धार्मिक सौहार्दाचे एकतर्फी प्रदर्शन !

जो इतिहासातून धडा घेत नाही, त्याला इतिहासही धडा शिकवल्याशिवाय रहात नाही’, हे हिंदु समाजाच्या ८ दशकांनंतरही लक्षात आलेले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत अन्य पंथियांकडून हिंदूंचा सातत्याने घात होत आला आहे. तरीही हिंदू अतीसहिष्णुतेला घट्ट बिलगून बसले आहेत. कुठल्याही गुणाचा अतिरेक हा अंतिमतः दोषच ठरतो. हिंदूंच्या बाबतीत तर ही अतीसहिष्णुता हा आत्मघातही ठरला आहे. अयोध्या येथील श्री सीताराम मंदिराच्या न्यासाकडून मंदिरातच मुसलमानांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुसलमानांसमवेत काही साधू-संत आणि काही शीख सहभागी झाले होते. या मंदिरामध्ये इफ्तार पार्टी होण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. हिंदू आणि मुसलमान यांच्यातील सौहार्द वाढवण्यासाठी म्हणे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदूंच्या अशा अतीसहिष्णु वृत्तीचे प्रदर्शन देशात अनेक ठिकाणी होत असते. अशा पार्ट्यांचे आयोजन करणारे तथाकथित हिंदू हे स्वतःला हिंदु धर्माचे प्रतिनिधी म्हणवून घेतात खरे; मात्र त्यांना चार लोकांपलीकडे कोणीही ओळखत नसतो. किंबहुना असे तथाकथित हिंदूच असल्या पार्ट्या आयोजित करून प्रसिद्धी मिळवत असतात. अशा तथाकथित हिंदूंना राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सौहार्द आणि सहिष्णुता यांविषयी विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर देता येत नाही. सौहार्द आणि सहिष्णुता हे हिंदूंच्या रक्तातच आहे. तो त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे ते हिंदूंना कोणीही शिकवू नये. उलट त्याचा होणारा अतिरेक रोखण्याची वेळ आता आली आहे. वरील तथाकथित हिंदूंना ‘हिंसा, दंगली आतंकवाद आदी गुन्हेगारी कृत्यांत कोणाचा हात असतो ?’, असे विचारल्यास त्याचे उत्तर देण्याचे ते सोयीस्करपणे टाळतात. यातील बहुतांश हिंदू हे पुरो(अधो)गामी टोळीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित असतात अर्थात् केवळ नामधारी हिंदू असतात. अशांना आतापर्यंत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाकडे बोट दाखवण्याची सोय होती; परंतु अन्वेषण यंत्रणांनीच यातील काहींना निर्दोष ठरवल्याने या प्रकरणातील उरलीसुरली हवा निघून गेली. वरील प्रश्‍नाचे उत्तर देण्याऐवजी उलट ‘ठराविक एका समाजाला लक्ष्य करणे कसे चुकीचे आहे’, याचे डोस ते धर्मप्रेमी हिंदूंना पाजतात.

इफ्तारसाठी केवळ मंदिरेच का ?

इफ्तार पार्ट्यांसाठी केवळ मंदिरांचाच वापर का केला जातो ? चर्च  किंवा अन्य प्रार्थनास्थळे येथे अशा पार्ट्या झाल्याचे कधी कानावर कसे येत नाही ? इफ्तार पार्टीनंतर मुसलमानांनी श्री सीताराम मंदिरात नमाजपठणही केले. मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा आणि सात्त्विकतेचा स्रोत आहे. तेथून हिंदूंना मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा मिळते. अशा घटनांमुळे मंदिरांचे पावित्र्यभंग होते. बरं, सौहार्द वाढवण्यासाठीच याउलटही प्रयत्न करता येतात, म्हणजे मशिदींमध्ये हिंदूंनी आरती केल्यावर सौहार्द वाढू शकत नाही का ? मशिदींत तर मुसलमानेतर लोकांना उभेसुद्धा करत नाही आणि असेच लोक सौहार्दाच्या गप्पा मारतात. ही शुद्ध लबाडी नव्हे का ? मुसलमान मूर्तीपूजा मानत नाहीत. मग मूर्तीपूजा चालणार्‍या मंदिरांत नमाजपठण केलेले त्यांना कसे चालते ? त्यांच्या धर्मात याला मान्यता आहे का ? नसेल तर त्यांचे धर्मगुरु त्यांची कानउघाडणी का करत नाहीत ?, धर्मात मान्यता नसतांनाही मंदिरांमध्ये नमाजपठण करून ते काय साध्य करू पहात आहेत ?, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत रहातात. रमजानच्या मासात मंदिरांमध्ये इफ्तार पार्ट्या आयोजित करणार्‍या तथाकथित हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवे की, कधी दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये कधीही मेजवानी आयोजित केली जात नाही. तेथे कधी भजन, कीर्तन, प्रवचन आदींचेही आयोजन केले जात नाही. मग ‘धार्मिक सौहार्द टिकवण्याचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ? आणि त्यासाठी केवळ मंदिरांचा उपयोग का करण्यात येतो ?’, असे प्रश्‍न पडतात. धार्मिक सौहार्दाचे हे एकतर्फी प्रदर्शन कुठेतरी थांबले पाहिजे.

महंतांचा धर्मद्रोह !

श्री सीताराम मंदिरातील इफ्तार पार्टीविषयी त्या मंदिराचे महंत युगल किशोर दास यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया गंभीर आहे. ते म्हणाले की, ‘मंदिर न्यास यापुढेही इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करत रहाणार आहे. आपण धार्मिक सौहार्द दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला पाहिजे.’ मग प्रश्‍न असा पडतो की, धार्मिक सौहार्द दाखवण्याचा प्रयत्न नेहमी हिंदूंनीच का केला पाहिजे ? खरे तर ज्यांनी धार्मिक सौहार्द दाखवणे आवश्यक आहे, ते कधी तो दाखवत नाहीत आणि त्यांना तसे दाखवण्यास कोणी सांगण्याच्या भानगडीतही पडत नाही. मंदिरांत अशा इफ्तार पार्ट्या आयोजित करून तथाकथित हिंदू किंवा त्यास अनुमती देणारे मंदिराचे पदाधिकारी एकवेळ प्रसिद्धी मिळवतीलही; पण त्यांच्याकडून अक्षम्य अशी धर्महानी होत आहे, ते ती कशी भरून काढणार आहेत ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते. मंदिरे ही हिंदूंसाठी धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, इफ्तार पार्ट्यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांचा वापर होता कामा नये. ज्यांना सौहार्दाचा इतकाच पुळका आला असेल, त्यांनी अन्य पंथियांना स्वतःच्या घरी बोलवून गावजेवण घालावे किंवा ‘सौहार्द सप्ताह’ साजरा करावा, त्याच्याशी हिंदूंना काहीही देणेघेणे नाही; परंतु हिंदूंची श्रद्धास्थाने ही हिंदूंच्याच धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरली गेली पाहिजे. तसे होत नसेल, तर अशा तथाकथित हिंदूंना आता वैध मार्गाने जाब विचारून वठणीवर आणण्याचीही वेळ आली आहे; कारण मंदिरांचे पावित्र्यरक्षण करणे, हे शेवटी समस्त हिंदूंचेच दायित्व आहे.


Multi Language |Offline reading | PDF