंगबाळ

औराई  (संत रविदासनगर, उत्तरप्रदेश) – आज भारतात केवळ हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण केले जात आहे; मात्र चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण केले जात नाही. अधिग्रहित करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये हिंदूंनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला जात असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. याविषयी हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी अधिवक्त्यांच्या बैठकीत केले. या बैठकीला २७ हून अधिक अधिवक्ते उपस्थित होते.

क्षणचित्र : उपस्थित सर्व अधिवक्त्यांनी त्यांच्या गावांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन आयोजित करण्याची इच्छा प्रदर्शित केली.

२. माधोसिंह सेवा मंडळाच्या  सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक !

माधोसिंह बाजार (संत रविदासनगर, उत्तरप्रदेश) – येथील माधोसिंह सेवा मंडळाच्या सदस्यांसमवेत हिंदु जनजागृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले. येथील धर्माभिमानी श्री. राजन उमर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी श्री. उमर म्हणाले, ‘‘माधोसिंह येथील बहुसंख्य धर्मांधांनी येथील हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घातला. त्यामुळे हिंदूंना येथून पलायन करावे लागले. आज माधोसिंहचे नावही पालटून ते कलिनाबाद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ या वेळी पू. सिंगबाळ म्हणाले, ‘‘धर्मशिक्षणाचा अभाव, धर्मबंधुत्वाचा अभाव आणि असंघटितपणा यांमुळे आज हिंदूबहुल भारतातील ८ राज्यांमध्ये हिंदूंवर अल्पसंख्यांक होण्याची स्थिती ओढवली आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधना केली पाहिजे.’’ पू. सिंगबाळ यांनी उपस्थितांना ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त’ या नामजपांचे महत्त्व सांगितले, तसेच मंडळाच्या सदस्यांच्या शंकांचे निरसन केले.

३. संत रविदासनगर येथे उद्योगपती आणि व्यावसायिक यांना साधनेविषयी मार्गदर्शन 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे हीच सध्याची समष्टी साधना !

संत रविदासनगर (भदोही, उत्तरप्रदेश) – येथील उद्योगपती आणि व्यावसायिक यांना नुकतेच पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी जीवनातील समस्यांच्या निराकरणासाठी नामसाधना करण्यासमवेतच स्वत:तील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्याचे महत्त्व सांगितले. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, हीच सध्याची समष्टी साधना आहे’, असेही पू. सिंगबाळ यांनी या वेळी सांगितले. गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधन कार्याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. या बैठकीसाठी सनदी लेखापाल श्री. करुणापती दुबे यांचे सहकार्य लाभले.

४. हंडिया (प्रयागराज) येथे प्रयागराज कुंभमेळ्यातील जिज्ञासूंना संपर्क

प्रयागराज – येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे भव्य प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट दिलेले श्री. राजेंद्र साहू, कु. प्रदीप आणि कु. संजीव यांना हिंदु जनजागृती समितीचे उत्तर तथा पूर्वोत्तर भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी संपर्क केला. या वेळी समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते. या वेळी ‘हिंदूंची सद्यस्थिती, तसेच धर्मावर होणारे आघात’ यांविषयी चर्चा झाली.

क्षणचित्र : पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतल्यानंतर कु. प्रदीप आणि कु. संजीव यांनी त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांमध्ये धर्माविषयी जागृती करण्यासाठी अन् संघटन वाढवण्यासाठी मार्गदर्शन आयोजित करण्याची विनंती केली.

५. फतुहा (प्रयागराज) येथे धर्माभिमान्यांना मार्गदर्शन

हिंदूंनी धर्माचरण करून इतरांना प्रेरित करावे !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सध्या धर्मबंधुत्वाच्या अभावामुळे हिंदूंमध्ये ऐक्य नाही. त्यामुळे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून इतरांना प्रेरित करावे, असे प्रतिपादन पू. नीलेश सिंगबाळ यांनी एका बैठकीत केले. हनुमानगंज तालुक्यातील फतुहा येथे धर्माभिमानी श्री. अशोककुमार जयस्वाल यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.


Multi Language |Offline reading | PDF