अन्वेषण यंत्रणा आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याविषयी अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून या दिवशी होणार

पुणे, २२ मे (वार्ता.) – डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून या दिवशी होणार आहे. २२ मे या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व्ही.एस्. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला. २२ मे या दिवशी कोणत्याही संशयित आरोपीला न्यायालयात उपस्थित केले नव्हते. आरोपींच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

अधिवक्ता समीर पटवर्धन

या वेळी अधिवक्ता पटवर्धन म्हणाले, ‘‘आरोपींना आरोपपत्र मिळायला हवे. हा त्यांचा कायद्याने दिलेला हक्क आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अजूनही आरोपपत्राची प्रत देत नाही. नंतर प्रविष्ट झालेले पुरवणी आरोपपत्र डॉ. तावडे यांना द्यायला हवे. शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांनाही डॉ. तावडे यांच्यावर प्रविष्ट झालेले आरोपपत्र द्यायला हवे. ही साधी आणि किमान आवश्यक गोष्ट देण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग टाळाटाळ करत आहे.’’

अधिवक्ता पटवर्धन यांनी अन्वेषण यंत्रणेचा ढिसाळ कारभार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्रीय अन्वेषण विभागाने पुढच्या दिनांकाला आरोपपत्र देण्याचे मान्य केले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्त्या (कु.) नीता धावडे आणि अधिवक्ता नीलेश निढाळकर उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF