मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासंदर्भात राज्य सरकारच्या अध्यादेशाला राज्यपालांची संमती

मुंबई – मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राज्यपालांकडून संमती मिळाली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने प्रवेशप्रक्रिया पूर्ववत केल्याची नोटीस सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर काढल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात चालू असलेले मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला होता. या निर्णयामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ठिय्या मांडला होता. विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नागपूर खंडपिठाच्या निर्णयाला आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपिठाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळली होती. त्यानंतर राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढला. यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली.


Multi Language |Offline reading | PDF