ऋषितुल्य आणि महान संत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या पार्थिवावर नाशिक येथे अंत्यसंस्कार !

ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भावार्थ : भगवान विष्णूचे स्मरण मद म्हणजे गर्व न्यून करते. शिवशंकराच्या उपासनेने कामवासना नियंत्रित होते. श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाने त्रिदोषांचे संतुलन होऊन क्रोध संयमित होतो. गायत्री (सूर्य) उपासनेच्या प्रखर तेजामुळे मनातील मत्सररूपी जळमटे नाहीशी होतात. सरस्वतीच्या उपासनेमुळे बुद्धीचा विकास होतो, उत्तम विचारांना चालना मिळते आणि मोहावर विजय मिळवणे शक्य होते. श्री महालक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कसला लोभच उरत नाही.
(संदर्भ : मासिक भाग्यनिर्णय, ऑगस्ट २००२)

दैवी पाठबळामुळे ठरले आधारस्तंभ सनातनचे ।
अनुष्ठानांद्वारे केले निवारण सनातनवरील संकटांचे ॥
वात्सल्यरूपी योगतज्ञ दादाजींची भक्तांवरील निरपेक्ष प्रीती ।
कृतज्ञ आम्ही ईशचरणी अनुभवण्या दिली दादाजींच्या रूपात थोर विभूती ॥

नाशिक, २१ मे (वार्ता.) – गेल्या १५ वर्षांपासून सनातन संस्थेला सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी अखंड अनुष्ठाने करणारे आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, यासाठी अविरत प्रयत्नरत असणारे ऋषितुल्य अन् थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वय १०० वर्षे) यांनी वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया, कलियुग वर्ष ५१२१ (म्हणजेच २० मे २०१९) या दिवशी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी नाशिक येथील त्यांच्या महात्मानगरस्थित आश्रमात देहत्याग केला. देहत्यागाच्या वेळी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी पू. प्रमिला वैशंपायन, ज्येष्ठ सुपुत्र श्री. सुरेश वैशंपायन, कनिष्ठ सुपुत्र पू. शरद वैशंपायन, ज्येष्ठ स्नुषा सौ. सुनंदा वैशंपायन, कनिष्ठ स्नुषा सौ. ललिता वैशंपायन, तसेच नातवंडे आणि काही साधक उपस्थित होते. रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री. सुरेश वैशंपायन यांनी योगतज्ञ दादाजी यांच्या पार्थिवाला मंत्राग्नि दिला.

देहत्यागानंतरचा घटनाक्रम

१. योगतज्ञ दादाजी यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या भक्तगणांचा दादाजींना साश्रू नयनांनी निरोप !

योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागाचे वृत्त समजताच भक्तगण, तसेच अनेक साधक त्यांचे अंत्यदर्शन घेण्याच्या ओढीने पुष्कळ लांबून नाशिक येथे येत होते. आतापर्यंत योगतज्ञ दादाजी यांनी दिलेले प्रेम, त्यांचा अनुभवलेला सहवास हे सर्व आठवून ‘आता दादाजी आपल्या समवेत नाहीत’, या कल्पनेनेच भक्तांना दुःख झाले होते, तर काही भक्तांना अश्रू अनावर झाले. रात्री ८.३० वाजेपर्यंत योगतज्ञ दादाजी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांच्या भक्तांनी योगतज्ञ दादाजी यांनी सिद्ध केलेला ‘ॐ आनंदं हिमालयं विष्णुं…’ यासह अन्य मंत्र म्हटले.

२. रात्री १०.१५ वाजता त्यांच्या चरणांवर जल अर्पण करून त्यांना वस्त्रे परिधान करण्यात आली.

३. पुष्पमाळांनी सजवलेल्या रथातून वैकुंठभूमीपर्यंत निघालेली वैकुंठयात्रा !

रात्री १० वाजून ५७ मिनिटांनी योगतज्ञ दादाजी यांचे पार्थिव वैकुंठयात्रेद्वारे पुष्पमाळांनी सजवलेल्या रथातून पंचवटी येथील वैकुंठभूमीत नेण्यात आले. या यात्रेत त्यांचे कुटुंबीय, साधक, भक्त परिवार आणि नाशिकवासीय मिळून २०० ते २५० जण सहभागी झाले होते. ही वैकुंठयात्रा महात्मा नगर, एबीबी सर्कल, मायको सर्कल, जुने नाशिक मार्गे जाऊन पंचवटी वैकुंठभूमी येथे रात्री ११.३० वाजता समाप्त झाली. संपूर्ण यात्रेमध्ये भक्तगण ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप करत होते. वैकुंठधामी पोचल्यावर भक्तांनी योगतज्ञ दादाजी यांच्या चरणांवर पुष्पे अर्पण केली, तसेच मंत्र म्हणून अन्य विधीही केले. या वेळी पुरुष साधकांनी तीलार्पण विधी केला.

४. रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री. सुरेश वैशंपायन यांनी पार्थिवाला मंत्राग्नि दिला. सर्व अंत्यविधी धर्मशास्त्रानुसार करण्यात आले.

विशेष

‘ॐ आनंदं हिमालयं विष्णुं…।’ या मंत्रजपाचा साधक आणि भक्त यांच्याकडून उद्घोष !

रथात ठेवण्यासाठी योगतज्ञ दादाजी यांचे पार्थिव उचलतांना आणि पुन्हा खाली ठेवतांना सर्वच साधक अन् भक्त ‘ॐ आनंदं हिमालयं विष्णुं…।’ हा मंत्रजप करत होते. यामुळे वातावरणात वेगळेपणा जाणवत होता.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी अखिल मानवजातीसह सनातनच्या साधकांवर केलेल्या अखंड कृपेसाठी सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने त्यांच्या पावन चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागाविषयी मिळालेल्या पूर्वसूचना आणि विशेष घटना !

१. कुटुंबीय आणि भक्त यांच्या मनाची पूर्ण सिद्धता करवून घेणारे योगतज्ञ दादाजी !

देहत्यागाच्या १ मास आधीपासून ते कुटुंबियांना आणि साधकांना सांगायचे, ‘‘मी आता लवकरच वैकुंठाला जाणार आहे.’’ या वाक्यावरून ‘त्यांना वैकुंठगमनाची चाहूल लागली होती’, असे जाणवले. योगतज्ञ दादाजी हे श्री. अतुल पवार यांना म्हणायचे, ‘‘मी गेल्यावर (देहत्यागानंतर) माझ्याविषयीही सनातन प्रभातमध्ये पानेच्या पाने छापून येतील.’’ (परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचून दादाजी यांनी असे विधान दोनदा केले होते.) (प्रत्यक्षातही दादाजी यांचे विधान खरे ठरल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या दैनिकातील मजकुरावरून लक्षात येते. – संकलक)

एकदा श्री. अतुल पवार यांनी योगतज्ञ दादाजी यांना विचारले, ‘‘तुम्ही गेल्यावर कसे होणार ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आई-वडील गेल्यावर मुले मोठी होतातच की !’’

२. भक्तांवरील अगाध प्रीतीमुळेच त्यांना दर्शन देण्यासाठी योगतज्ञ दादाजी यांची सोहळ्याला उपस्थिती !

नाशिकहून शेवगाव असा अनुमाने ४ – ५ घंट्यांचा प्रवास करून योगतज्ञ दादाजी केवळ अन् केवळ भक्तांना दर्शन देण्यासाठी शताब्दी जन्मसोहळ्याला उपस्थित राहिले. यातूनच त्यांच्या भक्तांप्रतीच्या अगाध प्रीतीचे दर्शन घडले. प्रकृती अतिशय खालावलेली असतांनाही केवळ भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सोहळ्याला उपस्थित राहिले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या अस्थींचे विसर्जन !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या अस्थींचे नाशिक येथील रामकुंडात २१ मे या दिवशी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. दादाजी यांचे दोन्ही सुपुत्र श्री. सुरेश वैशंपायन आणि पू. शरद वैशंपायन यांनी अस्थी विसर्जित केल्या.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा परिचय !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे पूर्ण नाव श्रीपाद गणेश वैशंपायन असे होते. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नेरे हे त्यांचे जन्मगाव ! त्यांचा जन्म ७ मे १९२० या दिवशी, म्हणजेच मराठी कालगणेनुसार वैशाख पौर्णिमा (बुद्धपौर्णिमा) या दिवशी झाला.

हिमाचल प्रदेशात कुलू खोर्‍यातील गुहेत वास्तव्य असणारे हिमालयवासी महामुनी विष्णुरूपी भगवान आनंदस्वामी यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगतज्ञ दादाजींनी तुंगभद्रा आणि कन्याकुमारी येथे ४० दिवसांची खडतर अशी अनेक जल-अनुष्ठाने केली. प्रतिदिन २२ घंटे खडतर साधना करून त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. ते स्वतः योग-साधनेत तज्ञ होते. त्यांच्या शक्तीदेवता कधीकधी नागदेवतेच्या स्वरूपात प्रकट होत असत. अचूक निदान आणि अचूक भाकिते, हे त्यांच्या साधनेचे वैशिष्ट्य होते.

परात्पर गुरु डॉक्टरांवरील महामृत्यूयोगासारखे भयावह संकट आपल्या दिव्य शक्तीने सतत दूर करणारे आणि सनातनचा आधारस्तंभ असलेले एकमेवाद्वितीय सिद्धपुरुष योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

दोन दिव्य विभूतींचा वार्तालाप ! उजवीकडे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याशी संवाद साधतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २०११)

‘२ दिवसांपूर्वीच, म्हणजे १८.५.२०१९ या दिवशी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आणि आज त्यांच्या देहत्यागाची वार्ता कानावर पडली. त्यांना पुढील शब्दांत शब्दपुष्पांजली अर्पण करतो.

१. घरच्यासारखे प्रेम करणारे योगतज्ञ दादाजी

परात्पर गुरु डॉ. आठवले

माझे गुरु संत भक्तराज महाराज यांनी वर्ष १९९५ मध्ये देहत्याग केला. त्यानंतर अध्यात्माविषयी सर्वकाही मनमोकळेपणे बोलता येईल, असे मला कोणीच उरले नाही. आकस्मिकरित्या वर्ष २००५ मध्ये माझी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याशी ओळख झाली आणि नंतर त्यांच्याशी एवढी जवळीक झाली की, त्यांच्याइतकी जवळीक व्यवहारातही कोणाशी झाली नव्हती. मला त्यांच्याशी सर्वकाही मनमोकळेपणे बोलता येऊ लागले. याचे कारण होते त्यांचा स्वभाव ! आमच्या वयात २३ वर्षांचे अंतर होते; पण त्यांनी ते कधीही जाणवू दिले नाही. त्यांनी शेवटपर्यंत माझ्यावर अगदी घरच्यासारखे प्रेम केले. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर इतकी प्रीती जाणवायची की, ‘त्यांच्या चेहर्‍याकडे पहातच रहावे’, असे वाटायचे. त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा असायचा की, ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटायचे.

२. दैवी सिद्धींचा उपयोग नेहमी जनकल्याणासाठी करणे

पृथ्वीतलावरील उच्च आध्यात्मिक क्षमता असलेल्या मोजक्या संतांपैकी एक म्हणजेे योगतज्ञ दादाजी ! त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून साधनेला आरंभ केला. हिमालयातील गोठवणार्‍या थंडीत तपश्‍चर्या करण्यासारखी खडतर साधनाही त्यांनी केली. विशेष म्हणजे या तपश्‍चर्येतून त्यांना जे आध्यात्मिक बळ, तसेच दैवी सिद्धी यांची प्राप्ती झाली, त्यांचा उपयोग त्यांनी नेहमी जनकल्याणासाठीच केला.

३. काळाचाही वेध घेणार्‍या योगतज्ञ दादाजींचे द्रष्टेपण

योगतज्ञ दादाजी काळाचा पडदा ओलांडून भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांतील अनेक घटना सांगायचे आणि जनहितार्थ आवश्यक असल्यास ते अनिष्ट घटना टाळायचे. त्यांनी अनेक वर्षे आधी लिहून नंतर जाहीर केलेल्या अनेक भाकितांतून त्यांचे द्रष्टेपण अनुभवायला मिळते. त्यांनी माझ्या आणि ‘सनातन संस्थे’च्या संदर्भातही भाकिते केली होती. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याशी स्थुलातून परिचय होण्यापूर्वीच त्यांनी वर्ष २००४ मध्ये माझ्या महामृत्यूयोगाचे आणि परात्पर गुरु देशपांडेकाका यांच्या देहत्यागाचे भाकीत केले होते. ते त्यांनी वर्ष २०१० मध्ये उघड केले.

४. महामृत्यूयोगासारखे भयावह संकट आपल्या दैवी शक्तीने दूर करणारे योगतज्ञ दादाजी !

निरपेक्ष प्रीतीसोबत योगतज्ञ दादाजी यांनी माझे विविध त्रास दूर केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी माझे अनेक महामृत्यूयोगही टाळले आहेत. त्यांच्यामुळेच वर्ष २००७ पासून मी जिवंत आहे. यावर मी एक ग्रंथ प्रकाशित करणार आहे. त्यात त्यांनी सांगितलेले विविध उपाय इत्यादींची माहिती असेल आणि त्याचसोबत योगतज्ञ दादाजींनी माझ्यासाठी केलेल्या विविध अनुष्ठानांचाही उल्लेख असेल.

५. सनातनचा आधारस्तंभ

योगतज्ञ दादाजी ज्या क्षणापासून सनातनच्या संपर्कात आले, त्या क्षणापासून त्यांनी सनातनच्या प्रत्येक साधकाचे, तसेच सनातनच्या कार्याचे आध्यात्मिक स्तरावरील पालकत्व स्वीकारले. सनातनवर अनेक संकटे आली. त्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांनी त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य सनातनच्या मागे उभे केले. त्यामुळे ते सनातनसाठी मोठा आधारस्तंभ होते. माझ्यावर किंवा सनातन संस्थेवर एखादे संकट येणार असेल, तर ते त्या संदर्भात आधीच माहिती देऊन उपायही सांगायचे. त्यांच्यामुळे मी आणि सनातन संस्था अजून कार्यरत आहोत.

त्यांची सनातनवरची आणखीन एक मोठी कृपा म्हणजे त्यांनी सनातनचे श्री. अतुल पवार या साधकावर अनंत कृपा करून त्याला त्यांच्याकडे सेवेसाठी ठेवून घेतले. त्यामुळे त्याचीही साधनेत चांगली प्रगती झाली आहे.

योगतज्ञ दादाजी यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन आणि कनिष्ठ पुत्र पू. शरद यांच्याशीही आमच्या साधकांचे कुटुंबाप्रमाणे संबंध आहेत.

कृतज्ञता

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासारखे सिद्धपुरुष भारताला आणि हिंदु धर्माला लाभले, हे आपले भाग्य आहे. ‘त्यांचा कृपाशीर्वाद आमच्यावर अखंड राहील आणि ईश्‍वरी राज्याची स्थापना होईल’, याची आम्हाला निश्‍चिती आहे.

योगतज्ञ दादाजींनी देहत्याग केला असला, तरी ‘ते अजूनही आमच्या समवेत आहेत’, असे आम्ही अनुभवतो.

योगतज्ञ दादाजींबद्दल कितीही लिहिले, तरी लिखाण पूर्ण होणार नाही; म्हणून त्यांच्या चरणी अनंत कृतज्ञता व्यक्त करून माझ्या लेखणीला विराम देतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF