बंद पडलेल्या पोलीस चौक्या !

डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देणारे सातारा पोलीस दल कर्तव्य बजावण्यात राज्यात अग्रेसर असले, तरी लोकसंख्येच्या मानाने शहरातील पोलिसांची कुमक अल्पच आहे. लोकसंख्या आणि पोलीस कर्मचारी यांची सांगड घालता-घालता पोलीस प्रशासनाच्याही नाकी नऊ येत आहेत. सध्या सातारा शहर आणि शाहूपुरी, अशी दोन पोलीस ठाणी सातारावासियांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व सांभाळत आहेत. तरीही गुन्ह्यांचे प्रमाण, निवडणूक बंदोबस्त, कामाचे घंटे आदी कारणांमुळे पोलिसांवरचा ताण अधिकच आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वी पोलिसांवरील हा ताण न्यून करण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यांतंर्गत मंगळवार तळे पोलीस चौकी कार्यान्वित होती. चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, मांढरे आळी, मनामती चौक अशी संवेदनशील ठिकाणे या चौकी अंतर्गत होती; मात्र काही कारणास्तव ही पोलीस चौकी आता बंद स्थितीत आहे. मध्यंतरी १-२ पोलीस कर्मचारी केवळ झोपण्यासाठीच या चौकीमध्ये येत होते. नंतर या पोलीस चौकीचे अस्तित्व टिकवणेही शाहूपुरी पोलीस ठाण्याला कठीण झाले.

मंगळवार तळे पोलीस चौकीप्रमाणे मोळाचा ओढा हा परिसरही शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अंकित आहे. तेथे पहारा (पेट्रोलिंग) देण्यासाठी शाहूपुरी पोलीस कार्यरत आहे. या परिसरात दिवसाआड मडका अड्डयावर धाडी टाकल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात; मात्र अपुर्‍या पोलीस बळापुढे कोणीच काही करू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या प्रयत्नांतून हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मरणार्थ एक पोलीस चौकी उभारण्यात आली. तेव्हा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. या पोलीस चौकीचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले; मात्र पोलीस चौकीमध्ये एकाही कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली नाही. नागरिकांच्या मागणीनंतर पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र तेही पोलीस कर्मचारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात बसूनच मोळाचा ओढा येथे असलेल्या हुतात्मा कर्नल संतोष महाडिक पोलीस चौकीचा कारभार पहात आहेत.

जिल्हा पोलीस दलाच्या अशा (बंद) पोलीस चौक्यांमुळे मंगळवार तळे आणि मोळाचा ओढा परिसरातील नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. ‘पोलिसांची अपुरी कर्मचारी संख्या यासाठी कारणीभूत असली, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड होता कामा नये’, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.  ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सत्यात उतरवायचे असेल, तर वास्तवाचे भान ठेऊन या पोलीस चौक्या पुन्हा कार्यान्वित केल्या पाहिजेत. अन्यथा नागरिकांवर ‘पोलीस चौकी देता का कोणी पोलीस चौकी ?’, असे म्हणण्याची वेळ आल्याविना रहाणार नाही.

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा


Multi Language |Offline reading | PDF