अकोला येथील सौ. रासेश्‍वरी आणि श्री. सचिन लक्रस यांच्या ५५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बाळाची गुणवैशिष्ट्ये !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील हा बालक आहे !

अकोला येथील सौ. रासेश्‍वरी सचिन लक्रस आणि श्री. सचिन लक्रस यांना २४.१.२०१९ या दिवशी पुत्रप्राप्ती झाली. २१.५.२०१९ या दिवशी या बाळाचे बारसे आहे. त्यानिमित्त त्याची आई, आजी आणि मावशी यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये अन् बाळाच्या जन्मानंतर आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. जन्मापूर्वी

१ अ. आधुनिक वैद्यांनी ‘गर्भाची वाढ होण्यात अडचण असल्याने अपंग बाळ जन्माला येईल’, असे सांगितल्याने बहीण आणि तिचे यजमान यांच्या मनात बाळाला जन्म देण्यासंदर्भात शंका निर्माण होणे : ‘माझ्या बहिणीला (सौ. रासेश्‍वरी सचिन लक्रस) गर्भधारणा झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी तिची चौथ्या मासात तपासणी करून सांगितले, ‘गर्भाची वाढ होण्यात अडचण आहे. बाळ अपंग जन्माला येईल.’ तेव्हा बहीण आणि तिचे यजमान यांना दु:ख झाले. ‘अशा गर्भाचे काय करायचे ?’, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

१ आ. बहिणीच्या कीर्तनकार सासर्‍यांनी ‘बाळ जसे जन्माला येईल, तसे त्याला सांभाळणे’, ही साधना असल्याचे सांगणे : नंतर बहिणीच्या यजमानांनी त्यांच्या गुरूंना प्रार्थना केली. बहिणीच्या सासरची मंडळी आध्यात्मिक आहेत. तिचे सासरे कीर्तनकार असून ते भागवताचे वाचन करतात. ते म्हणाले, ‘‘बाळ जसे जन्माला येईल, तसे सांभाळणे, हे आपले प्रारब्ध आहे’, असा भाव ठेवून त्याला जन्म द्यावा. ही आपली साधना आहे.’’

१ इ. आधुनिक वैद्यांनी दुसर्‍यांदा चाचणी केल्यावर चाचणीचा अहवाल सर्वसाधारण आला.’

– सौ. सविता तिवारी (बाळाची आजी), संभाजीनगर आणि वैद्या (कु.) आरती तिवारी (बाळाची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. जन्मानंतर

२ अ. बाळाला कसलाच त्रास नसल्याचे लक्षात येणे : ‘केवळ भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच बाळ जन्माला आले. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला कोणताच त्रास नसल्याचे लक्षात आले. हा चमत्कार केवळ गुरुकृपेनेच झाला आहे.

२ आ. बाळाच्या शरिरावर दैवी कण आढळणे : बाळाच्या शरिरावर तांबडे, लाल, पिवळे, चंदेरी, मोरपंखी अशा विविध रंगांचे दैवी कण आढळतात. बाळाला जी व्यक्ती कडेवर घेतेे, त्या व्यक्तीच्याही अंगावर दैवी कण आढळतात.

२ इ. इतर बाळांप्रमाणे न रडणे : बाळाने नैसर्गिक विधी केले असले, तरी ते रडत नाही. आम्ही पाहिल्यावरच त्याचा लंगोट पालटला जातो. ते भूक लागल्यावरही रडत नाही. बाळ जागे असतांनाही शांत असते. त्याच्या आईला जाग आल्यावर ती बाळाला दूध पाजतेे. बाळाच्या पोटात दुखत असेल, तर तसे त्याच्या तोंडवळ्यावरून कळते; मात्र तेव्हाही ते रडत नाही.’ – वैद्या (कु.) आरती तिवारी

२ ई. देवाशी अनुसंधान

२ ई १. ‘बाळ दूध पीत असतांना त्याची नमस्काराची मुद्रा असते.’ – सौ. रासेश्‍वरी सचिन लक्रस (बाळाची आई), अकोला.

२ ई २. वडील करत असलेला नामजप आणि म्हणत असलेली भजने शांतपणे ऐकणे : ‘बाळाचे वडील (श्री. सचिन लक्रस) हे पौरोहित्य करतात. (त्यांचे गुरु प.पू. भादोलकर महाराज आहेत.) ते बाळाच्या जवळ असतांना नामजप आणि प्रार्थना करतात अन् भजने म्हणतात. तेव्हा बाळ ते लक्षपूर्वक ऐकत असते. बाळ ‘अयि गिरी नन्दिनी…’ हे स्तोत्र लावल्यावर शांतपणे ऐकत असते.

२ ई ३. ‘बाळ झोपेतही अनुसंधानात आहे. त्याचे नामस्मरण अंतर्मनातून चालू आहे’, असे मला वाटते.

२ उ. बाळाला पाहिल्यावर सर्वांना ‘ते दैवी आहे’, असे जाणवते.

२ ऊ. बाळाला पाळण्यात घालण्याचा विधी होतांना त्याची जाणवलेली वैशिष्ट्ये

२ ऊ १. बाळाला पाळण्यात घालण्याच्या दिवशी ‘घरात सत्संग सोहळा किंवा भंडारा आहे’, असे वाटणे : ७.२.२०१९ या दिवशी बाळाला पाळण्यात घालायचे होते. त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आईला आध्यात्मिक त्रास होऊ लागला, तरी दुसर्‍या दिवशी पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम शांततेने पार पडला. तेव्हा हा संस्कारविधी करण्याचे महत्त्व आमच्या लक्षात आले. त्या दिवशी ‘घरात सत्संग सोहळा किंवा भंडारा आहे’, असे मला वाटत होते.

२ ऊ २. एरव्ही होणारा पाठदुखीचा त्रास विधीच्या दिवशी २५ जणांचा स्वयंपाक आणि अन्य गोष्टी करतांना न होणे : या दिवशीचा स्वयंपाक करण्यासाठी बाई शोधूनही मिळाली नाही. तेव्हा आम्ही प्रार्थना करून स्वयंपाक केला. स्वयंंपाक रूचकर झाला होता. आम्ही स्वयंपाक करतांना मधूनमधून प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करत होतो. मला अन्य वेळी पाठदुखीचा त्रास होतो; परंतु बाळाला पाळण्यात घालायच्या दिवशी २५ जणांचा स्वयंपाक आणि अन्य गोष्टी करतांना त्रासाची जाणीव झाली नाही.

२ ऊ ३. सहनशील : बाळाला पाळण्यात घातल्यानंतर दुसर्‍या दिवशी घरात पुष्कळ पाहुणे होते. त्या दिवशी पुष्कळ आवाज होत असूनही ते शांत झोपले होते. त्यांच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.

२ ए. बाळाचा जन्म झाल्यानंतर आलेल्या अनुभूती

२ ए १. बाळाच्या आई-वडिलांचे ‘जमीनविक्री’चे प्रलंबित काम बाळाचा जन्म झाल्यावर तिसर्‍या दिवशी मार्गी लागले.

२ ए २. बाळाला रुग्णालयातून घरी आणल्याच्या दिवशी ‘गुरुपौर्णिमा आहे’, असे वाटणे : बाळाला पाचव्या दिवशी रुग्णालयातून घरी आणले. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘घराला तोरण लावले आहे. फुलांची रांगोळी काढली आहे. धूप आणि आरती लावली आहे’, असे दृश्य दिसत होते. त्या दिवशी मला ‘गुरुपौर्णिमा आहे’, असे वाटत होते.

२ ए ३. नामजप चालू होणे : मी बाळाला घेतल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू होतो. त्याला पाहिल्यावर आणि घेतल्यावर मला शांतीची अनुभूती येते.

२ ए ४. बाळाला घेतल्यावर ‘दैनिक सनातन प्रभात’ने देहावरील आवरण काढल्याप्रमाणे उपाय होत असल्याचे जाणवणे : माझ्या आईने (सौ. सविता तिवारी यांनी) बाळाला उचलल्यावर तिच्यावर ‘आध्यात्मिक उपाय होत आहेत’, असे तिला वाटते. ‘दैनिक सनातन प्रभात’ने देहावरील आवरण काढल्यावर जसे उपाय होतात (आवरण नष्ट होणे, जांभया येणे, हलके वाटणे इत्यादी), तसे उपाय बाळाला घेतल्यावर होतात.

२ ए ५. बाळाला घेतल्यावर किंवा त्याची अन्य कामे करतांना उत्साह वाटणे : मी बाळाच्या सहवासात १८ दिवस होते, तरी मला आध्यात्मिक त्रास जाणवला नाही. त्याला घेतल्यावर किंवा त्याची अन्य कामे करतांना मला उत्साह जाणवत होता. मी अधिक क्षमतेची कामे केली, तरी माझी चिडचीड होत नव्हती. हे सर्व मला परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अनुभवायला मिळाले.

३. कृतज्ञता !

‘बाळाच्या जन्माच्या वेळी बहिणीची प्रकृती चिंताजनक होती’, असे आम्हाला आधुनिक वैद्यांकडून नंतर कळले. ‘अशा स्थितीत बाळ आणि बहीण दोघे सुखरूप राहिले’, ही देवाची कृपा ! बाळाची दैवी लक्षणे अनुभवतांना ‘देवाने माझे येथे येण्याचे नियोजन का केले ?’, हे लक्षात आले. बाळाची दैवी वैशिष्ट्ये लक्षात आणून दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (४.३.२०१९)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.


Multi Language |Offline reading | PDF