रामनाथी आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला करण्यात आलेल्या लक्षकुंकुमार्चन विधीच्या वेळी श्री ललितासहस्रनामाचे पठण करतांना श्री. अमोल अरविंद हंबर्डे यांना आलेल्या अनुभूती !

श्री. अमोल अरविंद हंबर्डे

१. ‘श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकुमार्चन करण्याच्या वेळी श्री ललितासहस्रनामाचे पठण करायचे आहे’, असे समजल्यावर आरंभी ‘पठण कसे करता येईल ?’, असे वाटणे, नंतर ‘देवानेच नाव सुचवले आहे, तर देवच करवून घेणार आहे’, असा विश्‍वास वाटणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मयन महर्षि यांच्या आज्ञेनुसार ८.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकुमार्चन करण्यात येणार होते. त्या वेळी श्री ललितासहस्रनामाचे पठण करत लक्षकुंकुमार्चन करायचे होते. ६.५.२०१९ या दिवशी ‘मला श्री ललितासहस्रनामाचे पठण करायला बसायचे आहे’, असे समजले. तेव्हा मला वाटले, ‘मला संस्कृत येत नाही. मग मला पठण कसे करता येईल ?’; पण मला ‘देवानेच माझे नाव सुचवले आहे, तर देवच माझ्याकडून करवून घेणार आहे’, असाही विश्‍वास वाटत होता.

२. श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकुमार्चन करण्याचा नियोजित दिवस पालटल्याने देवाच्या कृपेने अजून एक दिवस श्री ललितासहस्रनाम म्हणण्याचा सराव करायला मिळणे

दुसर्‍या दिवशी श्री ललितासहस्रनाम म्हणण्याचा सराव चालू झाला. प्रत्यक्ष कार्यक्रम ८.५.२०१९ या दिवशी होता; पण काही कारणास्तव ‘९.५.२०१९ या दिवशी लक्षकुंकुमार्चन करायचे’, असे ठरवण्यात आले. त्यामुळे देवाच्या कृपेने मला अजून एक दिवस सराव करायला मिळाला.

३. श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीला लक्षकुंकुमार्चन करण्याच्या वेळी श्री ललितासहस्रनामाचे पठण करतांना आलेल्या अनुभूती !

३ अ. ‘देहावरील आवरण हळूहळू दूर होत आहे’, असे वाटून हलकेपणा जाणवणे : ९.५.२०१९ या दिवशी सकाळपासूनच मला वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सकाळी १०.३० वाजता श्री ललितासहस्रनामाचे पठण चालू झाले. पठण चालू झाल्यावर मला ‘देहावरील आवरण हळूहळू दूर होत आहे’, असे वाटून हलकेपणा जाणवू लागला.

३ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ समोर बसले आहेत’, असे जाणवून भावजागृती होणे : श्री ललितात्रिपुरसुंदरी देवीच्या चित्राकडे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून माझी भावजागृती होत होती. छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा मला अधिक सजीव भासत होता. ‘परात्पर गुरु डॉक्टर समोरच बसले आहेत’, असे मला जाणवत होते.

३ इ. पुरोहित साधक ‘श्री ललितादेवी चरणार्पणमस्तु !’, असे म्हणत असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चरण दिसणे अन् ‘श्री ललितात्रिपुरसुंदरादेवी सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित आहे’, असे जाणवणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत होत्या. त्या वेळी ‘देवीच्या चैतन्याचे पिवळ्या रंगाचे कवच सद्गुरुद्वयी आणि श्री ललितासहस्रनामाचे पठण करणारे साधक यांच्या भोवती आहे’, असे मला जाणवले. पुरोहित साधक ‘श्री ललितादेवी चरणार्पणमस्तु !’, असे म्हणत असतांना मला सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू यांचे चरण दिसत होते. त्या वेळी ‘श्री ललितात्रिपुरसुंदरादेवी सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित आहे’, असे मला जाणवले.

३ ई. श्री ललितासहस्रनामाचे पठण करत असलेले पुरोहित आणि साधक यांच्या आवाजात मला एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य जाणवत होते. माझ्या देहात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली होती.

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘सगळ्यांचे तोंडवळे पठण करण्यापूर्वीपेक्षा पठण झाल्यानंतर अधिक चांगले दिसत आहेत’, असे सांगणे

लक्षकुंकुमार्चन झाल्यानंतर सद्गुरु बिंदाताईंनी सांगितले, ‘‘सगळ्यांचे तोंडवळे पठण करण्यापूर्वीपेक्षा पठण झाल्यानंतर अधिक चांगले दिसत आहेत.’’ त्या दिवशी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुष्कळ चैतन्य अनुभवता आले. असे आजपर्यंत कधीच झाले नव्हते.

५. कृतज्ञता

हे गुरुदेवा, ‘तुमच्या कृपेने मला श्री ललितासहस्रनामाचे पठण करण्याची सेवा मिळाली आणि तुम्हीच ती करवून घेतली. त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– आपल्या चरणांची धूळ होण्यास आतुरलेला,

श्री. अमोल अरविंद हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now