परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या धार्मिक विधींसाठी आवश्यक असणारी फुले जमवतांना कु. संगीता नाईक यांनी अनुभवलेली श्रीगुरूंची कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरुदेवांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी आश्रमात सौरयाग, महाराजमातंगी याग, श्री सत्यनारायण महापूजा, श्री त्रिपुरासुंदरी लक्षकुंकुमार्चन इत्यादी धार्मिक विधी करण्यात आले होते. या विधींसाठी मोगरा, सोनचाफा, कमळ अशी विविध प्रकारची फुले आणि केळीचे खांब अन् आंब्याच्या डहाळ्या यांचीही आवश्यकता होती. त्या वेळी ही फुले आणि पाने मिळवण्याची सेवा करतांना प्रसारातील साधिका कु. संगीता नाईक यांना ‘हे सर्व आणण्याचे नियोजन देवाचेच असून त्याने त्याची आधीच सिद्धता केली आहे’, असे अनुभवावयास आले. देवाची ही लीला पहातांना कु. संगीता नाईक यांना ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी आवश्यक त्या संख्येने लागणारी फुले आणि अन्य साहित्य सूक्ष्मातून सर्व देवी-देवतांनीच गोळा केले असून ती फुले, फुलझाडे, फुलांच्या बागांचे मालक आणि फुले मिळवण्याच्या सेवेत सहभागी असलेले साधक या सर्वांचेे जीवन कृतार्थ झाले आहे’, असे वाटले. इतकेच नव्हे, तर अनेक जण सनातनच्या कार्याशी जोडले जात असल्याच्या अनुभूतीही आल्या. या सेवेत असतांना कु. संगीता नाईक यांना आलेल्या अनुभूती आणि या सेवेसंदर्भात त्यांचे झालेले चिंतन येथे देत आहोत.

१. देवकार्यासाठी हवी असणारी मोगर्‍याची फुले मिळवतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ५.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणार्‍या सौरयागासाठी फुले मिळवतांना आलेल्या अनुभूती

१ अ १. फुले मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना केल्यावर देवाने एका साधिकेचे नाव सुचवणे : ‘५.५.२०१९ या दिवशी होणार्‍या सौरयागासाठी मोगर्‍याची अंदाजे २ सहस्र फुले त्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत हवी होती. मोगर्‍याच्या कळ्या मिळत होत्या; पण फुले मिळत नव्हती. मी देवाला प्रार्थना करून ‘काय करू ?’, असे विचारल्यावर देवाने मला भाव आणि तळमळ असलेल्या पणजी येथील ‘सौ. रूपाली साळगावकर’ या साधिकेचे नाव सुचवले.

सौ. रूपाली यांचे माहेर ‘केरी’ येथे आहे. त्या वेळी ‘केरी येथूनच फुले उपलब्ध होेणार आहेत’, असा विचार देवाने मला दिला.

१ अ २. सौ. रूपालीताईंना भ्रमणभाष करून केवळ ‘मोगर्‍याची…’ हा शब्द उच्चारताच जणू देवाने ते त्यांना आधीच सांगितलेे असल्याप्रमाणे त्यांना सर्व कळणे आणि त्यांनी फुले लगेच मिळवण्यासाठी प्रयत्न करणे : मी सौ. रूपालीताईंना भ्रमणभाष केला आणि ‘मोगर्‍याची’ हा एकच शब्द उच्चारला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘मी आताच केरी येथे माहेरी आले आहे. येथे जवळपास मोगर्‍याच्या फुलांची एक मोठी बाग आहे, असे मला थोड्या वेळापूर्वीच आमच्या एका नातेवाइकांकडून कळले आहे. आता मी त्यांच्याकडेच चालले आहे.’’ त्यांचे ते वाक्य ऐकून मला बोलायला शब्दच सुचत नव्हते. केरी हे गाव सनातनच्या रामनाथी आश्रमापासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर आहे.

त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘तेथून आश्रमात फुले आणण्याचे नियोजनही देवाने केले असणार.’ त्यामुळे मी आता त्याचा विचार न करता दुसरी तातडीची सेवा करू शकते.

१ अ ३. ‘मोगर्‍याची फुले सकाळीच विकत असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी बागेत फुले नसणार’, असे त्या बागेच्या मालकीणबाईंना वाटणे; मात्र ‘देवाला फुले हवी असल्याने ती मिळणारच’ याची रूपालीताईंची श्रद्धा असणे आणि खरोखरच बागेत पुष्कळ फुले उपलब्ध होणे : ४.५.२०१९ या दिवशी सौ. रूपालीताई त्या बागेच्या मालकीण असलेल्या मावशींना जाऊन भेटल्या आणि त्यांनी रामनाथी आश्रमासाठी फुले हवी असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा त्या मालकीणबाई म्हणाल्या, ‘‘आम्ही सकाळीच फुले विकतो. आता सायंकाळचे ६.३० वाजले आहेत. आता बागेत फुले नसतील. फारतर आेंजळभर फुले मिळतील.’’ तेव्हा ‘देवाच्या कार्यासाठी फुले हवी असल्याने देवाने बागेत नक्की कुठेतरी फुले ठेवली असतील’, अशी रूपालीताईंची ठाम श्रद्धा होती. सौ. रूपालीताई त्या मावशींसमवेत बागेत गेल्या. त्या वेळी त्यांना बागेत पुष्कळ फुले फुललेली आढळली.

१ अ ४. साक्षात फुलांच्या निर्मात्याने आश्रमासाठीच ही फुले निर्माण केली असल्याचे जाणवणे : त्या फुलवाल्या मावशींना हे पाहून पुष्कळ आश्‍चर्य वाटले. त्यांना वाटले, ‘कदाचित् आज फुले काढणारी मुले सकाळी फुले काढायला विसरली असतील’; परंतु तसे नव्हते. त्या वेळी आपल्याला आवश्यकतेपेक्षा अधिक आणि चांगली फुले मिळाली. तेव्हा ‘साक्षात या फुलांच्या निर्मात्यानेच, म्हणजे देवानेच ही फुले आश्रमात पाठवण्यासाठी निर्माण केली आहेत’, असे मला जाणवले. सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनाही ती फुले फार आवडली.

