करुणामयी दृष्टी, चैतन्यमय वाणी आणि ‘लक्ष्मीप्रसाद’ यांतून साधकांना दिव्य शक्ती प्रदान करणारे अन् आपत्काळात सनातन संस्थेचे रक्षण करणारे थोर योगपुरुष !

कृपावत्सल योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग थोपवून साधकांवर अपार कृपा करणारे अन् भविष्यकालीन घटनांविषयी भाकिते वर्तवणारे कलियुगातील वाल्मीकि ऋषि !

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी २० मे २०१९ या दिवशी देहत्याग केल्याचे समजले आणि ‘सनातनवर असलेले त्यांचे दिव्य कृपाछत्र स्थुलातून हरपले’, असा विचार येऊन मनात क्षणभर पोरकेपणाची भावना निर्माण झाली. त्याच वेळी ईश्‍वराने मनात विचार दिला, ‘आता त्यांचा निर्गुण स्तरावरील कृपाशीर्वाद अधिक पटींनी लाभणार आहे.’ त्यांच्या देहत्यागाच्या निमित्ताने योगतज्ञ दादाजी यांनी सनातनवर केलेल्या अपार कृपेचे स्मरण झाले.

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

१. योगतज्ञ दादाजी यांची सनातनवर असलेली प्रीती आणि कृपादृष्टी

योगतज्ञ दादाजी यांची सनातनवर आत्यंतिक प्रीती होती. त्यामुळे ‘सनातन संस्था अडचणीत आहे’, असे वातावरण निर्माण झाल्यास किंवा एखाद्या कार्यात सनातनला साहाय्याची आवश्यकता भासल्यास योगतज्ञ दादाजी तात्काळ साहाय्य करत. त्यांच्यासाठी सनातन ही वेगळी संस्था नव्हतीच. ‘सनातन ही त्यांचेच एक अंग आहे’, अशा भावाने त्यांनी सनातनवर प्रेम केले. सनातनवरील बंदीच्या टांगत्या तलवारीला त्यांनी वेळोवेळी थोपवून धरले.

सनातनवर येणारी मोठी अरिष्टे दूर करण्यासाठी ते वेळोवेळी अनुष्ठाने करत. योगतज्ञ दादाजींच्या कृपाशीर्वादामुळेच सनातनच्या साधकांना प्रतिकूल काळातही साधना करणे शक्य झाले. यावरूनच त्यांची सनातनवर असलेली प्रीती अन् कृपादृष्टी लक्षात येते.

२. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ।’ या संतवचनाप्रमाणे आयुष्य जगणारे योगतज्ञ दादाजी !

‘ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर जीवित रहाणे अत्यंत आवश्यक आहे’, हे योगतज्ञ दादाजींनी जाणले आणि स्वतःच्या महामृत्यूयोगाला गौण स्थान देऊन त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांवरील महामृत्यूयोगाचे अरिष्ट वेळोवेळी दूर केले. परात्पर गुरु डॉक्टरांना दीर्घायुुष्य लाभण्यासाठी त्यांनी कठोर तपसाधना करून स्वतःचे आयुष्य वाढवून घेतले आणि परात्पर गुरुदेवांच्या स्थूल देहाचे रात्रंदिवस रक्षण केले. योगतज्ञ दादाजींचे उभे आयुष्य पाहिल्यास तुकाराम गाथेतील ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ।’ या संतवचनाचे स्मरण होते. देहत्यागाच्या क्षणापर्यंत स्वतःच्या देहाचा काडीमात्र विचार न करता केवळ समष्टीसाठी आणि जनकल्याणासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान विभूतीच्या चरणी कोटी कोटी दंडवत !

३. दैवी सामर्थ्य असलेले अवतारी योगपुरुष

योगतज्ञ दादाजी अवतारी योगपुरुष होते. दैवी शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची योगशक्ती त्यांच्याकडे होती. उच्च पातळीच्या संतांच्या कार्यामध्ये देवता स्वतः सहभागी असतात, याचे प्रत्यक्ष अनुभवलेले उदाहरण म्हणजे योगतज्ञ दादाजी ! या दैवी शक्तीचा वापर त्यांनी केवळ समाज आणि साधक यांच्या कल्याणासाठीच केला.

अशा या आनंदस्वरूपी आणि चैतन्यस्रोत असलेल्या योगतज्ञ दादाजींचे सर्व कार्य अलौकिक आहे. आपल्या करुणामयी दृष्टीतून, चैतन्यमय वाणीतून आणि ‘लक्ष्मीप्रसादा’तून साधकांना दिव्य शक्ती प्रदान करणारे अन् आपत्काळातही साधकांचे रक्षण करणारे थोर योगपुरुष दादाजी वैशंपायन यांच्या स्मरणमात्रे मुखात केवळ पुढील शब्द येतात, ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !’

४. योगतज्ञ दादाजींची आध्यात्मिक शक्ती सदैव कार्यरत असेल !

३.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केला आणि आज दादाजींनी देहत्याग केला. अलीकडच्या काळात संतांनी देहत्याग करणे, हे भावी काळ कठीण असल्याचे द्योतक आहे. योगतज्ञ दादाजींनी देहत्याग केला, तरी त्यांची आध्यात्मिक शक्ती त्यांचे भक्तगण, सनातन संस्था आणि भावी काळात येणारे ईश्‍वरी राज्य यांच्या पाठीशी सदैव कार्यरत असेल.

‘आम्हा सर्वांवर आपली कृपादृष्टी अखंड राहू दे’, अशी योगतज्ञ दादाजींच्या चरणी आर्त भावाने प्रार्थना आहे.

परात्पर गुरुदेवांमुळे आम्हाला योगतज्ञ दादाजींसारख्या सिद्ध पुरुषाची थोरवी आणि त्यांची निरपेक्ष प्रीती जवळून अनुभवता आली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०१९)

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. आपल्या दिव्य दृष्टीने ‘भविष्यात काय होणार आहे ?’, हे अचूक सांगणार्‍या योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे अद्वितीयत्व !

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे एक अलौकिक सिद्धपुरुष होेते. हिमालयात राहून त्यांनी जी उग्र साधना केली, त्यामुळे त्यांना दिव्य शक्ती, तसेच योगसामर्थ्य प्राप्त झाले. त्यामुळे भविष्यकाळात घडणार्‍या घटनांचे ज्ञान होऊन त्यांनी ‘समाजकल्याण’ या व्यापक हेतूने सहस्रो भाकिते वर्तवली आणि ती सत्यही झाली. त्यांनी केलेली भाकिते हा विज्ञानयुगातील एक चमत्कारच आहे. योगतज्ञ दादाजींचे हे कार्य म्हणजे देव, धर्म, भविष्य आणि भाकीत यांना थोतांड ठरवणार्‍या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मिळालेली चपराक आहे.

२. परात्पर गुरुदेवांनी योगतज्ञ दादाजींचे वर्णिलेले अलौकिकत्व !

परात्पर गुरु डॉक्टरांनी योगतज्ञ दादाजींचे अलौकिकत्व पुढील शब्दांत वर्णन केले होते, ‘महर्षि वाल्मीकिंनी रामायण घडण्याआधीच ते लिहून ठेवले. त्याचप्रमाणे योगतज्ञ दादाजी यांनी सनातनमध्ये घडणार्‍या भविष्यकालीन वैशिष्ट्यपूर्ण घटनांविषयी आधीच भाकीत वर्तवले होते. योगतज्ञ दादाजी म्हणजे आपल्यासाठी कलियुगातील वाल्मीकि ऋषीच आहेत.’

३. परात्पर गुरु डॉक्टरांंचा महामृत्यूयोग थोपवून सहस्रो साधकांवर अपार कृपा करणारे दादाजी !

योगतज्ञ दादाजींनी त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे जाणले की, या कलियुगात डॉक्टर जयंत आठवले धर्माचे महान कार्य एकटेच करत असल्याने भावी काळात त्यांची स्थिती चिंतादायक होऊ शकते. प्रत्यक्षातही परात्पर गुरुदेवांवर अनेक वेळा महामृत्यूयोगाचे संकट ओढवले आणि प्रत्येक वेळी आपल्या आध्यात्मिक बळाच्या प्रभावाने योगतज्ञ दादाजी यांनी त्यांचा महामृत्यूयोग थोपवून धरला. याद्वारे त्यांनी सनातनच्या सहस्रो साधकांवर आणि संपूर्ण मानवजातीवर अगणित उपकार केले आहेत. त्यांचे हे ऋण फिटणे केवळ अशक्य आहे.

४. योगतज्ञ दादाजींचे समाजकार्य, हे त्यांच्यातील प्रीतीचे दर्शक !

योगतज्ञ दादाजींचेे सूक्ष्म कार्य जेवढे व्यापक आणि विशाल होते, तेवढेच स्थुलातूनही त्यांनी समाजातील अनेक घटकांना जोडून ठेवले होते. गोरगरीब समाजासाठी त्यांनी विशेषत्वाने कार्य केले. गरजू, अपंग, अंध, मूकबधीर व्यक्ती आणि त्यांच्यासाठी कार्यरत असलेल्या संस्था यांना सामाजिक पुरस्कार अन् अर्थसाहाय्य देण्याचे त्यांचे कार्य शेवटच्या घटकेपर्यंत चालू होते. योगतज्ञ दादाजींची सर्वांठायी असलेली ही प्रीती पाहून ‘संतांचिया गावा प्रेमाचा सुकाळ । करिती जना आपुलेसे तात्काळ ॥’ या वचनाचे स्मरण होते. योगतज्ञ दादाजींसारख्या उच्च कोटीच्या संतांनी समाजासाठी केलेले कार्य हे त्यांना अखिल विश्‍वाप्रती वाटणार्‍या प्रीतीचेच दर्शक होय.

५. दादाजींसारख्या थोर संतांचा सत्संग लाभणे, हे सर्व साधकांचे परमभाग्य !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या दर्शनाने, एवढेच नव्हे, तर त्यांच्या स्मरणानेही चैतन्य मिळाल्याच्या अनुभूती अनेक साधकांनी घेतल्या आहेत.

योगतज्ञ दादाजींसारख्या थोर संतांचा सत्संग लाभणे, हे आम्हा सर्वांचे परमभाग्य आहे. परात्पर गुरुदेवांमुळे आम्हाला त्यांची महती कळू शकली.

आज त्यांच्या देहत्यागाचे वृत्त कानी पडल्यावर ‘त्यांचे चैतन्यमय आणि आश्‍वस्त करणारे बोल आता पुन्हा कानी पडणार नाहीत’, असे वाटून त्यांच्या स्मृतींनी मन भावव्याकुळ झाले. ‘सनातनवर आणि साधकांवर पितृवत प्रेम करणार्‍या योगतज्ञ दादाजींचे कृपाशीर्वाद यापुढेही लाभत राहू देत’, अशी जगन्नियंत्या परमेश्‍वराच्या चरणी प्रार्थना ! ‘सनातनच्या कार्यातील सर्व संकटे दूर होऊन परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशा ईश्‍वरी राज्याची स्थापना होण्यासाठी आम्हा सर्वांना दिव्य शक्ती प्रदान करावी’, ही योगतज्ञ दादाजींच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (२०.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF