परशुरामभूमी चिपळूण शहरात ‘हिंदु एकता दिंडी’ने दिला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त भावपूर्ण ‘हिंदु एकता दिंडी’

धर्मध्वजाची पूजा करतांना श्री. राजेंद्र चितळे

चिपळूण, २० मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि  समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांच्या वतीने १९ मे या दिवशी शहरातून ‘हिंदु एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीतून हिंदूऐक्य आणि हिंदु राष्ट्र यांचा हुंकार निनादला.

हिंदु एकता दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी

दिंडीचा प्रारंभ श्री देव कालभैरवाला श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून धर्मध्वजाच्या पूजनाने झाला. पालखीत ठेवण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमांचे, तसेच ग्रंथ पालखीचे पूजन देवस्थानचे विश्‍वस्त श्री. समीर शेट्ये यांनी केले. धर्मध्वजाचे पूजन धर्मप्रेमी श्री. राजेंद्र चितळे यांनी केले. धर्मध्वजाला पुष्पहार धर्मप्रेमी श्री. रामदास घाग यांनी घातला आणि श्री. समीर शेट्ये यांनी श्रीफळ वाढवले. छत्रपती शिवरायांची बिरुदावली आणि शंखनाद झाल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. नगरपरिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खेड तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाराज जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.

दिंडी चिंचनाका, बाजारपेठ, जुना बसस्थानक अशी मार्गक्रमण करत वेस मारुति येथे आल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. सूत्रसंचालन सौ. प्राची जगताप यांनी केले.

हिंदु एकता दिंडीचा उद्देश सांगतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे  म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम वर्ष १९९८ मध्ये, ‘भारतात वर्ष २०२३ मध्ये ईश्‍वरी राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, असा विचार द्रष्टेपणाने मांडला. परात्पर गुरु डॉ. आठवले विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.   समारोपाच्या वेळी समितीचे श्री. विनोद गादीकर म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हिंदूंना संघटित करून कृतीशील करण्याचे महान कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्या संकल्पाने होत आहे. आज आपल्याला या दिंडीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त्त करण्याची संधी प्राप्त झाली. हिंदूंना धर्मशिक्षणवर्ग आणि सनातनचे ग्रंथ यांच्या माध्यमातून धर्माचे ज्ञान दिले जात आहे. त्यामुळेच हिंदु आता धर्माचरण करू लागले आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रचंड मोठे आहे. त्यासाठी जागृत आणि संघटित हिंदूंचे मोठे बळ लागणार आहे.

हिंदु राष्ट्राची प्रचीती आता स्थुलातून येत आहे ! – रामदास घाग, श्री केदारनाथ देवस्थानचे सचिव, खरवते, चिपळूण

खरवते येथील श्री केदारनाथ देवस्थानचे सचिव श्री. रामदास घाग म्हणाले की, ज्या वेळी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द बोलण्याचे कोणाचे धाडस नव्हते, अशा वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भारतात वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येईल असे सांगितले, त्याची प्रचीती आता स्थुलातून येत आहे. खर्‍या अर्थाने आता हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रारंभ झाला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत. प्रत्येकाने साधना करूनच हे सेवाकार्य करायला हवे, हिंदूंचे संघटन वाढवण्यासाठी कृतीशील प्रयत्न करणार आहे.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत ! – श्रीराम आंब्रे, शिवसेनेचे शाखाप्रमुख

महाळुंगे (खेड) येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. श्रीराम आंब्रे म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. ही चळवळ जोरात व्हायला हवी. गावागावांतून या विचाराचा प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

संत आणि मान्यवर यांची दिंडीला उपस्थिती

या दिंडीत सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम आणि पू. श्रीकृष्ण आगवेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच नगरसेविका सौ. सीमा रानडे, धर्मप्रेमी सर्वश्री विवेक गिजरे, सुरेश पवार, श्री कालभैरव सांस्कृतीक मंचाचे श्री. बापू रानडे, चिपळूण महासोमयाग समिताचे श्री. उदय चितळे, खेड येथील श्री. मंदार दीक्षित, सनातन संस्थेचे महेंद्र चाळके, ज्ञानदेव पाटील, केशव अष्टेकर, हिंदु जनजागृती समितीचे संतोष घोरपडे, विलास भुवड यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.

धर्मप्रेमींचे अभिप्राय –

१. ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव, अध्यक्ष, खेड तालुका वारकरी संघटना : संतानी पूर्वी जे धर्मप्रसाराचे कार्य केले, ते पुढे चालवले पाहिजे. गावागावांतून प्रसार व्हायला पाहिजे. अशा कार्यक्रमातूनच संघटन वाढेल.

२. श्री रामदास खोत, मार्कंडी : माझ्या क्षमतेनुसार या कार्यात सहभागी होईन.

३. श्री. गजानन खेडेकर, समर्थनगर, भरणे : दिंडी भावपूर्ण झाली. या कार्यात सहकार्य करीन.

४. श्री. बाजीराव घोसाळकर, पाग, चिपळूण : कार्यक्रम शिस्तबध्द झाला. या कार्यात माझा सहभाग नेहमीच राहील.

५. श्री. राजेंद्र वेस्वीकर, चिपळूण : समितीचेे कार्य फारच चांगले आहे,  तुम्ही चिकाटीने हे कार्य करत आहात, त्याची आज आवश्यकता आहे

६. श्री. उदय चितळे, चिपळूण : दिंडी शिस्तबध्द आणि भावपूर्ण झाली.

चिपळूण नगरपरिषदेकडून पालख्यांचे स्वागत

पालखींचे स्वागत नगरपरिषदेसमोर नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे आणि नगरसेवक श्री. परिमल भोसले यांनी केले. या वेळी नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु संस्कृती जोपासण्याचे सत्कार्य करत आहेत. नवीन पिढीसाठी आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.’’ नगरसेवक श्री. परिमल भोसले म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य चालू आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आपली संस्कृती रक्षणाचे हे कार्य चांगले आहे.’’

क्षणचित्रे :

१. भावपूर्ण वातावरणात चालत असलेल्या दिंडीकडे धर्मप्रेमी जिज्ञासेने पहात होते. अनेक धर्मप्रेमी हात उंचावून सकारात्मक प्रतिसाद देत होते.

२. पोलिसांनी संपूर्ण दिंडीत चांगले सहकार्य केले.

३. समितीच्या कार्यकर्त्यांनी दिंडीमध्ये स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके आवडल्याचे अनेकांनी सांगितले.

४. ‘आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो’, आदी घोषणांनी शहर दुमदुमले.


Multi Language |Offline reading | PDF