सौ. रूपालीताई या पणजीला रहातात आणि कधीतरी माहेरी जातात. आपल्याला ज्या वेळी फुले हवी होती, त्याच वेळी नेमके देवाने त्यांना माहेरी पाठवले. दुसरे म्हणजे, त्या त्याच गावातील असूनही त्यांना ‘तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात मोगर्‍याची फुले मिळतात’, ते ठाऊक नव्हते. त्यांनाही ते त्याच दिवशी कळले. यातून देवकार्यासाठी हवी असणारी फुले देवानेच मिळवून दिल्याचे मला जाणवले.

१ आ. समाजातील व्यक्तींनी पैशांचा त्याग करून आश्रमात फुले पाठवणे

१ आ १. सौ. हेमलता कलंगुटकर या साधिकेकडून दोन दिवस मोगर्‍याची एक सहस्र फुले मिळणे आणि देवच त्याच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या फुलांचे नियोजन करून भाव असलेल्या साधकाला माध्यम म्हणून निवडत असल्याचे अनुभवायला मिळणे : ‘५.५.२०१९ या दिवशी संध्याकाळी मला ‘उद्यासाठी एक ते दीड सहस्र मोगर्‍याची चांगली फुले हवी आहेत. मिळतात का बघा’, असा निरोप आला. तेव्हा संध्याकाळ झाली असूनही ‘निरोप देणार्‍या ताईच्या माध्यमातून देवानेच फुले मागितली आहेत. त्यामुळे त्याचे नियोजनही त्याने केले असणार’, असा माझ्या मनात विचार आला. त्या वेळी सौ. रूपाली साळगावकर यांचा मला भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘मी केरी येथून नेरुळ, पणजी येथे आले आहे. येथील एक साधिका सौ. हेमलता कलगुंटकर यांना त्यांच्या मुलाच्या मित्राच्या आईने सुमारे एक सहस्र मोगर्‍याची फुले दिली आहेत. ती फुले आश्रमात पाठवू शकतो का ? रात्री ७ वाजेपर्यंत फोंड्याला येणार्‍या एका साधकासमवेत मी ती फुले पाठवते.’’ त्यानंतर सौ. कलगुंटकर यांनी दुसर्‍या दिवशीही मोगर्‍याची फुले आश्रमात पाठवली. प्रत्यक्षात या कालावधीत मोगर्‍याच्या फुलांना मंडईत चांगलाच भाव होता; परंतु देवाच्या कार्यासाठी त्यांनी पैशांचा त्याग केला.

यावरून ‘देवाच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या फुलांचे देव आधीच नियोजन कसे करत असतो आणि भाव असलेल्या साधकाला तो माध्यम म्हणून कसे निवडतो’, हेही मला अनुभवायला मिळाले.

१ आ १ अ. फुले चांगली रहाण्यासाठी देवच त्या व्यक्तीकडून ती व्यवस्थित बांधून देत असल्याचे लक्षात येणे : सौ. हेमलता कलगुंटकर यांच्या मुलाच्या मित्राच्या आईने मोगर्‍याची फुले देतांना दुहेरी कागदात गुंडाळून आणि त्याला दोरा बांधून व्यवस्थित बांधून दिली होती. (आश्रमातील साधकांनी सेवा करावी, त्याप्रमाणे साधिका नसूनही त्यांनी फुले व्यवस्थित बांधून दिली होती.) त्यामुळे ती फुले आश्रमात येईपर्यंत व्यवस्थित होती आणि त्यांनी ती शीतकपाटात ठेवता येतील, अशा रितीने बांधली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवसापर्यंत ती चांगली राहिली होती.

त्या वेळी ‘देव आपल्याला केवळ फुलेच मिळवून देत नाही, तर ‘ती व्यवस्थित रहावीत’, यासाठी काय करायला हवे ? हेही त्या जिवाच्या मनात घालतो आणि तसे करवूनही घेतो’, हे मला शिकायला मिळाले. प्रत्येक क्षणी ‘देवच सर्वकाही करून घेतो’, अशी मला अनुभूती आली.

१ आ २. रूपा च्यारी यांच्या कार्यालयातील व्यक्तीने ११.५.२०१९ या दिवसापर्यंत एक सहस्र ते बाराशे एवढी फुले देणे : आपल्याला जेवढी फुले हवी होती, तेवढी फुले मिळत होती; पण त्यांतील काही फुले वेळेत फुलायची नाहीत. प्रसारातील एक साधिका सौ. रूपा च्यारी यांचा मला भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीकडे मोगर्‍याची झाडे आहेत. त्यांच्याकडून प्रतिदिन एक सहस्र ते बाराशे एवढी फुले मिळू शकतात. तेव्हा मी किती फुले पाठवू ?’’ ११.५.२०१९ पर्यंत सौ. रूपाताईंनी आश्रमात मोगर्‍याची फुले आणून दिली. ती फार चांगल्या स्थितीत आणि सुंदर असायची.

१ इ. जत्रेच्या वेळी फुले मिळणे अशक्य असतांना देवाने केलेले फुलांचे नियोजन पाहून मन थक्क होणे !

आपण यज्ञासाठी ज्यांच्याकडून फुले आणत होतो, त्यांनी सांगितले, ‘गोव्यात ८ आणि ९ मे या दिवशी एक जत्रा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला फुले देऊ शकत नाही; परंतु या आधी देवाने दिलेल्या सर्व अनुभूतींमुळे ‘फुले मिळणारच’, अशी माझी देवाविषयी श्रद्धा निर्माण झाली होती आणि देवानेही तशी अनुभूती दिली.

१ इ १. सौ. कांचन नाईक यांना फुले घेतांना फुलवाल्या बाईंनी ‘फुलांचा बहर संपत आला असतांनाही बागेत नेहमीपेक्षा तिप्पट फुले येत आहेत आणि हा केवळ तुमच्या देवाचाच चमत्कार आहे’, असे सांगणेे : मडकई येथील साधिका सौ. कांचन नाईक या आश्रमात यज्ञ चालू झाल्यापासून प्रतिदिन एका फुलवालीकडून फुले आणायच्या. ९.५.२०१९ या दिवशी सकाळी त्या त्यांच्या या फुलवालीकडे गेल्या. तेव्हा ती फुलवाली त्यांना म्हणाली, ‘‘फुलांचा बहर संपत आल्याने आता दिवसेंदिवस ‘फुले अल्प मिळणार’, असे वाटत होते; पण काय आश्‍चर्य, आज आम्हाला तिप्पट फुले मिळाली ! हा केवळ तुमच्या देवाचाच चमत्कार आहे. आश्रमात फुले द्यायला आरंभ केल्यापासून आमच्या झाडांना अधिक फुले यायला लागली आहेत. असे यापूर्वी कधी झाले नव्हते.’’

या फुलवालीच्या झाडांना प्रतिदिन एक सहस्र ते अकराशे या संख्येने फुले मिळायची; परंतु दिनांक ९ आणि १० मे या दिवशी इतर कोणाकडून फुले मिळणार नसतांना फुलवालीकडे तिप्पट, म्हणजे सुमारे ३ सहस्र फुले उमलली.

१ इ २. दैनिक सनातन प्रभातच्या एका वाचिकेला त्यांच्याकडील मोगर्‍याच्या कळ्या लहान असल्यामुळे  आश्रमासाठी फुले देता न आल्याने पुष्कळ वाईट वाटणे आणि देवाप्रती असलेल्या त्यांच्या भावामुळे केवळ दोनच दिवसांत त्या फुलण्या योग्य होणे, त्या वेळी ‘देवाच्या कार्यासाठीच कळ्या लवकर उमलल्या आहेत’, असे त्यांना वाटणे : याच दिवशी बोरी येथील दैनिक सनातन प्रभातच्या एक वाचिका सौ. इंदू नाईक यांनी मला भ्रमणभाष केला. त्या म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांपूर्वी तुम्ही मला मोगर्‍याच्या फुलांसाठी भ्रमणभाष केला होता. त्या वेळी ‘मोगर्‍याच्या कळ्या पुष्कळ बारीक आहेत आणि त्या १२ तारखेपर्यंत फुलणार नाहीत’, असे मला वाटत होते; पण आज मी बघितले, तर त्या कळ्या पुष्कळच मोठ्या झाल्या आहेत आणि त्या आज उमलतील. त्या कळ्या देवाच्या कार्यासाठीच लवकर फुलल्या आहेत. तुम्ही आज आणि उद्यासाठी फुले घेऊन जा.’’ त्या वेळी मला जाणवले, ‘यापूर्वी मी त्यांना फुलांविषयी विचारल्यावर त्या कळ्या छोट्या असल्याने त्यांनी ‘फुले देता येणार नाहीत’, असे मला सांगितले होते. तेव्हा त्यांना ‘देवासाठी फुले देता आली नाहीत’, याचे पुष्कळ वाईटही वाटले होते. आता कळ्या फुलण्यायोग्य झाल्यावर त्यांनी लगेचच भ्रमणभाष करून फुले घेऊन जाण्यास सांगितले. त्यांचा फुलांचा व्यवसाय असूनही आणि मंडईत मोगर्‍याची फुले महाग असूनही त्यांनी ती फुले विक्रीसाठी न ठेवता यज्ञासाठी दिली. त्यांच्यातील तळमळ अणि भाव यांमुळे ज्या कळ्या ४ – ५ दिवसांनी उमलणार होत्या, त्या केवळ २ दिवसांतच उमलल्या.

१ इ ३. साधकांनी स्वतःकडील फुले आणून देणे : ८ मे आणि ९ मे या २ दिवसांत आपल्याला बाहेरून फुले मिळणार नव्हती. त्या वेळी साधकांच्या घरातील मोगर्‍याच्या झाडाला फुले आली. गोवा येथील प्रसारातील साधक रूपाली भाटकर, सौ. लिंडा बोरकर, श्री. सुधीर गावस, सौ. अर्चना मराठे, सौ. सीता डांगे, सौ. नीता गावकर, सौ. सुजाता पत्रे अशा बर्‍याच साधकांनी फुले गोळा करून आणून ही उणीव भरून काढली.

१ ई. आश्रमात होणार्‍या विष्णुयागासाठी  साधकांनी दिलेली फुले अतिशय सुंदर असणे आणि ती पाहून ‘ही फुले म्हणजे देवाच्या चरणी समर्पित व्हायला आलेले जीव असून त्यांचा सुगंधही वेगळाच आहे’, असे जाणवणे

१२.५.२०१९ या दिवशी आश्रमात विष्णुयाग होता. या यज्ञासाठी सुमारे ३ सहस्र फुले हवी होती. तेव्हा ‘देवाला फुलांनी सुंदर सजवावे’, असे मला वाटत होते. आदल्या दिवशी संध्याकाळपासून साधकांचे भ्रमणभाष येऊ लागले, ‘मोगर्‍याची फुले आहेत. पाठवू का ?’ यज्ञ चालू झाल्यानंतर दुपारपर्यंत साधक मोगर्‍याची फुले आणून देत होते आणि ती सर्वच फुले फार सुंदर होती. त्या फुलांकडे पाहून ‘ती फुले नसून देवाच्या चरणाशी समर्पित व्हायला आलेले जीव आहेत’, असे मला वाटले. त्या फुलांमध्ये कृतज्ञताभाव दिसत होता.’ त्या दिवशी फुलांचा सुगंध वेगळाच जाणवत होता.

१ उ. बागेत आवश्यकतेपेक्षा अधिक फुले आल्याने बागेच्या मालकाने ती आश्रमातील यज्ञासाठी देणे

१ उ १. ६.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात होणार्‍या महाराजमातंगी यज्ञासाठी केरी गावातील फुलवाल्यांना संपर्क केल्यावर प्रारंभी त्यांनी फुले देण्यास असमर्थता दर्शवणे : ‘६.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘महाराजमातंगी यज्ञ’ होणार होता. त्या दिवशी लागणार्‍या फुलांसाठी सौ. रूपालीताईंनी केरी गावातीलच दुसर्‍या एका फुलवाल्याला संपर्क केला. त्यांनी सांगितले, ‘‘गोव्यात आमचे गिर्‍हाईक ठरलेले आहे. आम्ही केवळ त्यांनाच फुले देतो. तुम्ही कितीही पैसे दिले, तरी आम्ही तुम्हाला फुले देऊ शकत नाही; कारण त्यामुळे आम्ही आमच्या नेहमीच्या गिर्‍हाईकांची मागणी पूर्ण करू शकणार नाही.’’ तेव्हा रूपालीताईंनी मला भ्रमणभाष करून ‘इकडून फुले मिळणार नाहीत’, असे सांगितले.

१ उ २. यज्ञासाठी फुले मिळवतांना देवाला ‘तुझ्या इच्छेनुसार होऊ दे’ अशी प्रार्थना करणे आणि नंतर त्या फुलवाल्यांना बागेत जेवढी फुले अधिक असतील, तेवढी देण्याची विनंती केल्यावर यज्ञासाठी आवश्यक असलेली फुले मिळणे : त्या दिवशी आपल्याला २ सहस्र फुलांची आवश्यकता होती. मी माझ्यासमवेत असलेल्या सहसाधिकेला म्हटले, ‘‘आपण प्रार्थना करूया.’’ आम्ही प्रार्थना केली, ‘फुले पाठवणार्‍या त्या जिवाचा आणि फुलांचा उद्धार करण्यासाठी तुम्हीच हे नाव सुचवले आहे. त्यामुळे आम्हाला फुले हवी आहेत; म्हणून नको, तर सर्वकाही तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे.’ प्रार्थना झाल्यावर मी त्या फुलवाल्यांशी बोलले. त्या वेळी रात्रीचे ८ वाजून गेले होते. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.

फुलवाले दादा : आम्हाला ठाऊक आहे की, तुम्ही देवाचे करता; पण फुलेच अल्प आहेत, तर आम्ही ती कशी देणार ?

मी : देवासाठी फुले देण्याची तुमची इच्छा आहे ना ? मग बघा, उद्या तुमच्या बागेत किती फुले येतील ते ! मी उद्या सकाळी ८ वाजता तुम्हाला भ्रमणभाष करीन. तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक असणारी फुले तुम्ही आम्हाला द्या.

त्या वेळी ‘माझ्या मुखातून देवच बोलला’, असे मला जाणवले. दुसर्‍या दिवशी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते म्हणाले, ‘‘खरंच ताई, आज बागेत अधिक फुले आली आहेत. तुम्ही ती घेऊन जाऊ शकता.’’ त्यानंतर सलग पुढील तीन दिवस (७, ८,९.५.२०१९ या तिन्ही दिवशी) त्यांनी आपल्याला यज्ञासाठी फुले दिली.

१ ऊ. आश्रमात फुले आणण्याचे नियोजन करतांना देवाचा ‘काटकसरीपणा’ हा गुण शिकायला मिळणे

१ ऊ १. आश्रमात येणार्‍या एका साधिकेने आश्रमात येतांना फुले आणणे : ५ तारखेला सकाळी रामनाथी आश्रमापासून ४५ कि.मी. अंतरावरील ‘केरी’ येथून फुले आणायची होती. त्या वेळी ‘सौ. रूपाली यांनाच आश्रमात एका सेवेसाठी यायचे आहे’, असे कळले. त्यामुळे त्या दिवशी त्याच फुले घेऊन आश्रमात आल्या. त्यामुळे फुले आणण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागले नाही.

१ ऊ २. देवाला प्रार्थना केल्यावर प्रासंगिक सेवा करणार्‍या एका साधिकेकडून फुले आश्रमात पाठवण्याचे देवाचे नियोजन कळणे : ६.५.२०१९ या दिवशी केरी गावातील साधकांनी फुलवाल्याकडे जाऊन फुले आणून दिली. तेव्हा मला वाटले, ‘आश्रमात फुले आणतांना इंधनासाठी साधकांचे पैसे व्यय होतात आणि त्यांचा वेळही जातो.’ यासाठी मी देवाला म्हटले, ‘तुझे नियोजन असेलच; पण मी कुणाला संपर्क केल्यावर मला तुझे नियोजन कळेल, हे तू मला सुचव.’ त्या वेळी प्रासंगिक सेवा करणारी केरी गावातील एक साधिका सौ. सुलक्षा गावस यांचा तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर आला. मी त्यांना लगेच संपर्क केला. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘मी केरी येथील एका दुधाच्या सोसायटीत कामाला जाते. प्रतिदिन सकाळी ९ वाजता एक गाडी फोंडा (गोवा) येथे दूध नेण्यासाठी केरीला आमच्या या सोसायटीत येते आणि ११ वाजता दूध घेऊन परत फोंड्याला जाते. मी गाडीचालकांना संपर्क करून फुले पोचवते. त्या गाडीच्या चालकाने आपल्याला लागणारी सर्व फुले गाडीतून आणून दिली. इतकेच नव्हे, तर ते म्हणाले, ‘‘तुमच्या संस्थेची काहीही सेवा असेल, तर मला सांगा.’’

१ ऊ ३. फुले आणण्याच्या नियोजनातील देवाचा ‘काटकसर’ हा गुण शिकता येऊन आनंद अनुभवता येणे : यातून ‘‘साधकांचा वेळ आणि पैसा यांची देवाला किती काळजी असते आणि देवाचे नियोजन किती काटकसरीने केलेलेे असते !’, हे मला शिकायला मिळाले. या व्यतिरिक्त ‘देव समाजातील जीव धर्मकार्यासाठी कसे जोडून ठेवतो ?’, तेही मला अनुभवता आले. या वेळी अपेक्षित फुले तर मिळालीच; पण त्या समवेतच ‘देवाचे नियोजन कसे असते ?’, याचा आनंदही घेता आला.

१ ए. फुले मिळवण्याची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

१. मोगर्‍याच्या फुलांची मागणी करतांना आणि फुले जमवण्याची सेवा करतांना ‘साक्षात श्री महालक्ष्मीदेवी साधकांना फुलांविषयी सांगत आहे’, असे मला वाटत होते.

२. मी फुले मिळण्यासाठी ज्या ज्या साधकांना संपर्क केला, त्यांनी तळमळीने फुलांचा शोध घेऊन रामनाथी आश्रमात फुले पाठवली. तेव्हा वाटले, ‘देवच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन करत आहे आणि त्यासाठी सगळ्यात चांगली फुले पाठवण्याचे नियोजनही तोच करत आहे.’

३. समाजातील ज्या व्यक्तींनी या कार्यासाठी फुले दिली, ते सर्वजण साधक-वृत्तीचेच होते. त्यांचा देवाप्रती भाव होता. त्यांना सनातन संस्थेप्रती आत्मीयता होती.

४. आपल्याला यज्ञासाठी विविध फुले जितक्या संख्येने हवी असायची, देव ती त्या संख्येने आपल्याला मिळवून देत होता. यासाठी पुष्कळ शोधाशोध करावी लागत नव्हती. मला वाचक किंवा साधकांचा स्वतःहून दूरध्वनी यायचा की, तुम्हाला हवी असलेली फुले (कन्हेर, जास्वंदी, गुलाब) पाठवू का ?

५. आपण यज्ञासाठी बाहेरील फुलवाल्यांकडून फुले आणत होतो. ते स्वतः दूरभाष करून सांगायचे, ‘आम्ही यज्ञासाठी फुले पाठवायला लागल्यापासून आमच्या बागेत ती पुष्कळ प्रमाणात यायला लागली आहेत, ही तुमच्या देवाचीच कृपा आहे.’

२. सोनचाफ्याची फुले मिळवण्याचे देवाने केलेले नियोजन

२ अ. देवाने यज्ञासाठी लागणारी सोनचाफ्याची फुले हितचिंतकाकडून मिळवून देणे

‘८.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘श्री ललितात्रिपुरासुंदरी देवीचा लक्षकुंकुमार्चन सोहळा’ होणार होता. त्यासाठी सोनचाफ्याची ५० फुले लागणार होती. मडकई येथील सौ. भक्ती सतरकर या साधिका एका हितचिंतकांच्या घरी गेल्या होत्या. त्यांना त्यांच्या दारात सोनचाफ्याच्या फुलांनी बहरलेले एक सोनचाफ्याचे झाड दिसले. त्यांनी त्या हितचिंतकांना विचारले, ‘‘आश्रमात होणार्‍या ललितात्रिपुरासुंदरी देवीच्या पूजेसाठी सोनचाफ्याची फुले हवी आहेत. तुम्ही ती देऊ शकता का ?’’ त्यांनी लगेच ‘‘हो’’ म्हटले आणि सांगितले, ‘‘तुम्हाला जेवढी फुले लागतील, तेवढी घेऊन जा.’’ देवाने अशा प्रकारे ८.५.२०१९ या दिवशी यागासाठी लागणारी सोनचाफ्याची फुले दिली आणि पुढे १२ तारखेपर्यंत प्रतिदिन सोनचाफ्याची जेवढी फुले आवश्यक होती, तेवढी त्यांच्याकडून आपल्याला मिळत गेली. आपल्या दारातील फुले सनातन आश्रमात होणार्‍या यज्ञासाठी दिली जात असल्याचेे समाधान त्या हितचिंतकांना मिळाले.

३. लाल आणि पांढर्‍या रंगाची कमळे मिळवतांना आलेली अनुभूती

३ अ. अल्प कालावधीत कमळे आणायची असतांना यापूर्वी देवाने दिलेेल्या अनुभूतींमुळे‘याचेही नियोजन देवाने केले असणार आणि स्वतःला केवळ त्या सेवेसाठी नियोजित जिवाला शोधायचे आहे’, असा विचार येऊन कमळे आणण्यासाठी तळ्याकडे जाणे

‘८.५.२०१९ या दिवशी होणार्‍या श्री ललितात्रिपुरासुंदरी देवीच्या पूजेसाठी आपल्याला लाल आणि पांढर्‍या रंगांची कमळे हवी होती. त्यासाठी मी काही साधकांना भ्रमणभाष केले; पण त्यांनाही काही अडचणी येत होत्या. त्या वेळी सायंकाळचे ६ वाजले होते. देवाने मला ‘कुणाला तरी घेऊन तूच तळ्याकडे जा’, असा विचार दिला. त्यानुसार मी आश्रमातील एका साधकाला घेऊन तळ्याकडे गेले. यापूर्वीही ‘एका घंट्यात कमळे हवी असतांनाही देवाने कुणातरी जिवाच्या माध्यमातून (त्याला ती सेवा देऊन) आपल्याला आवश्यक तेवढी कमळेे मिळवून दिली आहेत’, अशा मला अनुभूती आल्या आहेत. त्यामुळे या वेळीही ‘देवाने फुले देण्याचे नियोजन केलेले आहे. मला केवळ देवाने नियोजन केलेल्या त्या जिवाला शोधायचे आहे’, असे वाटले.

३ आ. तळ्याजवळ बसलेल्या लोकांजवळ जाऊन यज्ञासाठी कमळे हवी असल्याचे सांगणे, तेव्हा तेथे असलेल्या एका व्यक्तीने तळ्यात मगरी असतांनाही तळ्यात जाऊन आवश्यकतेपेक्षा अधिक कमळे तोडून देणे

मी त्या तळ्याकडे गेले. तेव्हा तळ्याच्या बाजूच्या कठड्यावर ४ – ५ जण बसले होते. त्यांच्याकडे जाऊन मी नमस्कार करून त्यांना म्हटले, ‘‘आमच्याकडे असलेल्या यज्ञासाठी मला कमळे हवी आहेत. ती देण्यासाठी देवाने तुमच्यापैकीच कोणाचे तरी नियोजन केले आहे. तुमच्यापैकी कोणी माझ्यासमवेत येऊ शकतो का ?’’ माझे बोलणे ऐकून एक व्यक्ती खाली उतरली आणि म्हणाली, ‘‘यज्ञाला पाहिजे ना, मी तुमच्यासमवेत येतो.’’ ते तळे पुष्कळच मोठे आहे. काठावरून मध्यभागी असलेल्या त्या कमळांपर्यंत पोचण्यासाठी सुमारे ३०० मीटर एवढे अंतर आत जावे लागते. तळ्यापाशी येतांना ते म्हणाले, ‘‘लाल रंगाची कमळे आहेत, तेथे दोन दिवसांपूर्वी ३ मगरी होत्या. त्या अजूनही तळ्यात आहेत. त्यामुळे एरव्ही मी तुमच्यासमवेत आलो नसतो; पण यज्ञासाठी कमळे हवी आहेत; म्हणून मी येतो.’’ त्या व्यक्तीने चिखल असलेल्या ठिकाणी कमरेएवढ्या पाण्यात उतरून आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक कमळे तोडून आणून दिली.

३ इ. एरव्ही कमळे आणायला जातांना सूर्यदेवाला सांगून जाणे; पण या वेळी सूर्यदेवाला सांगायचे विसरणे आणि कमळे काढून देणार्‍या व्यक्तीचे नाव ‘सूरज’ असल्याचे कळल्यावर सूर्यदेवानेच फुले दिल्याची जाणीव होणे

कमळे घेऊन परत येतांना मी त्यांना माझे नाव सांगितले आणि त्यांची ओळख करून घेऊन त्यांचा संपर्क क्रमांक घेतला. तेव्हा त्या व्यक्तीने त्यांचे नाव ‘श्री. सूरज बोरकर’ असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘तुम्हाला कधीही कमळेे हवी असतील, तर मला संपर्क करा.’’ त्यांचे नाव ऐकल्यावर मला जाणवले, ‘मला नेहमी सूर्यदेवाचेच नाव असलेल्या व्यक्ती भेटतात आणि कमळे देतात.’ ‘प्रत्यक्ष सूर्यनारायणच यज्ञासाठी कमळे देतो’, याची अनुभूती मी यापूर्वीही घेतली आहे. एरव्ही कमळे आणायला जाण्यापूर्वी मी सूर्यनारायणाला प्रार्थना करून (सांगून) जाते. ही सवय त्यानेच मला लावली आहे. त्या दिवशी मात्र मी त्याला सांगायला विसरले होते; पण मी देवाला विसरले, तरी देव मला विसरला नाही. त्याने त्याचेच नाव असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून मला कमळे काढून आणून दिली आणि ‘मी तुझा हात धरला आहे. मी तुला सोडणार नाही’, असे सांगून ‘तोच हे सर्व करत आहे’, याची त्याने मला पुन्हा एकदा अनुभूती दिली.

३ ई. कमळे काढून देणार्‍या व्यक्तीच्या मुलीचे नाव ‘यज्ञ’ असल्याचे त्या व्यक्तीने नंतर सांगणे, तेव्हा ‘यज्ञासाठी’ कमळे हवी आहेत’, असे देवानेच स्वतःकडून वदवून घेतल्याची जाणीव होणे आणि कुणाला कुठल्या शब्दांत सांगायचे, हे देवालाच ठाऊक असल्याचे शिकायला मिळणे

एरव्ही मी कमळेे मागतांना ‘माझ्या देवासाठी कमळेे हवी आहेत’, असे म्हणते; पण या वेळी माझ्या नकळत मी ‘यज्ञासाठी कमळे हवी आहेत’, असे सांगितले होते. जणू काही देवानेच माझ्याकडून तसे बोलून घेतले होते. त्याची मला रात्री प्रचीती आली. रात्री श्री. सूरज बोरकर यांचा मला भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या यज्ञासाठी कमळे हवी होती ना, आमच्याकडेही यज्ञ आहे.’’ तेव्हा मी त्यांना जिज्ञासेने ‘कुठला यज्ञ ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘यज्ञ’ असल्याचे सांगितले. त्या वेळी कमळे मागतांना ‘देवाने माझ्याकडून ‘यज्ञा’साठी कमळे हवी असल्याचे का बोलून घेतले ?’, याचा मला उलगडा झाला. यावरून ‘कुणाला कुठल्या शब्दांत सांगायचे, तेही देवाला ठाऊक असते आणि तोच आपल्याकडून बोलवून घेतो’, हे मला शिकायला मिळाले.

४. श्री सत्यनारायण पूजेसाठी लागणारे केळीचे खांब आणतांना आलेली अनुभूती !

४ अ. श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे खांब अल्पावधीत हवे असल्याचा निरोप मिळाल्यावर ‘देवाचे काहीतरी नियोजन असणार’, असा विचार करून डोळे बंद केल्यावर एका परिसरातील केळीची झाडे दिसणे आणि एका साधकानेही त्याच परिसरातील एका व्यक्तीला संपर्क करण्यास सांगणे

‘७.५.२०१९ या दिवशी आश्रमात श्री सत्यनारायणाची पूजा होती. त्यासाठी केळीचे खांब हवे असल्याचा निरोप मला त्याच दिवशी सकाळी ७.२० वाजता मिळाला आणि सकाळी ८.३० वाजेपर्यंत केळीचे खांब हवे होते. (या अगोदर असणार्‍या पूजा किंवा यज्ञ यांसाठी आपण आश्रमाच्या लागवडीतून किंवा साधक अन् वाचक यांच्याकडून केळीचे खांब आणले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे ते उपलब्ध नव्हते.) मी विचार केला, ‘केळीचे खांब आणण्यासाठी १ घंटा कालावधी आहे. तेव्हा त्याचे सर्व नियोजन देवाने केलेलेच आहे.’ मी डोळे बंद केल्यावर मला श्री शांतादुर्गा मंदिराचा पुढचा भाग आणि खडपाबांध येथील अलीकडील भाग येथील बागांतील केळीची झाडे दिसली. मी एका साधकाला घेऊन निघाले आणि अधिक माहितीसाठी फोंड्यातील साधक श्री. शैलेश बेहरे यांना भ्रमणभाष केला. त्यांनी २ ते ३ जणांकडे चौकशी करून मला श्री. दुर्गादास गावडे यांचा संपर्क क्रमांक दिला. त्यांची बाग मला सूक्ष्मातून दिसलेल्या भागातच होती.

४ आ. श्री. दुर्गादास गावडे यांनी ती केळीची झाडे केवळ देवाच्या पूजेसाठी लावल्याचे सांगून हवे तेवढे केळीचे खांब नेण्यास सांगणे आणि त्यांनी स्वतः त्यासाठी साहाय्य करणे

मी श्री. गावडे यांना संपर्क करून त्यांना सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे खांब हवे असल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझी केळीची बाग येथेच आहे. तुम्हाला हवे, तेवढे केळीचे खांब घेऊन जा.’’ आम्ही त्यांच्या बागेत गेल्यावर यज्ञासाठी जसे हवे होते, तसेच केळीचे खांब मिळाले. आम्हाला श्री. गावडे यांनी ते काढण्यासाठी साहाय्य केले. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला यज्ञासाठी फुले, फळे असे जे काही हवे असेल, तर मला संपर्क करा आणि माझ्या बागेतून घेऊन जा. मी ही केळीची झाडे केळी खाण्यासाठी लावली नाहीत, तर आजकाल लोकांना पूजेसाठी केळीचे खांब मिळत नाहीत; म्हणून मी ही झाडे ठेवली आहेत.’’

४ इ. श्री. गावडे यांच्यातील भावामुळेच देवाने त्यांचे नाव सुचवल्याचे लक्षात येणे, त्यांना आश्रमातील प्रसाद दिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावर भाव जाणवणे आणि या माध्यमातून देवाने त्यांना धर्मकार्यात जोडून घेतल्याचे जाणवणे

‘श्री. गावडे यांच्यातील या भावामुळेच देवाने मला त्यांचे नाव सुचवले आणि त्यांच्याकडून पूजेसाठी केळीचे खांब अर्पण करून घेतले’, असे मला वाटले. मी श्री. गावडे यांना आश्रमातील प्रसाद दिला. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावरील भाव पाहून मला आनंद झाला. त्यांनी ज्या उद्देशाने केळीची झाडे लावली आहेत, त्याचे सार्थक झाल्याचे त्यांच्या तोंडवळ्यावरून दिसत होते. श्री. गावडे यांनी आश्रमाला भेट देणार असल्याचे मला सांगितले. त्या वेळी ‘देवाने त्यांना या माध्यमातून धर्मकार्याला जोडून घेतले’, असे मला जाणवले.

५. यज्ञानिमित्त आंब्याच्या डहाळ्या आणतांना आलेल्या अनुभूती

५ अ. नियोजित साधकाला अडचण आल्यावर अन्य साधकांनी तळमळीने सेवा पूर्ण करून यज्ञसेवेत सहभागी झाल्याचा आनंद घेणे

‘सावईवेरे, फोंडा येथील साधक श्री. अनिल शीलकर हे आश्रमात होणारे यज्ञ आणि पूजा यांसाठी लागणार्‍या सर्व साहित्याची जमवाजमव करून ते आश्रमात पोचवण्याची सेवा करतात. ५.५.२०१९ या दिवशी त्यांना आणि गावातील अन्य २ साधकांना सुतक आल्याने त्यांना ही सेवा करता आली नाही. त्या वेळी फोंड्यातील सौ. अर्चना मराठे, सौ. नीता गावकर, सौ. सविता नाईक आणि सर्वश्री मनोज गावकर, श्रीराम खेडेकर, सतीश गोसावी अशा अनेक साधकांनी तळमळीने ही सेवा केली आणि यज्ञासाठी लागणारे साहित्य वेळेत आणून दिले. तेव्हा सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर यज्ञाच्या सेवेत सहभागी झाल्याचा आनंद दिसत होता, तसेच श्री. अनिल शीलकर यांनाही साहित्य वेळेत पोचल्याचा आनंद झाला.

५ आ. अल्पावधीत यज्ञासाठी आंब्याच्या ५० डहाळ्या हव्या असतांना देवाने एका साधकांना संपर्क करण्याचा विचार मनात घालणे आणि त्यांनी नियोजित वेळेत त्या आणण्याची व्यवस्था करणे

यज्ञानिमित्त आश्रमात एका रात्री आंब्याच्या ५० डहाळ्या लावायच्या होत्या आणि संध्याकाळी ६ वाजता निरोप मिळाल्याने माझ्याकडे वेळ अल्प होता, तरीही माझ्या मनावर कोणताही ताण आला नव्हता. ‘मला केवळ देवाला अनुभवायचे आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी देवाने मला श्री. सतीश गोसावी यांना भ्रमणभाष करण्याचा विचार दिला. त्यानुसार मी श्री. गोसावी यांना भ्रमणभाष करून ‘आताच आंब्याच्या ५० डहाळ्या हव्या आहेत’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ताई, मी मये, डिचोली येथे एका धार्मिक कार्यक्रमाला आलो आहे आणि माझ्या समोरच आंब्याचे एक झाड आहे. मी येतांना आंब्याच्या डहाळ्या घेऊन येतो.’’

५ इ. देवाने दुसर्‍या दिवसासाठी लागणार्‍या आंब्याच्या डहाळ्या आणण्याचा विचारही साधकाच्या मनात देऊन त्याप्रमाणे घडवून आणणे

आपल्याला त्या रात्री ५० आणि दुसर्‍या दिवसासाठी ५० आंब्याच्या डहाळ्या हव्या होत्या. ‘ते साधक एवढ्या लांबून दुचाकीवरून येणार असल्याने ‘त्यांना आता लागणार्‍या पन्नासच डहाळ्या आणायला सांगूया. उद्या लागणार्‍या डहाळ्या येथे जवळपास मिळतील’, असा मी बुद्धीने विचार केला होता; परंतु श्री. गोसावी यांनी आंब्याच्या १०० डहाळ्या आणल्या. यावरून ‘देवानेच त्यांना आंब्याच्या १०० डहाळ्या आणण्याचा विचार दिला’, असे मला जाणवले.’

– कु. संगीता नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१९)                                                                                                           (समाप्त)

परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात होणार्‍या विविध धार्मिक विधींसाठी लागणारी फुले आणि पत्री जमवण्याची सेवा करतांना कु. संगीता नाईक यांचे झालेले चिंतन !

१. पूर्वी सेवा करतांना कार्यपूर्तीच्या दृष्टीने विचार होणे; नंतर देव, साधक आणि समाज यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे; परंतु आता ‘विविध माध्यमांतून देवच सेवा करवून घेत आहे’, असा भाव असणे

‘पूर्वी माझ्याकडून यज्ञ किंवा पूजेसाठी साहित्य अल्प पडायला नको. ते वेळेतच मिळायला हवे. देवाला अपेक्षित अशी फुले-फळे मिळायला हवीत’, असा कार्याच्या दृष्टीने विचार होत असे. नंतर माझा देव, साधक आणि समाज यांच्याप्रती कृतज्ञतेचा विचार असायचा. आता मात्र ‘देवच विविध माध्यमांतून ही सेवा माझ्याकडून करवून घेत आहे’, असा माझा भाव असतो.

२. ‘देवच फुले मिळवण्याच्या सेवेचे सर्व नियोजन करत असून मला केवळ माध्यम बनून फुले उपलब्ध करून देणार्‍यांशी आध्यात्मिक नाते जोडायचे आहे आणि त्यांना प्रेम देऊन ‘ते देवाशी कसे जोडले जात आहेत ?, हे अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवल्यामुळे सेवेतून आनंद मिळणे

जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध याग आणि पूजा होत असतांना ‘त्यासाठी लागणार्‍या लहानातील लहान वस्तूचे नियोजनही देव-देवतांनीच केले आहे. देव माझ्याकडून विविध माध्यमांतून सेवा करवून घेणार आहे. मला केवळ ती फुले, ती उपलब्ध करून देणार्‍या व्यक्ती आणि साधक यांच्याशी आध्यात्मिक नाते जोडायचे आहे. ते मला एका दिवसासाठी किंवा एका क्षणासाठी भेटले, तरी मला त्यांना भरभरून प्रेम द्यायचे आहे. जसे गुरुमाऊली, सद्गुरु आणि संत आपल्याला प्रेम देतात, तसे मला त्यांना प्रेम द्यायचे आहे’, असा माझा विचार असायचा. ‘मी देवाशी नाते जोडण्यात कुठे अल्प पडते ?’, याचा विचार होऊन त्याप्रमाणे माझ्याकडून कृती करण्याचा प्रयत्न व्हायचा.

३. ‘देवच मला प्रत्येक दृष्टीकोन देत असून माझ्याकडून त्यानुसार कृती करवून घेत असल्यामुळे या सेवेत साहाय्य करणारे सर्व जण देवाशी जोडले जात आहेत’, असे देवाने क्षणोक्षणी प्रत्येक प्रसंगात मला अनुभवायला दिले.

४. देवाच्या समीप जाण्यासाठी देवाने दिलेला दृष्टीकोन

एकदा मी गुरुदेवांना विचारले, ‘गुरुदेव, मी तुमच्याजवळ आले असून माझ्यातील आणि तुमच्यातील अंतर अल्प झाले आहे’, हे मी कसे ओळखायचे ?’ तेव्हा गुरुमाऊली म्हणाली, ‘‘कार्याचा विचार अल्प झाला (‘देवाचे कार्य देवच करणार आहे’, असे वाटले) आणि इतरांचा, समाजाचा, साधकांचा, प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूचा विचार होऊन ‘मी त्यांच्यासाठी काय करू ? कसे करू ?’, असे वाटून तशी कृती तुझ्याकडून व्हायला लागल्यावर तू समजू शकतेस की, आपल्या दोघातील अंतर अल्प झाले आहे.’’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘गुरुदेव, माझी कोणतीही पात्रता नसतांना तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत आणि सर्व साधकांच्या माध्यमातून ती करवून घेतलीत. ही सेवा परिपूर्ण व्हावी, यासाठी माझ्यापेक्षाही साधक, संत, सद्गुरु यांची तळमळ अधिक होती, तरीही तुम्ही मला या सेवेमध्ये ठेवून पावसाप्रमाणे आनंदात न्हाऊ घातलेत. यासाठी मी तुमच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करते.

‘माझे स्वभावदोष आणि अहं अल्प होण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रांजळपणे प्रयत्न करवून घ्या. तुमच्यातील आणि माझ्यातील अंतर अल्प होण्यासाठी तुम्हीच मला तुमच्या समष्टी रूपाशी एकरूप करून घ्या’, अशी तुमच्या चरणी या अपराधी जिवाची प्रार्थना आहे.’

– कु. संगीता नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF