योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथील ४ दिवसांच्या वास्तव्यात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची प्रत्यक्ष भेट न होऊनही ‘ते सतत समवेत असून ते आणि परात्पर गुरु डॉक्टर तत्त्वतः एकच आहेत’, अशी अनुभूती येणे

‘एप्रिल २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात मला पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद यांनी आयोजित केलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील साधना शिबिराला उपस्थित रहाण्याचा योग आला. त्यासाठी मी प्रथम नाशिक येथे गेलो आणि तेथे गेल्यावर मला समजले, ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन हेही सध्या नाशिक येथेच आहेत.’ मी त्यांना मानस नमस्कार करून प्रार्थना केली. नंतरचे ४ दिवस मी सकाळी नाशिकहून त्र्यंबकेश्‍वरला जात होतो आणि रात्री ९ च्या सुमारास नाशिकला परतत होतो. त्या वेळी प्रथमच मला ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन समवेत आहेत. त्यांची कृपा आणि आशीर्वाद मला मिळत आहे’, असे जाणवत होते. मला त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नाही, तरी त्यांचे सूक्ष्मातील अस्तित्व मला अनुभवता येत होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन तत्त्वतः एकच आहेत’, अशी अनुभूती येत होती.

२. २०.५.२०१९ या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. साधकाने पाठवलेल्या भ्रमणभाषवरील छायाचित्रात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा तोंडवळा धूसर, म्हणजे निर्गुण स्थितीत असल्याचे दिसणे आणि त्यांचा आशीर्वाद देणारा हात म्हणजे ‘ते भरभरून कृपा करत असल्याचा संकेतच आहे’, असेे जाणवणे : २०.५.२०१९ या दिवशी देहली येथे पत्रकार परिषद होती. त्या दिवशी पहाटे ४.३० वाजता उठून मी विषयाचे अध्ययन करत होतो. मी पहाटे ५ वाजता सहजच भ्रमणभाषवर ‘काही निरोप आहे का ?’, ते पहात असतांना मला श्री. आनंद पाटील या साधकांनी योगतज्ञ दादाजी आणि पू. (सौ.) प्रमिलाताई यांचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाठवलेले छायाचित्र दिसले. मला ‘योगतज्ञ दादाजींचा छायाचित्रातील तोंडवळा धूसर म्हणजे निर्गुण स्थितीत आहे’, असे दिसत होते. त्यांचा आशीर्वाद देणारा हात पाहून ‘मी भरभरून देत आहे, ज्यांना घ्यायचे आहे, त्यांनी घ्यावे’, असा संकेत ते देत आहेत’, असे मला जाणवले. मी ते छायाचित्र पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पत्नी (सौ. मधुवंती) आणि मुलगी (सौ. वैदेही) यांना पाठवले.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टर योगतज्ञ दादाजींना नमस्कार करत असलेले एक छायाचित्र ‘फेसबूक’वर पाहिल्यावर त्या छायाचित्रात परात्पर गुरु डॉक्टर लगेच ओळखू न येऊन प.पू. रामानंद महाराज यांना नमस्कार करतांनाच्या स्वतःच्या छायाचित्राचे स्मरण होणे : पत्रकार परिषद झाल्यावर मी सेवाकेंद्रात आलो. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉक्टर योगतज्ञ दादाजींना नमस्कार करत आहेत’, असे एक छायाचित्र ‘फेसबूकवरील पोस्ट’वर दिसले. त्या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टर मला लगेच ओळखता आले नाहीत. तेव्हा मला २० – २१ वर्षांपूर्वी आलेली एक अनुभूती आठवली. वर्ष १९९७ – १९९८ मध्ये मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी ‘माझे अस्तित्व नष्ट व्हावे. माझ्या ठायी मला केवळ तुमचेच अस्तित्व अनुभवता यावे’, अशी प्रार्थना करत असे. वर्ष १९९८ – १९९९ मध्ये प.पू. रामानंद महाराज मिरज येथे प.पू. ज्ञानगिरी महाराज यांच्या आश्रमात आले होते. तेव्हा त्यांना नमस्कार करतांना माझे छायाचित्र काढले गेले होते. नंतर मी सर्व छायाचित्रे पाहून कु. शशिकला आचार्य यांना विचारले, ‘‘यात माझे छायाचित्र दिसत नाही.’’ तेव्हा त्यांनी मला ‘मी प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करत आहेत’, हे छायाचित्र दाखवले. त्या छायाचित्रातील मी मला ओळखू येत नव्हता; मात्र मी घातलेल्या सदर्‍याच्या रंगावरून ‘तो मी आहे’, असे मला ओळखता आले.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टर आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे छायाचित्र पत्नी अन् मुलगी यांना पाठवणे आणि योगतज्ञ दादाजींनी देहत्याग केल्याचे समजल्यावर पहाटेपासूनच त्यांच्याविषयी पूर्वसूचना मिळत असल्याचा उलगडा होणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर योगतज्ञ दादाजींना नमस्कार करत आहेत’, हे छायाचित्र मी २ वाजून ४५ मिनिटांनी लगेच पत्नी सौ. मधुवंती आणि मुलगी सौ. वैदेही यांना पाठवले. नंतर ३ वाजता मला समजले की, योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दुपारी २.४५ वाजता देहत्याग केला. तेव्हा मला उलगडा झाला, ‘आज सकाळपासून मला त्यांचा देहत्याग आणि सर्व साधकांवर होणारी त्यांची कृपा यांविषयीच्या पूर्वसूचना मिळत होत्या; मात्र त्या माझ्या लक्षात आल्या नव्हत्या.’

३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती

अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी देहत्याग केल्याचे समजल्यानंतर मला पुष्कळ शक्ती आणि कृपा जाणवत होती.

आ. मी तोंडात गोड चव अनुभवली.

इ. मी निर्विचार स्थिती अनुभवली.

मागील १५ दिवसांत ‘योगतज्ञ दादाजी अनेक प्रसंगी सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत, त्यांचा आशीर्वाद मला लाभत आहे’, असे मला जाणवत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अशा थोर संतांची कृपा आणि आशीर्वाद मला लाभला. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली. (२१.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF