अनधिकृतरित्या खासगी वाहनांद्वारे ईव्हीएम् यंत्रे नेत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित

 

नवी देहली – २३ मे या दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार असतांना टि्वटरवरून ‘ईव्हीएम्’ यंत्र एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडिओ प्रसारित झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे या यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत का?, असा संशय निर्माण झाला आहे. यापैकी काही यंत्रे स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. उत्तरप्रदेशातील व्हिडिओमध्ये काहीजण ईव्हीएम् आणि व्हीव्हीपॅट यंत्रे गाडीतून बाहेर काढून एका दुकानाच्या आतमध्ये नेत असल्याचे दिसत आहे. उत्तरप्रदेशातील चंदौली येथील हा व्हिडिओ आहे.

सर्व ईव्हीएम् यंत्रे सुरक्षित ! – निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम् आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उमेदवारांसमोर योग्य पद्धतीने सील करण्यात आली होती. या वेळी चित्रीकरण करण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरेही होते. सुरक्षारक्षकही उपस्थित होते. त्यामुळे याविषयी होणारे सर्व आरोप निराधार आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’ची १०० टक्के मतमोजणी करणारी याचिका फेटाळली

‘व्हीव्हीपॅट’ची (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलची) १०० टक्के मतमोजणी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ‘प्रत्येक वेळेला त्याच त्याच विषयांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही’, असे न्यायालयाने सुनावले. ईव्हीएम्वर घेतलेल्या संशयावरून निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशातील ४ याचिका फेटाळून लावल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF