सूरत (गुजरात) येथे पंडित नथुराम गोडसे यांची जयंती साजरी केल्यामुळे हिंदु महासभेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक

भाजपच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ! भाजपच्या राज्यात धर्मांधांवर अशी कारवाई कधी होते का ?

सूरत (गुजरात) – येथील लिंबायतमधील हनुमान मंदिरामध्ये २० मे या दिवशी पंडित नथुराम गोडसे यांची जयंती साजरी केल्याच्या प्रकरणी हिंदु महासभेच्या ८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी जयंतीनिमित्त येथे लाडू वाटले. तसेच १०९ दिवे लावून या उत्सवाचा ‘व्हिडिओ’ बनवला होता. या कार्यक्रमाला १५ जण उपस्थित होते.

१. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर हेमंत सोनार, मनीष कलाल, वला मेर, हिरेन सुमरा, विरल मालवी आणि योगेश पटेल यांना अटक करण्यात आली. (दंगल घडवणार्‍या धर्मांधांविषयी तक्रार नोंदण्यास टाळाटाळ करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांना मात्र तात्काळ अटक करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. स्थानिक वृत्तवाहिनीला या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याची विनंती आयोजकांनी केली होती. त्यानुसार या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. त्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्येही प्रसारित झाले होते.

३. याविषयी आयोजक हिरेन सुमरा यांनी म्हटले की, आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. जसे लोकांना महात्मा गांधी यांच्याविषयी आपुलकी वाटते, तसेच आम्हाला नथुराम गोडसे यांच्याविषयी वाटते.

४. पोलिसांनी सांगितले की, महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. ‘नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये’, असे आवाहनही त्यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF