आधुनिक वैद्यांमध्ये सेवाभाव हवा !

‘आधुनिक वैद्यांवर होणारी आक्रमणे, उपचारांमधील वैद्यांचा हलगर्जीपणा, विलंबाने होणारे वैद्यकीय उपचार आणि त्यातून होणारी भांडणे यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील ४९८ सरकारी रुग्णालयांत ४ कोटी रुपयांचे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. यामध्ये ‘मायक्रोफोन’ असल्याने दृश्यासमवेत संवादाचेही ध्वनीमुद्रण होणार आहे. त्यामुळे ‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला’, हे समजणार आहे. या निर्णयावरून ‘आधुनिक वैद्यांवर होणारी आक्रमणे कोणत्या कारणामुळे होतात, हे नेमकेपणाने समजेल आणि त्यावर उपाययोजना काढता येईल’, या उद्देशाने आरोग्य विभागाने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे’, असे वाटते.

वास्तविक ‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांचे संबंध असे का आहेत ?’, याचा अभ्यास व्हायला हवा. एकेकाळी आधुनिक वैद्य म्हणजे ‘देवमाणूस’ असा विश्‍वास असणारे रुग्ण आज हाणामारीवर उतरले आहेत. पूर्वीच्या काळी वैद्य शिक्षण घेतांनाच ‘रुग्णांची सेवा करायची आहे’, या भावाने शिक्षण घेत होते. त्यामुळे ‘वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास मनापासून आणि रुग्णाला हाताळतांना कोणतीही चूक व्हायला नको’, या आत्मीयतेने केला जात होता. मनाची संवेदनशीलता जागृत असल्यामुळे पूर्वीच्या काळी आधुनिक वैद्यांकडून चुका होण्याचे प्रमाणही नगण्य होते. दुर्दैवाने हे चित्र आज पालटत चाललेले आहे; कारण ‘वडील आधुनिक वैद्य आहेत, तर मुलगाही आधुनिक वैद्य व्हायलाच हवा’, या अट्टाहासापोटी मुलाची इच्छा नसतांनाही त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्याची बळजोरी केली जाते. तसेच अतिरिक्त पैसे देऊन वैद्यकीय शिक्षण घेणे, आरक्षण यामुळे तयार होणार्‍या काही आधुनिक वैद्यांचे ध्येय केवळ ‘भरपूर पैसे मिळवणेे’, हे होत आहे. याचा परिणाम शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘कट प्रॅक्टीस’ (आधुनिक वैद्य आणि विविध तपासण्या करणारे आधुनिक वैद्य यांच्यामध्ये रुग्णांच्या तपासणीनुसार पैशांची टक्केवारी ठरवणे) केली जाते. यामध्ये आवश्यकता नसतांनाही रुग्णांच्या तपासण्या केल्या जातात. अशाप्रकारे या क्षेत्रातही काही स्वार्थी आणि असंवेदनशील आधुनिक वैद्यांमुळे भ्रष्टाचार, लुबाडणूक, फसवणूक शिरली आहे. त्यामुळे या क्षेत्राची बदनामी होत आहे. या समवेत समाजातही असंयमीपणा, अभ्यासूवृत्तीचा अभाव, गुंड प्रवृत्ती यांचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम रुग्णाची स्थिती खालावल्यावर आधुनिक वैद्यांच्या निष्काळजीपणामुळे झाले कि आजारामुळे, याचा विचार अल्प होतो. हा विचार न करता हाणामारी केल्यामुळे प्रकरण वेगळ्याच वळणावर जाते. यासाठी समाजाने संयमाने वागल्यास आणि आधुनिक वैद्यांनी प्रामाणिकपणे अन् सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा केल्यास असे प्रसंग टळतील. यासाठी केवळ वरवरची उपाययोजना न करता मुळाशी जाऊन सेवाभावी आधुनिक वैद्य निर्माण होणे आणि संयमी समाज निर्माण करणे, यांसाठी प्रयत्न होणे आवश्यक !’

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF